सुभाषित रत्नाकर

वित्ते त्याग? क्षमा शक्तौ दु:खे दैन्यविहीनता। निर्दम्भता सदाचारे स्वभावोयं महात्मनाम्? अर्थ- संपत्तीचा त्याग करणे, प्रबळ असताना क्षमा करणे, दु:खद प्रसंगात दीनवाणे न होणे, सदाचारात ढोंगीपणा नसणे, असा महान लोकांचा स्वभाव असतो. एका गावात एका महान नेत्याचा पुतळा उभारण्यात आला. त्याच्याबद्दल माहिती विचारताना सहज लोक सांगून गेले. या नेत्याने पाच कारखाने उभारले, मोठी शेतीवाडी केली, प्रचंड […]

सुभाषित रत्नाकर

वित्ते त्याग? क्षमा शक्तौ दु:खे दैन्यविहीनता।
निर्दम्भता सदाचारे स्वभावोयं महात्मनाम्?
अर्थ- संपत्तीचा त्याग करणे, प्रबळ असताना क्षमा करणे, दु:खद प्रसंगात दीनवाणे न होणे, सदाचारात ढोंगीपणा नसणे, असा महान लोकांचा स्वभाव असतो.
एका गावात एका महान नेत्याचा पुतळा उभारण्यात आला. त्याच्याबद्दल माहिती विचारताना सहज लोक सांगून गेले. या नेत्याने पाच कारखाने उभारले, मोठी शेतीवाडी केली, प्रचंड पैसा आहे, धनाड्या नेता, अनेक गोरगरिबांना सतत मदत करणारा मसीहा वगैरे वगैरे. मला प्रश्न पडला या सगळ्यात यानं स्वत:चे असे काय खर्च केले? इथे सोनवणे नावाचा रस्त्यावरच्या भिकाऱ्यांचा डॉक्टर माझ्या डोळ्यासमोर आला. कुठेही रस्त्याच्या कडेला दाढी वाढलेला लुळा पांगळा अनेक दिवसांचा भुकेलेला असा माणूस उचलून आपल्या गाडीत घ्यायचा. त्याला स्वच्छ करायचा. जेऊ खाऊ घालायचा आणि त्याच्या पायावर त्याला उभं करायचा. हा डॉक्टर मला या नेत्यापेक्षा महान वाटला. आपल्या संपत्तीचा, ज्ञानाचा गोरगरिबांसाठी त्याग करणारा तो महान व्यक्ति ठरला.
सकाळी झोपेतून उठल्यावर पृथ्वीवर पाय ठेवणे आधी तिची क्षमा मागणारे, आजचा दिवस दाखवल्याबद्दल देवाचे धन्यवाद मानणारे, कुणाच्याही हातून चूक झाल्यानंतर त्याला मोठ्या मनाने माफ करणारे लोक आमच्या संस्कृतीमुळे आम्हाला खूप लाभले पण मुळात क्षमा न करणं हा माणसाचा अहंकारी माणसाचा फार मोठा दुर्गुण आहे. सख्ख्या भावाशी पैशावरून झालेल्या भांडणामुळे त्याला माफ न करणारा, त्याला आपल्या दारात येऊ न देणाऱ्या आपल्या मुलीला मुलांना असंच वागणारा माणूस कधीच क्षमाशील नसतो पण आमची संस्कृती, आमचे नातेसंबंध आणि आमचे संस्कार यामुळे आमच्या प्रत्येकाच्या रक्तात क्षमा करणं हा गुण येतोच आणि तो वापरला जातोच. अशी महान माणसं इथे ठाई ठाई दिसतात.
कुसुमाग्रजांची कविता ‘कणा’ वाचताना कोणतेही दु:ख आले तरी कधी कोलमडून जायचं नसतं, याची खात्री पटते. माळीण गाव किंवा कोकणातलं एखादं गाव डोंगराखाली गाडलं गेलं तरी माणसं पुन्हापुन्हा उभी राहतात. कोलमडून जात नाहीत, ती डोंगराएवढी वाटतात. पंढरीच्या वारीला साधेपणाने जाणारे वारकरी कुठल्याही डामडौलापेक्षा भक्तीभावाने निघतात. आमचे माणुसकीचे संस्कार जपतात तेव्हा तुका आकाशा एवढे होते म्हणजे नेमकं काय ते पटतं. इथे कोणताही ढोंगीपणा नसतो. मिरवायची हाव नसते. म्हणूनच ही माणसं महान वाटतात.