विद्यार्थ्यांची झोप आणि स्वास्थ्य

बदलत्या जीवनशैलीनुसार उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे शालेय विद्यार्थ्यांची झोप पुरेशी होत नाही या कारणास्तव सकाळी लवकर सुरु होणाऱ्या शाळेच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा, अशी सूचना महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केली आहे.  त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या झोपेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लहान मुलांसाठी किती वेळ झोप आवश्यक असते? या महत्त्वाच्या विषयावरचा हा लेख. चार महिने ते बारा महिन्याचे बाळ 12 […]

विद्यार्थ्यांची झोप आणि स्वास्थ्य

बदलत्या जीवनशैलीनुसार उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे शालेय विद्यार्थ्यांची झोप पुरेशी होत नाही या कारणास्तव सकाळी लवकर सुरु होणाऱ्या शाळेच्या वेळा बदलण्याचा विचार व्हावा, अशी सूचना महाराष्ट्राच्या राज्यपालांनी केली आहे.  त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांच्या झोपेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. लहान मुलांसाठी किती वेळ झोप आवश्यक असते? या महत्त्वाच्या विषयावरचा हा लेख.
चार महिने ते बारा महिन्याचे बाळ 12 ते 16 तास झोपलेले असते. एक ते दोन वर्षाच्या मुला-मुलींकरीता 11 ते 14 तास झोप आवश्यक असते. तीन ते पाच वर्षाच्या बालकांकरिता 10 ते 12 तास झोपेची गरज असते. म्हणजेच कोणत्याही ज्युनियर के.जी, सिनियर के.जी शाळेची वेळ सकाळी दहा-अकरा वाजण्यापूर्वी असू नये कारण ही मुले रात्री दहा वाजता झोपल्यास सकाळचे सात-आठ वाजेपर्यंत उठू शकत नाहीत. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना जागे केल्यास त्यांची दिवसभर चिडचिड होणार, त्यांचा बराचसा दिवस रडण्यात,  तक्रार करण्यात,  हट्ट करण्यात जाणार.
वयाची सहा वर्षे पूर्ण झाल्याशिवाय मुला-मुलींना पहिलीच्या वर्गामध्ये प्रवेश दिला जात नाही. सहा ते बारा वर्षाच्या मुलांना किमान नऊ तासांची झोप आवश्यक असते. याचा अर्थ इयत्ता पहिली ते पाचवीमध्ये शिकणारी मुले रात्री दहा वाजता झोपल्यास सकाळी सात वाजण्यापूर्वी पूर्णपणे जागी होऊ शकत नाहीत कारण त्यांची झोप पूर्ण झालेली नसते. पहिली ते पाचवीपर्यंतची शाळा सकाळी साडेसात वाजता सुरु होणार असल्यास त्या मुलांना सकाळी साडेसहा वाजता उठवावे लागेल.  ही मुले शहरातील असल्यास त्यांना शाळेत जाण्यासाठी लागणारा अर्ध्या तासाचा वेळ गृहीत धरल्यास त्यांना पहाटे सहा वाजता उठवावे लागेल. म्हणजेच कोणतीही प्राथमिक शाळा सकाळी 11 वाजता सुरु झाल्यास त्या बालकांची झोप पूर्ण झालेली असेल. इयता पाचवी नंतरच्या कोणत्याही मुलांना किमान आठ तास झोप आवश्यक असते. खरे तर हा झोपेचा नियम लहान-मोठ्या सर्वांसाठी लागू आहे.  त्यामुळे पाचवी ते दहावी इयत्तेच्या माध्यमिक शाळेची वेळ सकाळी 7.30 ते दुपारी 12.30 असू शकते.
महाराष्ट्र राज्याच्या शहरातील अनेक शाळा मराठी/सेमी इंग्लिश आणि इंग्रजी माध्यम अशा दोन माध्यमाच्या असतात. त्याकरिता एकाच इमारतीमधील वर्ग वापरल्यामुळे एका माध्यमाची शाळा सकाळी सुरु होते आणि दुसऱ्या माध्यमाची शाळा दुपारी सुरु होते. अनेक शाळांनी अनेक विद्यार्थ्यांना सामावून घेऊन अधिकाधिक उत्पन्न मिळवण्यासाठी तयार केलेला हा शॉर्टकट आहे. ज्यामुळे ठराविक माध्यमाच्या विद्यार्थ्यांना सकाळी लवकर शाळेत जावे लागते. अशी तडजोड किती शाळांनी प्राथमिक शाळेसाठी केली आहे, याचा आढावा राज्य सरकारने घ्यायला हवा कारण त्यांच्याकडे तो तपशील उपलब्ध आहे. प्राथमिक शाळा सकाळी 10.30 पूर्वी सुरु करता येणार नाहीत, असा नियम राज्य सरकारला करणे सहज शक्य आहे.
लवकर निजे, लवकर उठे?
