सुभाष फोटोजचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

फोटोग्राफी क्षेत्रात सुभाष फोटोजचा वेगळा ठसा : कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार बेळगाव : ओऊळकर बंधूंनी सुरू केलेला ‘सुभाष फोटोज’ हा उद्योग समूह केवळ बेळगावच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यामध्येही सर्वतोपरी पोहोचला आहे. फोटोग्राफी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुभाष फोटोजने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे या उद्योग समूहाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असून […]

सुभाष फोटोजचे सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण

फोटोग्राफी क्षेत्रात सुभाष फोटोजचा वेगळा ठसा : कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार
बेळगाव : ओऊळकर बंधूंनी सुरू केलेला ‘सुभाष फोटोज’ हा उद्योग समूह केवळ बेळगावच नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यामध्येही सर्वतोपरी पोहोचला आहे. फोटोग्राफी क्षेत्रात नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुभाष फोटोजने आपला वेगळा ठसा उमटविला आहे. त्यामुळे या उद्योग समूहाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे होत असून त्यांनी अशाच प्रकारे शताब्दीही पूर्ण करावी, असे गौरवोद्गार कॉ. कृष्णा मेणसे यांनी व्यक्त केले. बेळगावच्या ‘सुभाष फोटोज’ या व्यवसायाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. मंगळवारी हॉटेल आदर्श पॅलेस येथे झालेल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कॉ. कृष्णा मेणसे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव कागणीकर, आश्रय फौंडेशनच्या संस्थापिका नागरत्ना व निवृत्त प्राचार्य व्ही. ए. पाटील उपस्थित होते.
प्रारंभी संचालक सुभाष ओऊळकर यांनी फोटोग्राफी क्षेत्रातील सुभाष फोटोजच्या प्रगतीचा आलेख सादर केला. टिळकवाडी, बेळगाव, कोल्हापूर व गोवा येथील चार शाखांमध्ये दीडशेहून अधिक कर्मचारी काम करत आहेत. ओऊळकर परिवाराच्या तीन पिढ्या एकत्रितरीत्या या क्षेत्रामध्ये काम करत असल्याचेही त्यांनी सांगितले. मोहन चव्हाण यांनी 50 वर्षांहून अधिक सेवा दिली आहे. प्रकाश जाधव यांनी कोल्हापूर युनिटमध्ये 48 वर्षे, विनायक कंग्राळकर यांनी टिळकवाडी येथील युनिटमध्ये 31 वर्षे सेवा दिली आहे. या व अशा 27 कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सुभाष फोटोजतर्फे आश्रय फौंडेशनला 51 हजार रुपये, शिवाजीराव कागणीकर व कृष्णा मेणसे यांना प्रत्येकी 25 हजार रुपयांचा धनादेश त्यांच्या सामाजिक कार्यासाठी देण्यात आला. स्वाती ओऊळकर यांनी प्रास्ताविक केले. दीपक ओऊळकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते अल्बमचे अनावरण करण्यात आले. ज्ञानेश ओऊळकर यांनी आभार मानले. यावेळी शशिकांत ओऊळकर, दिनेश ओऊळकर, राजू ओऊळकर यांसह इतर सदस्य उपस्थित होते.