रोहयोतील भ्रष्टाचाराचा लेखी अहवाल सादर करा

ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांना न्यायालयाचा आदेश : केदनूर ग्रा. पं. भ्रष्टाचार प्रकरण वार्ताहर/अगसगे  केदनूर ग्रा.पं.मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविलेल्या गावच्या 16 विकास कामांमध्ये कामे न करता कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामध्ये अध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी व क्लार्क यांचे संगनमत असून लाखो रुपयांची ग्रा.पं.मधून अक्षरश: लूट केली आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते मारुती भागाण्णा राजाई यांनी संबंधित जिल्हा […]

रोहयोतील भ्रष्टाचाराचा लेखी अहवाल सादर करा

ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांना न्यायालयाचा आदेश : केदनूर ग्रा. पं. भ्रष्टाचार प्रकरण
वार्ताहर/अगसगे 
केदनूर ग्रा.पं.मध्ये रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविलेल्या गावच्या 16 विकास कामांमध्ये कामे न करता कागदोपत्री कामे झाल्याचे दाखवून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. त्यामध्ये अध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी व क्लार्क यांचे संगनमत असून लाखो रुपयांची ग्रा.पं.मधून अक्षरश: लूट केली आहे, अशी तक्रार सामाजिक कार्यकर्ते मारुती भागाण्णा राजाई यांनी संबंधित जिल्हा पंचायतीकडे सबळ पुराव्यांसहित केली होती. सध्या हे प्रकरण ओंबूड्समन न्यायालयात सुरू आहे.
ओंबूड्समन न्यायालयाच्या आदेशानुसार वरील प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी पुन्हा ता.पं. कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटून लेखी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. त्यानुसार ता.पं.कार्यकारी अधिकारी आपल्या पथकासह केदनूर ग्रा.पं.ला दि. 18 नोव्हेंबर रोजी भेट देणार आहेत. अशी नोटीस ग्रा.पं.ला व तक्रारदारांना उपस्थित राहण्याबद्दल बजावले आहे. त्यामुळे भ्रष्टाचारात सहभागी पदाधिकाऱ्यांची व पीडिओ, क्लार्क यांचे धाबे दणाणले आहेत. आता न्यायालयाच्या आदेशाकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
केदनूर व मण्णीकेरी या दोन्ही गावची मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. सामाजिक कार्यकर्ते मारुती राजाई यांनी दि. 7 मार्च 2025 रोजी जि. पं.कडे लेखी तक्रार दिली होती. यामध्ये पंचायतीचा कार्यकाळ सुरुवात झाल्यापासून आतापर्यंतच्या विकास कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. ग्रामपंचायतच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कामावर न गेलेल्या ग्रामस्थांच्या नावे बिले जमा करून ती रक्कम परत घेऊन परस्पर लाटण्यात आले आहेत. त्यामधील एक रुपयादेखील त्या ग्रामस्थांना मिळाला नाही.
कामाला न जाताच 76 हजार रुपये कमविले
गावातील चंद्रगौडा पाटील यांची विहीर काढली आहे, असे कागदोपत्री लेखी अहवाल सादर करून कंत्राटदाराच्या नावाने तब्बल 2 लाख 22 हजार 772 रुपये लाटण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र विहिरीचे कामच झाले नाही. त्यामुळे विहीर हरवली आहे काय, असा प्रश्न देखील ग्रामस्थांतून उपस्थित होत आहे. तसेच शंकर वर्गे यांच्या नावावर 76 हजार 796 रुपये काढण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात ते कधी कामालाच गेले नाहीत. मेटलिंग रस्त्याच्या कामामध्ये देखील अफरातफर करून निधी हडप केला आहे. त्याचप्रमाणे केदनूर, मण्णीकेरी गावामध्ये विविध विकास कामांच्या नावावर लाखो रुपयांचा घोटाळा केला आहे. रस्त्याकडेला स्मशानमार्गे झाडे लावल्याचे दाखवून व त्यांच्या देखभालीसाठी डीएपी व विविध रासायनिक खते त्या झाडांच्या उपयोगासाठी वापरल्याचे खोटी बिले लावून ग्रा.पं.मधील शासनाच्या निधीमध्ये भ्रष्टाचार केला आहे. सुमारे 16 कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करून लाखो रुपयांची लूट केली आहे, अशी लेखी तक्रार मारुती राजाई यांनी केली आहे. यामध्ये अध्यक्ष, ग्रामविकास अधिकारी, क्लार्क व रोजगार हमी योजनेचा अभियंता यांचा समावेश आहे. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झाल्यास कठोर कारवाई व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
ता. पं. अधिकारी उद्या ग्रा. पं.ला भेट देणार
या सर्व प्रकरणाचा अहवाल सादर करण्यासाठी मंगळवार दि. 18 नोव्हेंबर रोजी  ता. पं. कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायतला भेट देणार असून वरील तक्रार केलेल्या 16  कामांची पाहणी करून संपूर्ण अहवाल ओंबूड्समन न्यायालयात सादर करणार आहेत. यासाठी तक्रारदार मारुती राजाई आणि ग्रामविकास अधिकारी यांना आपापले पुरावे घेऊन दि. 18 रोजी दुपारी 12 वाजता ग्रामपंचायतला उपस्थित रहावे, अशी नोटीस देण्यात आली आहे. तरी या प्रकरणाकडे संपूर्ण ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.