अलौकिक जीवनादर्श

अलौकिक जीवनादर्श

पौर्णिमा या तिथीने भारतीयांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. दर महिन्यातल्या पौर्णिमेला विशिष्ट सण असतोच. ज्येष्ठ महिन्यातल्या पौर्णिमेला स्त्रियांच्या सौभाग्यवर्धनाचा सण म्हणजे वटपौर्णिमा आहे. महाराष्ट्रात कुठेही जा महानगरात किंवा छोट्याशा खेड्यात वडाच्या झाडांना दोरा गुंडाळलेला दिसेल. वटपौर्णिमा या सणाचे बीज भक्तीच्या वाटेवर एवढे खोलवर रुजले आहे की विपरीत काळप्रवाहात देखील ते आपले अस्तित्व टिकवून आहे.
वटवृक्ष म्हणजे आधार, भव्यता, पराक्रम. संस्था तोलून धरीत ती पुढे चालवणारी व्यक्ती ही आधारवड असते. जुन्या काळातली एक ओवी अशी आहे- ‘बाप्पाजी बयाबाई दोन्ही हाईती वडजाई, त्याच्या सावलीची किती सांगू मी बडेजाई’  सासरी नांदणाऱ्या मुलीला सासू-सासऱ्यांचा आधार हा वडासारखा वाटतो. प्रलयकाळात विष्णूने या वृक्षाचा आश्रय घेतला होता. दारामधला वटवृक्ष आपला पुत्र व्हावा असे स्त्रियांना वाटते. कारण तो चिरंजीव आहे. त्याची मुळे पुन्हा पुन्हा रुजून बहरतात.
ज्येष्ठ पौर्णिमेला वटवृक्षाखाली गतप्राण झालेल्या पतीचे प्राण प्राणपणाने परत घेऊन येणारी सावित्री भारतीय स्त्रियांच्या जीवनाचा आदर्श आहे. महामहोपाध्याय बाळशास्त्राr हरदास असे म्हणतात, ‘जडवादी व भौतिक विजयाने उन्मत्त असलेल्या पाश्चात्य मनांवर ज्या अनेक भारतीय आदर्शांनी विलक्षण मोहिनी घातली आहे त्यांत सावित्रीचा आदर्श सर्वोच्च आहे. ‘सावित्रीची कथा ही महाभारतात आली आहे. महर्षी मार्कंडेय यांनी ती विद्युल्लता द्रौपदीला सांगितली आहे. सतत संकटांचा सामना करणारी द्रौपदी एक महान साधिका आहे. तिच्या साधनकाळात तिला अकंपित स्थैर्य मिळावे म्हणून तिला सावित्रीची कथा सांगण्यात आली. सावित्री ही भारतीयांच्या मनातले अग्रगण्य श्रद्धास्थान आहे. निष्काम अंत:करणाची, लावण्यस्वरूप आणि राजघराण्यातले संस्कार ल्यालेली सावित्री ही सर्व विद्या आणि कलांमध्ये निपुण होती. ती जन्मत: भाग्यवान होती. महापराक्रमी अश्वपती राजाची एकुलती एक कन्या असल्यामुळे सारी ऐहिक सुखे तिच्यासमोर हात जोडून उभी होती. बंधन आणि नियंत्रणाशिवाय ती स्वत:चा पती स्वत: निवडायला प्रवासासाठी बाहेर पडली. राज्यविहीन अवस्थेत फळे-कंदमुळे खाऊन अरण्यात राहणाऱ्या द्युमत्सेन राजाच्या चारित्र्यसंपन्न आणि गुणवान असणाऱ्या सत्यवान या पुत्राची तिने निवड केली. सत्यवान लौकिक अर्थाने दरिद्री आहे, तो अल्पायुषी आहे हे कळूनही सावित्री त्याच्याशीच विवाह करण्याच्या निश्चयावर ठाम आहे. मनाने एकदा पतीची निवड केल्यावर दुसऱ्याकडे पती म्हणून बघणे हा मानसिक व्यभिचार आहे असे तिचे स्पष्ट मत आहे. केवळ एक वर्षाने मृत्युमुखी पडणार असे भविष्य असलेल्या सत्यवानाशी विवाह करून अरण्यात कुटुंबासह आनंदी राहणारी सावित्री स्त्राr जीवनाच्या आदर्शाचा परमोच्च बिंदू आहे. पतीच्या आयुष्यासाठी कठोर व्रत आचरणाऱ्या सावित्रीला यमदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. पहिला वर तिने राज्यभ्रष्ट व अंध झालेल्या सासऱ्यांसाठी मागितला. त्यांना बल व दृष्टी मागितली. दुसऱ्या वरात तिने त्यांचे गेलेले राज्य मागून घेतले व तिसरे वरदान तिने स्वत:च्या पित्यासाठी मागितले. पतीगृह आणि पितृगृह यांचा विचार करणारी सावित्री स्वत:साठी काहीच मागत नाही हे बघून बुद्धी-शक्तीचा अधिष्ठाता असलेले यमही काही काळ विचलित झाले. त्यांच्यात प्रेम आणि वात्सल्य भावना जागृत झाली. हे बघून तिने चातुर्याने स्वत:साठी शंभर पुत्रांची माता होण्याचे वरदान मागून घेतले. यमाने तथास्तु म्हणून आशीर्वाद दिला आणि अशाप्रकारे सावित्री सत्यवानाचे प्राण यमदेवतेकडून परत आणण्यात यशस्वी ठरली. तिच्या पतीवरल्या असीम प्रेमाने मृत्यूवर विजय मिळवला. निष्ठा, प्रेम, चातुर्य हे गुण असलेली स्त्राr कुटुंबसंस्था मोडकळीस येऊ देणार नाही ही खात्री सावित्रीची कथा देते. आजच्या विस्कळीत झालेल्या अंधारमय घराघरांमध्ये पवित्र उजेड निर्माण करते. ही पणती जपून ठेवायला हवी.
