भाषाभेद न आणता रोटरी उपक्रमाला सहकार्य करा

अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर यांचे आवाहन : स्टॉलवर मराठीतही फलक असणार बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावने आजपर्यंत कोणताही भाषाभेद न करता शहरात विकासाभिमुख उपक्रम राबवून आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात असंख्य सुधारणा केल्या आहेत. रोटरी अन्नोत्सव हासुद्धा बेळगावकरांना विविध प्रांतांचे खाद्यपदार्थ चाखता यावेत यासाठी व यातून मिळालेला निधी सामाजिक उपक्रमासाठीच वापरण्यात येणार आहे. प्रशासनाच्या आदेशामुळे […]

भाषाभेद न आणता रोटरी उपक्रमाला सहकार्य करा

अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर यांचे आवाहन : स्टॉलवर मराठीतही फलक असणार
बेळगाव : रोटरी क्लब ऑफ बेळगावने आजपर्यंत कोणताही भाषाभेद न करता शहरात विकासाभिमुख उपक्रम राबवून आरोग्य, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात असंख्य सुधारणा केल्या आहेत. रोटरी अन्नोत्सव हासुद्धा बेळगावकरांना विविध प्रांतांचे खाद्यपदार्थ चाखता यावेत यासाठी व यातून मिळालेला निधी सामाजिक उपक्रमासाठीच वापरण्यात येणार आहे. प्रशासनाच्या आदेशामुळे अन्नोत्सवाच्या स्टॉलवर कानडी भाषेत फलक लिहिण्यात आले असले तरी मराठी भाषेतही फलक असणार आहेत. त्यामुळे कोणत्याही संघटनांनी भाषाभेद न आणता रोटरीच्या या उपक्रमाला सहकार्य करावे, असे आवाहन क्लबचे अध्यक्ष जयदीप सिद्दण्णावर यांनी केले. रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या अन्नोत्सवमध्ये केवळ कानडी भाषेत व त्याच्या खाली इंग्रजीमध्ये फलक असल्याने मराठी भाषिकांनी व काही मराठी संघटनांनी त्याविरोधात जोरदार आक्षेप घेऊन अन्नोत्सवावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय समाजमाध्यमांवरून जाहीर केला होता. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत सिद्दण्णावर यांनी रोटरीची भूमिका स्पष्ट केली.
रोटरीत भाषाभेद नाही
ते म्हणाले, बेळगाव शहरात सर्व भाषिक गुण्यागोविंदाने नांदतात. रोटरीमध्येसुद्धा सर्व भाषिक सदस्य कार्यरत आहेत. रोटरीने मराठी व कानडी शाळांमध्येच विविध सुधारणा केल्या आहेत. शहरामध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा व सुलभ शौचालये उभारली आहेत. कोणताही भाषाभेद न करता रोटरीने हे काम केले आहे. केवळ प्रशासनाच्या आदेशानुसार नियम पाळणे आम्हाला बंधनकारक आहे. मात्र, सर्वांच्याच भावनांचा आदर करून तिन्ही भाषांमधील फलक आम्ही लावले आहेत. कानडी भाषेत 60 टक्के मजकूर असावा, हा आदेश अवघ्या चार दिवसांपूर्वी आम्हाला मिळाला. एवढ्या मोठ्या उपक्रमाची तयारी सोपी नाही. मात्र, आदेश मानून आम्ही त्याचे पालन केले आहे. मात्र, रोटरीने कधीही कुठलाच भेद केलेला नाही. सातत्याने असे जर गढूळलेले वातावरण राहिले तर बेळगावमध्ये आधीच कमी होत असलेला व्यापार-उद्योग दुसरीकडे स्थलांतरित होऊ शकतो, हे सर्वांनी लक्षात घ्यावे, असेही ते म्हणाले.
अन्नोत्सवाचे उद्या उद्घाटन
या अन्नोत्सवात एकूण 187 स्टॉल असून स्थानिकबरोबरच यंदा दिल्ली, चंदीगढ, राजस्थान, काश्मीर, लखनौ येथील स्टॉलधारकही सहभागी झाले आहेत. यामध्ये खाद्यपदार्थांचे 80 स्टॉल आहेत. एफएसएसआयच्या नियमानुसार या सर्वांनी परवानाही घेतला आहे, असे सिद्दण्णावर यांनी स्पष्ट केले. शुक्रवारी सायंकाळी जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या उपस्थितीत शरीरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. शनिवार दि. 6 रोजी सायंकाळी ब्रिगेडियर जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते अन्नोत्सवाचे उद्घाटन होईल, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेवेळी इव्हेंट चेअरमन डॉ. संतोष पाटील, सुरेश मैत्राणी, निरंजन संत, विशाल पट्टणशेट्टी, नितीन गुजर, गणेश देशपांडे, बिपीन शहा, डॉ. महांतेश पाटील, डॉ. गौतम व डॉ. सोमशेखर उपस्थित होते.
केवळ नाममात्र शुल्क
अन्नोत्सवमध्ये दहा दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम होणार आहेत. सुफी नाईट, रेट्रो नाईट, सुपर वूमन याबरोबरच अर्जितसिंग नाईट हे आकर्षण आहे. अन्यत्र अशा कार्यक्रमांना तिकीट लावण्यात येते. मात्र, अन्नोत्सवात केवळ नाममात्र शुल्कामध्ये या सर्व कार्यक्रमांचा आस्वाद घेता येणार आहे, असे आयोजकांनी स्पष्ट केले.