क्रीडांगणाअभावी विद्यार्थी खेळापासून वंचित

बेळगाव जिल्ह्यातील 602 शाळा मैदानाविना : विद्यार्थ्यांचे भवितव्य होतेय अंधकारमय बेळगाव : लहान मुलांना शारीरिक कवायती करण्यासाठी मैदानांची आवश्यकता असते. परंतु बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक शाळांना स्वत:चे मैदान नसल्याने विद्यार्थ्यांचे क्रीडा व आरोग्य क्षेत्रात नुकसान होत आहे. बेळगाव जिल्ह्यात 602 शाळांना मैदान नसल्याने विद्यार्थ्यांना खेळासाठी खुल्या जागांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेला मैदान […]

क्रीडांगणाअभावी विद्यार्थी खेळापासून वंचित

बेळगाव जिल्ह्यातील 602 शाळा मैदानाविना : विद्यार्थ्यांचे भवितव्य होतेय अंधकारमय
बेळगाव : लहान मुलांना शारीरिक कवायती करण्यासाठी मैदानांची आवश्यकता असते. परंतु बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक शाळांना स्वत:चे मैदान नसल्याने विद्यार्थ्यांचे क्रीडा व आरोग्य क्षेत्रात नुकसान होत आहे. बेळगाव जिल्ह्यात 602 शाळांना मैदान नसल्याने विद्यार्थ्यांना खेळासाठी खुल्या जागांचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे प्रत्येक शाळेला मैदान उपलब्ध करून देण्याची मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. सरकारी शाळांना योग्य सोयीसुविधा सरकारकडून पुरविल्या जात नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील अनेक शाळा लहान जागेमध्ये भरविल्या जात आहेत. या शाळांना स्वत:ची इमारत नसल्याने भाडेतत्त्वावर तसेच इतरांच्या जागेमध्ये भरविल्या जात आहेत. त्यामुळे या शाळांना मैदान उपलब्ध नाहीत.
सरदार्स मैदानांवर इतर कार्यक्रमांना परवानगी
मागील काही वर्षांपासून सरकारने क्रीडा शिक्षकांची भरती थांबविली असल्याने सरकारी शाळांमध्ये शारीरिक शिक्षण शिक्षक उपलब्ध नाहीत. शाळांना मैदान नसल्यामुळे विद्यार्थ्यांना क्रीडा प्रकारांचा सराव करता येत नाही. बेळगाव शहरात अनेक शाळांना क्रीडांगण नसल्याने त्यांना इतर शाळा अथवा खुल्या जागांचा वापर करावा लागतो. परंतु सरदार्स मैदानांवर नेहमी इतर कार्यक्रमांना परवानगी दिली जात असल्याने क्रीडा प्रकारांसाठी मैदान उपलब्ध होत नाही. संपूर्ण राज्यातील 17,384 सरकारी शाळांना क्रीडांगण नसल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधकारमय झाले आहे. सरकारी शाळांमध्ये मैदान, शौचालय तसेच पक्की इमारत नसल्याने विद्यार्थ्यांची संख्या कमी होत चालली आहे. त्यामुळे सरकारी शाळांना सर्व सुविधा पुरविणे गरजेचे आहे.