पूजनीय पांडुरंगशास्त्राr आठवले यांनी लिहिलेली संत तुलसीदास यांची चरित्रकथा वाचली की समाजामध्ये रूढ असलेला एक पक्का गैरसमज दूर होतो की तुलसीदासांची पत्नी त्यांना उणेदुणे काढून, टोमणे मारून बोलली. तुलसीदास हे प्रखर बुद्धिमत्ता असलेले महान पंडित होते. नशिबात, प्रारब्धात असलेली सामान्य स्त्राr नाकारून त्यांनी इच्छाशक्ती व आत्मशक्तीच्या जोरावर रत्नावली या विदुषी स्त्राrशी विवाह केला. रत्नावली त्यांचे जीवनसर्वस्व होती. त्या परस्परांचे एकमेकांवर अलोट प्रेम होते. एकदा मुसळधार पावसात ते रत्नावलीला भेटायला तिच्या माहेरी गेले तेव्हा सर्पाला दोरी समजून ते गच्चीत चढून गेले. तेव्हा रत्नावलीने पतीची तल्लीनता ओळखली आणि त्या दोघांचा दीर्घ अध्यात्मसंवाद घडला. जीवनात भोगाधीन न होता तेजस्वी जीवन जगण्यासाठी आणि परमात्म्याला प्राप्त करीत आत्मानंद अनुभवण्यासाठी तिने पतीला संन्यास घेण्याचा सल्ला दिला. तिने पतीचे उणेदुणे काढले नाही किंवा निर्भर्त्सना केली नाही तर त्यांचे विचार तिने प्रगल्भता दाखवून बदलून टाकले. पतीला गृहत्याग करायला लावून संन्यास घेण्याकडे प्रवृत्त करणारी रत्नावली भारतीयांना पूज्य आहे. संत तुलसीदासांनी केलेले कार्य अमर आहे. त्यात मोठा वाटा त्यांच्या पत्नीचा आहे. तिचे पतीवरचे प्रेम चिरंजीव आहे. भारतीय स्त्राr म्हणून ती जीवनाचा आदर्श आहे
अलीकडच्या काळातले अगाध प्रेमाचे, पती-पत्नीच्या उज्ज्वल पारमार्थिक नात्याचे उदाहरण म्हणजे वैकुंठवासी संत धुंडामहाराज देगलूरकर आणि त्यांच्या पत्नी कृष्णाम्मा यांचे आहे. परम आदरणीय धुंडामहाराज जेव्हा विठ्ठल विठ्ठल म्हणत ब्रह्मलीन झाले तेव्हा अवघ्या महाराष्ट्रात आणि कर्नाटकात सगळीकडे शोककळा पसरली. मठातला गलबला ऐकून त्यांच्या पत्नी कृष्णाम्मा यांनी सुनेकडे विचारपूस केली. महाराज वैकुंठवासी झाल्याचे कळताच त्यांनी मळवट भरला, पतीचे मुखावलोकन केले आणि प्राण त्यांच्या चरणी अर्पण केले. ‘पतिव्रतेचे जिणे । भ्रताराचे वर्तमाने’ ही तुकोबांची वाणी सार्थ केली. एकाच चितेवर उभयतांना अग्नी देण्यात आला. पतीवर असलेले जिवापाड प्रेम हेच जगण्याचे प्रधान सूत्र असलेल्या स्त्रिया भारतीय संस्कृतीची धरोहर तर आहेतच शिवाय उदात्त प्रेमाचा अलौकिक जीवनादर्श आहेत.
-स्नेहा शिनखेडे