गोव्याचा यशस्वी कबड्डीपटू : नेहाल सावळ देसाई

गोवा संघाचा कर्णधार-प्रो कब•ाr लीग स्पर्धेत निवड नरेश गावणेकर /फोंडा कबड्डी खेळात चपळता, मजबूत शरीर, वेग व लवचिकता ही कौशल्ये असल्यास खेळाडू यशस्वी होत असतो. गोव्याचा कबड्डीपटू नेहाल बाळकृष्ण सावळ देसाई यांच्यात ही सर्व कौशल्ये आढळत असून तो या खेळात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. एक उत्कृष्ट रेडर म्हणून त्याने नावलौकीक मिळविला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत त्याने […]

गोव्याचा यशस्वी कबड्डीपटू : नेहाल सावळ देसाई

गोवा संघाचा कर्णधार-प्रो कब•ाr लीग स्पर्धेत निवड
नरेश गावणेकर /फोंडा
कबड्डी खेळात चपळता, मजबूत शरीर, वेग व लवचिकता ही कौशल्ये असल्यास खेळाडू यशस्वी होत असतो. गोव्याचा कबड्डीपटू नेहाल बाळकृष्ण सावळ देसाई यांच्यात ही सर्व कौशल्ये आढळत असून तो या खेळात उल्लेखनीय कामगिरी करीत आहे. एक उत्कृष्ट रेडर म्हणून त्याने नावलौकीक मिळविला आहे. राष्ट्रीय स्पर्धेत त्याने दहा वेळा गोव्याचे प्रतिनिधीत्व केले असून सद्या संघाचा कर्णधार आहे. प्रो कबड्डी लीग स्पर्धेत त्याची निवड झाली आहे. राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत नेहालच्या नेतृत्वाखालील गोवा संघाने 2022 साली कांस्यपदक पटकावले. यंदा मार्चमध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत गोव्याला उपांत्यपूर्व फेरीत चंदिगढ विरुद्ध केवळ दोन गुणांनी हार पत्करावी लागली. परंतू गोवा संघाने व कर्णधार नेहालने उत्कृष्ट कामगिरी करुन सर्वांचे लक्ष वेधले आहे. गोवा राज्य स्पर्धेत नेहाल पेडणेच्या आदर्श युवक संघासाठी तर गोवा कबड्डी लीग स्पर्धेत मापोजी-म्हापसा संघासाठी खेळत आहे.
शालेय ते विद्यापीठ संघाचे प्रतिनिधीत्व
नेहालचे वडील बाळकृष्ण सावळ देसाई हे माजी राष्ट्रीय कबड्डी खेळाडू आहे. त्यांच्यासोबत लहानपणापासून तो खेळ बघण्यात जात असे. त्यामुळे त्याला कबड्डी खेळाची आवड निर्माण झाली. शालेय संघातून तो कबड्डी खेळायला लागला. भगवती हायस्कूल पेडणे, हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालय, सेंट झेवियर महाविद्यालय म्हापसा तसेच गोवा विद्यापीठ संघाचे प्रतिनिधीत्व करुन संघांना पारितोषिके मिळवून देण्यासाठी प्रमुख योगदान दिले. पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत त्याने दोन वेळा गोवा विद्यापीठाचे नेतृत्व केले. 2020 सालापासून तो गोवा संघाचा कर्णधार झाला आहे. कबड्डी बरोबरच अॅथलेटिक्स, हँडबॉल, तायक्वांदो, बुद्धिबळ व बास्केटबॉल खेळातही तो पारंगत असून त्याने या खेळांत आंतर महाविद्यालयीन व राज्य पातळीवरील स्पर्धेत सहभाग दर्शविला आहे.
एमपीएड पदव्यूत्तर पदवी प्राप्त
सावळवाडा-पेडणे येथील 25 वर्षीय नेहाल विज्ञान पदवीधर आहे. त्यानंतर त्याने गोवा सेलेसियन सोसायटीच्या डॉन बॉस्को फिजिकल एज्युकेशन व स्पोर्ट्स महाविद्यालय पणजी येथून बीपीएड पदवी व कॉलेज ऑफ बार्शीमधून सोलापूर विद्यापीठाचे एमपीएड पदव्यूत्तर पदवी मिळविली आहे. सद्या तो हरमल पंचक्रोशी उच्च माध्यमिक विद्यालयात हंगामी शारीरिक शिक्षण शिक्षक म्हणून काम करीत आहे.
गोवा कबड्डी संघटनेचा पाठींबा
कबड्डीमधील त्याच्या या उत्कृष्ट योगदानाबद्दल अनेक ठिकाणी त्याचा सन्मान करण्यात आला आहे. त्याच्या या प्रवासात आई बिना व वडील बाळकृष्ण यांचे नेहमीच प्रोत्साहन मिळाले आहे. त्याच्या प्रत्येक सामन्यासाठी पाठींबा देण्यासाठी ते उपस्थित राहतात. कबड्डीचे प्राथमिक धडे त्याला वडीलांकडूनच मिळाले आहे. गोवा संघासाठी खेळताना गोवा क्रीडा प्राधिकरणचे प्रशिक्षक योगेश सावळ देसाई, प्रसाद गांवस व गोकुळदास गांवकर यांचे मार्गदर्शन मिळत आहे. राष्ट्रीय स्पर्धापूर्व शिबिरात रायगडचे प्रशिक्षक प्रशांत मुकूल यांचेही मार्गदर्शन लाभले. गोवा कबड्डी संघटनेच्या अध्यक्ष रुक्मिणी कामत, दत्ताराम कामत व इतर पदाधिकाऱ्यांचे सदैव पाठींबा व मार्गदर्शन लाभत असते.
प्रो कबड्डी लीग स्पर्धेत निवड
राष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे नेहालची 2022 साली नवव्या मोसमात प्रो कबड्डी लीग स्पर्धेत निवड झाली. युपी योद्धा संघाने त्याला करारबद्ध केले. त्यानंतरच्या मोसमात दुखापत झाल्याने तो सहभागी होऊ शकला नाही. प्रो कबड्डी स्पर्धेत निवड झालेला गोमंतकातील तो दुसरा खेळाडू ठरला आहे. त्यापूर्वी स्पर्धेच्या पहिल्या मोसमात तिसवाडीच्या हरीश जल्मीची निवड झाली होती. आगामी मोसमात त्याला देशातील प्रमुख संघांकडून ‘ऑफर’ येण्याची संधी आहे. प्रो कबड्डी बरोबरच भारतीय संघासाठी खेळण्याचे त्याचे उद्दिष्ट्या आहे. त्यासाठी कठोर मेहनत घेण्याची त्याची तयारी आहे. शारीरिक तंदुरुस्ती व वाचन हे त्याचे छंद आहे. त्याच्यात नेतृत्व गुण असून जबाबदारीची जाणीव असलेला तो युवक आहे. इतरांचे ऐकण्याची व त्यांच्याकडून शिकून घेण्याची क्षमता असल्याने तो कबड्डी क्षेत्रात निश्चितच उच्च ध्येय गाठेल.