चोर्लामार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करा

कणकुंबी परिसरातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन बेळगाव : चोर्ला मार्गे गोव्याला होणारी अवजड वाहनांची वाहतूक त्वरित थांबविण्यात यावी, अन्यथा रास्तारोको करून आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन कणकुंबी भागातील नागरिकांतर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. अनमोड मार्गे होणारी अवजड वाहनांची वाहतूक कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी रोखली आहे. त्यामुळे सदर वाहतूक आता चोर्ला रोडवरून गोव्याकडे वळविण्यात आली आहे. यामुळे […]

चोर्लामार्गे होणारी अवजड वाहतूक बंद करा

कणकुंबी परिसरातील नागरिकांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : चोर्ला मार्गे गोव्याला होणारी अवजड वाहनांची वाहतूक त्वरित थांबविण्यात यावी, अन्यथा रास्तारोको करून आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन कणकुंबी भागातील नागरिकांतर्फे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना देण्यात आले. अनमोड मार्गे होणारी अवजड वाहनांची वाहतूक कारवार जिल्हाधिकाऱ्यांनी रोखली आहे. त्यामुळे सदर वाहतूक आता चोर्ला रोडवरून गोव्याकडे वळविण्यात आली आहे. यामुळे रस्त्याची पार दूरवस्था होत असून ही वाहतूक थांबविण्यात यावी. अवजड वाहनांसाठी हा रस्ता धोकादायक असून प्रशासनाने याची त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.
बेळगाव-चोर्ला मार्गावरील कुसमळी गावाजवळील ब्रिटिशकालीन पूल वाहतुकीला धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. यापूर्वी या पुलाची पाहणी करण्यात आली आहे. आरटीओने हा पूल धोकादायक असल्याचे ठरवून याबाबत नोटीसही जारी केली आहे. यामुळे येथील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या रस्त्याची दैना झाली आहे. कुसमळी येथील पुलावरून अवजड वाहतूक करण्यासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. असे असले तरी मल्टिएक्सल वाहने रस्त्यावरून सुरू आहेत. यामुळे रस्त्यावर वारंवार अपघाताच्या घटनाही वाढल्या आहेत. ही धोक्याची घंटा असून त्वरित यावर उपाययोजना राबवाव्यात. भविष्यातील होणारा धोका टाळा, अशी मागणी करण्यात आली. यावेळी किरण गावडे, लक्ष्मण के. के., एस. के. कुडतरे, संजय पाटील आदी उपस्थित होते.