दहावी परीक्षेची खात्याकडून जय्यत तयारी

उद्या पहिला पेपर : सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त : भरारी पथकाची नियुक्ती प्रतिनिधी/ बेळगाव दहावीच्या परीक्षेला सोमवार दि. 25 मार्चपासून प्रारंभ होत असल्याने शनिवारी बैठक क्रमांक घालण्यात आले. परीक्षेमध्ये कोणतीही कसर राहू नये, यासाठी गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तेथील तयारीची पाहणी केली. बेळगाव जिल्ह्यात एकूण 224 परीक्षा केंद्रांवर 80,724 विद्यार्थी दहावीची परीक्षा […]

दहावी परीक्षेची खात्याकडून जय्यत तयारी

उद्या पहिला पेपर : सीसीटीव्ही, पोलीस बंदोबस्त : भरारी पथकाची नियुक्ती
प्रतिनिधी/ बेळगाव
दहावीच्या परीक्षेला सोमवार दि. 25 मार्चपासून प्रारंभ होत असल्याने शनिवारी बैठक क्रमांक घालण्यात आले. परीक्षेमध्ये कोणतीही कसर राहू नये, यासाठी गटशिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांनी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन तेथील तयारीची पाहणी केली.
बेळगाव जिल्ह्यात एकूण 224 परीक्षा केंद्रांवर 80,724 विद्यार्थी दहावीची परीक्षा देणार आहेत. त्यादृष्टीने सार्वजनिक शिक्षण विभागाने मागील पंधरा दिवसांपासून तयारी सुरू केली आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावर वेळेत प्रश्नपत्रिका दाखल व्हाव्यात, असे नियोजन करण्यात आले आहे. तसेच सीसीटीव्हीची नजर परीक्षा केंद्रांवर असल्याने कोणतेही अनुचित प्रकार घडणार नाहीत, याची खबरदारी घेतली जात आहे. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने शनिवारीच शिक्षकांनी बैठक क्रमांक घातले असून, सोमवारी रंगपंचमी असल्याने विद्यार्थ्यांनी वेळेत परीक्षा केंद्रांवर पोहोचण्याचे आवाहन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केले आहे.
शिक्षण विभागाकडून काटेकोर नियोजन
शुक्रवारी बीकॉमचा पेपर फुटल्याने खळबळ उडाली. एका महाविद्यालयात पेपरफुटीची घटना झाल्यानंतर संबंधित पेपर रद्द करण्याची नामुष्की आली. यामुळे असे प्रकार दहावी परीक्षेदरम्यान घडू नयेत, यासाठी शिक्षण विभागाने काटेकोर नियोजन केले आहे. शैक्षणिक जिल्ह्यात कोठेही कॉपीला थारा देऊ नये, अशा सूचना पर्यवेक्षक तसेच केंद्र प्रमुखांना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांना मिळणार मध्यान्ह आहार
एसएसएलसी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भोजनाची व्यवस्था राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना यावर्षी परीक्षेनंतर मध्यान्ह आहार दिला जाणार आहे. राज्य सरकारने सर्व शाळांना सूचना केल्या असून, पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना 10 एप्रिलपर्यंत मध्यान्ह आहाराचे वितरण केले जाणार आहे. याबरोबरच विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शौचालय व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था प्रत्येक परीक्षा केंद्रावर करण्यात आली आहे.
मोफत बससेवेची व्यवस्था
25 मार्च ते 6 एप्रिल या दरम्यान दहावीची परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना मोफत बसप्रवास करता येणार आहे. परिवहन मंडळाने परीक्षा कालावधीसाठी अधिक बसची व्यवस्था केली असून, विद्यार्थ्यांनी परीक्षेचे हॉलतिकीट दाखवून मोफत प्रवासाचा लाभ घ्यायचा आहे. गर्दीच्या मार्गांवर परीक्षेच्या कालावधीत अधिक बस धावणार असल्याने या व्यवस्थेचा लाभ घ्यावा, असे आवाहन शिक्षण विभागातर्फे करण्यात आले आहे.
रंगपंचमी असल्याने निर्धारित वेळेपूर्वी परीक्षा केंद्र गाठा
दहावीची परीक्षा सोमवारपासून सुरू होत असून परीक्षेचे काटेकोरपणे नियोजन करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी अनेक ठिकाणी रंगपंचमी असल्याने विद्यार्थी व पालकांनी घरातून लवकर बाहेर पडून निर्धारित वेळेपूर्वी परीक्षा केंद्र गाठावे.
मोहनकुमार हंचाटे (जिल्हा शिक्षणाधिकारी)