सुनीता विलियम्स तिसऱ्या अंतराळवारीसाठी सज्ज

1-5 जूनदरम्यान होणार यानाचे प्रक्षेपण वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स पुन्हा एकदा अंतराळात झेपावण्यासाठी सज्ज आहेत. सुनीता विलियम्स बोइंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून अंतराळात पोहोचतील. बोइंगच्या स्टारलायनरचे प्रक्षेपण 1 ते 5 जूनदरम्यान होऊ शकते. पूर्वी हे अंतराळयान चालू महिन्याच्या प्रारंभी प्रक्षेपित होणार होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण टळले होते. सुनीता विलियम्स वयाच्या 41 […]

सुनीता विलियम्स तिसऱ्या अंतराळवारीसाठी सज्ज

1-5 जूनदरम्यान होणार यानाचे प्रक्षेपण
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स पुन्हा एकदा अंतराळात झेपावण्यासाठी सज्ज आहेत. सुनीता विलियम्स बोइंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून अंतराळात पोहोचतील. बोइंगच्या स्टारलायनरचे प्रक्षेपण 1 ते 5 जूनदरम्यान होऊ शकते. पूर्वी हे अंतराळयान चालू महिन्याच्या प्रारंभी प्रक्षेपित होणार होते, परंतु तांत्रिक बिघाडामुळे हे प्रक्षेपण टळले होते.
सुनीता विलियम्स वयाच्या 41 व्या वर्षी पहिल्यांदा 2006 साली नासाच्या एक्सपेडिशन-14 अंतर्गत अंतराळात पोहोचल्या होत्या. तेथे त्यांनी चारवेळा स्पेसवॉक केला होता. यानंतर 2012 मध्ये नासाच्या एक्सपेडिशन-33 मोहिमेच्या अंतर्गत त्या दुसऱ्यांदा अंतराळात पोहोचल्या होत्या. यावेळी सुनीता विलियम्स खासगी कंपनी बोइंगच्या स्टारलायनर अंतराळयानातून अंतराळप्रवास करणार आहेत. त्यांनी अंतराळात एकूण 322 दिवस वास्तव्य केले आहे.
बोइंगच्या अंतराळयानात सुनीता यांना बुच विल्मोर यांची आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकाच्या प्रवासासाठी साथ मिळणार आहे. एलन मस्क यांच्या स्पेसएक्सनंतर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंत अंतराळवीरांना नेण्यास आणि परत आणण्यास सक्षम असणारी बोइंग ही दुसरी खासगी कंपनी ठरणार आहे.
2019 मध्ये बोइंगच्या स्टारलायनर अंतराळयानाला मानवरहित मोहिमेसाठी अंतराळात पाठविण्यात आले होते, परंतु ही मोहीम अयशस्वी ठरली होती. यानंतर 2022 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात बोइंगला यश मिळाले होते.