पावसाचा पुन्हा एकदा ‘सुपर संडे’

सलग दुसऱ्या रविवारी जोरदार हजेरी : नागरिकांची आसऱ्यासाठी धावपळ प्रतिनिधी / बेळगाव वळीव पावसाने शहरासह परिसरात दमदार बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळपासून उष्मा वाढल्याने पाऊस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. सायंकाळी 4 च्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. यामुळे शहरात बाजारासाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली. गेल्या आठवडाभरापासून वळीव पावसाने शहर परिसरात दमदार […]

पावसाचा पुन्हा एकदा ‘सुपर संडे’

सलग दुसऱ्या रविवारी जोरदार हजेरी : नागरिकांची आसऱ्यासाठी धावपळ
प्रतिनिधी / बेळगाव
वळीव पावसाने शहरासह परिसरात दमदार बरसल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. सकाळपासून उष्मा वाढल्याने पाऊस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. सायंकाळी 4 च्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. यामुळे शहरात बाजारासाठी आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
गेल्या आठवडाभरापासून वळीव पावसाने शहर परिसरात दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे बळीराजा सुखावला असून वातावरणातील उष्मा कमी होऊन गारवा निर्माण झाला आहे. गेल्या आठवडाभरापासून पावसाची वारंवार हजेरी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरली आहे. रविवारी सायंकाळी विजेच्या कडकडाटासह दमदार पाऊस झाला. यामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले होते. तर यापूर्वी झालेल्या वळीव पावसाने सखल भागातील अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते. याची दखल घेऊन महानगरपालिकेसह नागरिकांनीही पावसाच्या पाण्याला वाट करून दिल्याने पाणी साचण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
नुकताच जिल्हाधिकाऱ्यांनीही शहरातील पावसाचे पाणी साचून निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला होता. महानगरपालिकेला पाणी साचत असलेल्या ठिकाणी उपाययोजना करण्याची सूचना केली होती. प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करून पाणी साचणाऱ्या ठिकाणी खबरदारी घेण्यासाठीही अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक ठिकाणी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे रविवारी दमदार पाऊस झाला असला तरी पाणी साचून नुकसान झाल्याच्या घटना विरळच होत्या.
अचानक कोसळलेल्या पावसामुळे शहरात बैठ्या विक्रेत्यांसह फळविक्री करणाऱ्या फिरत्या विक्रेत्यांचीही तारांबळ उडाली. भाजीपाला भिजू नये, यासाठी चांगलीच कसरत करावी लागली. बाजारासाठी आलेल्या नागरिकांना दुकानांमध्ये आसरा घ्यावा लागला. तर जवळील सांबरा आणि शिनोळी येथील महालक्ष्मी यात्रेहून परत येणाऱ्या भाविकांना पावसाचा सामना करावा लागला. वाहने रस्त्यावर थांबवून आसऱ्यासाठी आसपासच्या घरांकडे त्यांना धाव घ्यावी लागली.