फेब्रुवारीत वाढले उन्हाचे तापमान
पारा 35 अंशांवर, नागरिक हैराण
बेळगाव : मागील काही दिवसांपासून थंडी कमी होऊन पारा वाढू लागला आहे. फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच पारा 30 ते 35 अंशांच्या पुढे जात आहे. त्यामुळे येत्या काळात पुन्हा तापमान वाढण्याची चिंता आहे. पहाटे व रात्री वगळता पारा वाढत आहे. जानेवारी महिन्यात थंडीची तीव्रता वाढली होती. त्यानंतर फेब्रुवारी सुरुवातीपासूनच हळूहळू थंडी गायब होऊन उष्म्यात वाढ होऊ लागली आहे. मार्च महिन्यात पारा 30 ते 35 अंशांच्या पुढे असतो. यंदा मात्र फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यातच पाऱ्याने 35 अंशाच्या पुढे धाव घेतली आहे. त्यामुळे अतितापमानाचा नागरिकांना सामना करावा लागत आहे. यंदा म्हणावा तसा पाऊस झाला नाही. त्यामुळे सर्वत्र पाण्याची टंचाई भासू लागली आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे नदी आणि तलावातील पाण्याचे बाष्पीभवन होऊन पाणीपातळी कमी होणार आहे. आधीच पाणी समस्या गंभीर बनू लागली आहे. त्यातच वाढत्या उन्हामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होणार आहेत. फेब्रुवारीत पारा 35 अंशांपर्यंत जात असल्याने एप्रिल-मे महिन्यात पारा 39 अंशांपयर्तिं जाईल, असा अंदाजही हवामान खात्याने वर्तविला आहे.
शहरातील कमाल तापमानाचे प्रमाण
दिनांक कमाल तापमान
2 फेब्रु. 29.6 डिग्री
3 फेब्रु. 30.6 डिग्री
4 फेब्रु. 32.4 डिग्री
5 फेब्रु. 33.0 डिग्री
6 फेब्रु. 33.8 डिग्री
7 फेब्रु. 35.2 डिग्री