बदलते राहणीमान असल्यामुळे झोप कमी होण्याचा प्रश्न नेमका निर्माण कसा झाला? शहरामध्ये आई-वडील दोघांनी अर्थार्जन करणे आवश्यक असते आणि गरज असो वा नसो, स्त्रियांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी अर्थार्जन करणे आवश्यक आहे. बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर तत्परतेने बाळाच्या आईने बाळाला पाळणाघरामध्ये ठेवून अर्थार्जन सुरु ठेवावे, त्यामध्ये काहीच गैर नाही.  बाळाला पाळणाघरामध्ये ठेवताना बाळांची काळजी घेणाऱ्यांनी समस्त बाळांना किती वेळ झोपवून ठेवावे यावर काही मर्यादा असावी अन्यथा बाळ तिथे (किंवा आजी-आजोबांकडे) दुपारी तीन ते चार तास झोपल्यास रात्रीची झोप उशिरा सुरु होईल आणि त्याचा परिणाम उशिरा जागे होण्यावर होतो, आई-वडील कामावर जाण्यापूर्वी त्यांचा सहवास बाळाला मिळण्याचे प्रमाण कमी होते. बाळाला दुपारी तीन-चार तास दामटुन झोपवणे नव्हे म्हणजे त्या बाळावर जीव लावणे नव्हे.  एकूणच बाळांच्या दुपारच्या झोपेवर काही नियंत्रण असावे. वामकुक्षी म्हणजेच दुपारची झोप ही माणसाची, विशेषत: कष्टाची कामे न करणाऱ्या माणसाची गरज नव्हे. त्यामुळे त्या सवयीमधून शक्य तितक्या लवकर सुटका करून घ्यावी, ज्याची सुरुवात बालकांच्या पालकांनी स्वत:पासून करावी. त्याचप्रमाणे संध्याकाळचे जेवण शक्य तितके लवकर म्हणजे सात किंवा आठ वाजता घेतल्यास बालके रात्री नऊ ते दहा वाजता झोपू शकतात. परंतु आई-वडील टिव्हीवरील कौटुंबिक सिरीयलमधील किंवा राजकीय नेत्यांची आवाजी चर्चा-भांडणे बघता बघता भोजन करत असतील तर रात्रीचे दहा वाजून गेलेले असतात. टीव्ही बघितल्यानंतर लगेच मुला-मुलींना झोप लागत नाही. त्याला पर्याय म्हणून काही पालक मुलांच्या हातात मोबाईल देतात, ती सवय चुकीची आणि धोकादायक असते. म्हणूनच एकूण घराला रात्रीचे भोजन लवकरात लवकर घेण्याची सवय लागणे आवश्यक आहे.
आहार
झोपेच्या वेळापत्रकाचा रोजच्या आहाराशी जवळचा संबंध आहे. सकाळी घरामधून बाहेर पडताना बालक-पालकांनी भरपेट खाणे आवश्यक असते. ग्लास भरून दुध दिल्यामुळे शाळेत जाणाऱ्या मुलांची भूक मरते म्हणूनच शाळेत जाणाऱ्या बालकांच्या आहारामध्ये वैविध्य असावे. ग्लासभर दुधात काही मिसळल्यामुळे बुद्धी तल्लख होत नसते. पहिली-दुसरी-तिसरीमध्ये शिकणाऱ्या मुला-मुलींना ग्लास भरून दुध दिल्यावर नाश्ता करण्यास सांगितले तर ती मुले त्याला नकार देतात कारण त्यांचे पोट भरलेले असते. म्हणूनच इयत्ता पहिलीपासून वाढत्या इयत्तेनुसार दुध पिण्याचे प्रमाण कमी करायला हवे किंवा त्या दुध पिण्याला इतर खाण्याची जोड द्यायला हवी.  चपाती-भाताच्या तुलनेत भाजी-सॅलड-फळे खाण्याचे प्रमाण जास्त असावे.  कोरड्या भाज्यांपेक्षा पातळ भाजीला प्राधान्य असावे आणि पाणी पिण्याचे प्रमाण अधिक असावे. शालेय विद्यार्थ्यांनी संध्याकाळी सात वाजता कुरकुरे किंवा तत्सम काही चटपटीत खाल्ले तर ती मुले साडेसात-आठ वाजता पूर्ण भोजन करणार नाहीत. म्हणूनच केव्हा काय खावे, याचे नियोजन आवश्यक असते. रात्री झोपताना मुलांनी भरपेट खाल्ले नाही तर त्यांच्या तोंडात घास कोंबून त्यांच्यावर भोजनाची जबरदस्ती करू नये. रडता रडता झोपणारे कोणतेही मुल सकाळी लवकर जागे होणार नाही.
 दिवसाचे वेळापत्रक
शालेय मुला-मुलींचे वेळापत्रक शाळेला जोड दिलेल्या विविध शिकवण्या लावल्यामुळे बिघडलेले असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याचे नाव कोणत्याही शिकवणीला नोंदवताना दहावेळा विचार करावा. क्लास लावण्यापेक्षा आई-वडिलांनी दिलेला वेळ फार महत्त्वाचा असतो. शाळा सुटल्यावर अनेक विद्यार्थ्यांना क्लासला जावे लागते. त्यामुळे ही मुले सायंकाळी साडेसात नंतर घरामध्ये पाऊल ठेवतात.  दिवस असा गेल्यावर एका तासात काही गृहपाठ करून लगेच मनोरंजनासाठी टीव्ही लावण्याचा हट्ट धरतात. अशावेळी मुला-मुलींना कोणतेतरी कार्टून लावून दिल्यामुळे पालकांचा वेळ छान जातो परंतु बालकाचे वेळापत्रक बिघडते. त्यामुळे आई-वडिलांनी टीव्हीवर काय बघू नये, याचे नियोजन करावे.
 शैक्षणिक बदल
शाळेच्या वेळेबद्दल भाष्य करताना महाराष्ट्राच्या राज्यपालांनी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला, (ज्याकडे अनेकांनी सोयीस्कर दुर्लक्ष केले), “शिक्षण अधिक आनंददायी असावे आणि शालेय शिक्षणात गृहपाठ कमी करावा, खेळ आणि एक्स्ट्रा करीक्युलर अॅक्टीव्हीटीवर भर दिला जावा”. यामधील अभ्यासाबाहेरील अतिरिक्त अभ्यासक्रम म्हणजे नेमके काय याबद्दल पुढील लेखात.
-सुहास किर्लोस्कर

Go to Source