‘भोसले सैनिक स्कूल’मूळे जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला नवा आयाम
मंत्री नितेश राणेंचे प्रतिपादन ; भोसले सैनिक स्कूलचे दिमाखात उद्घाटन
सावंतवाडी । प्रतिनिधी :
आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक शौर्याचा व संघर्षाचा इतिहास आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने कोकणात होत असलेले हे पहिले सैनिक स्कूल म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्ण अक्षरामध्ये नोंद करण्यासारखा हा क्षण आहे. आपल्या जिल्ह्याच्या मातीचा महिमा जाणून घेतला तर या जिल्ह्याच्या इतिहासात नोंद करणारा हा सोहळा आहे. या जिल्ह्यात सैनिक स्कूल घडावं ही भोसले यांची इच्छा होती. त्यातच या स्कूलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातून देशाचे संरक्षण करण्यासाठी अधिकारी तयार केले जातील याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ‘भोसले सैनिक स्कूल’मूळे जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला नवा आयाम प्राप्त होणार आहे, असे गौरवोद्गार राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी व्यक्त केले.दरम्यान, सैनिक तसेच सैनिक स्कूल ही आम्हा राणे कुटुंबियांसाठी जिव्हाळ्याचा विषय आहे. अलिकडेच नाशिकला सैनिक स्कूलला भेट दिली होती त्यानंतर कळालं की असेच एक स्कूल आपल्या जिल्ह्यात होत आहे. त्यामुळे याचा सार्थ अभिमान आहे व त्यातच या स्कूलची जबाबदारी अच्युत सावंत भोंसले यांच्या सारख्या कर्तबगार व्यक्तीच्या हातात दिली गेली आहे हे देखील गौरवास्पद आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. यशवंतराव भोसले एज्युकेशन सोसायटी संचालित केंद्रीय संरक्षण मंत्रालय भारत सरकार व सैनिक स्कूल सोसायटी मान्यता प्राप्त कोकणातील पहिले सैनिक स्कूल ‘भोसले सैनिक स्कूल ‘ चे उद्घाटन राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी उपस्थित त्यांना संबोधित करताना त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी हा सुवर्णक्षण असून या गोष्टीचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे विषद केले. यावेळी माजी शालेय शिक्षण मंत्री आ. दीपक केसरकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भोंसले नॉलेज सिटीचे कार्याध्यक्ष अच्युत भोंसले, अध्यक्षा ॲड. अस्मिता भोंसले, सचिव संजीव देसाई, भोंसले सैनिक स्कूलचे चिफ एक्झिक्युटीव्ह ऑफिसर रत्नेश सिन्हा, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद उपाध्यक्ष ग्रुप कॅप्टन श्रीकांत वालवडकर, अभाविपचे कोकण प्रांत संघटन मंत्री निरज चौधरकर, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद अध्यक्ष मेजर विनय देगांवकर आदी उपस्थित होते.अलिकडेच मालवण किनारपट्टीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ‘नौदल दिन’ साजरा करण्यात आला. तो तो सोहळा जिल्ह्यासाठी एक भूषण ठरला होता. त्यामुळे आपल्या जिल्ह्याचंसैनिकांप्रती असलेलं योगदान लक्षात घेता असं स्कूल आपल्या जिल्ह्यात उभी राहत आहे हे देखील जिल्ह्याला भूषणावह आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत कोणालाही आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत होत नसताना असे सैनिक स्कूल होणे ही येथील मुलांसाठी सुवर्ण संधी असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.अच्युत सावंत भोंसले यांचा प्रवास योग्य दिशेने होत आहे. आपल्या जिल्ह्यात अशी संस्था येणं व त्यासाठी ज्यांनी ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचे पालकमंत्री या नात्याने अभिनंदन करतो. कारण संरक्षण मंत्रालयाकडून परवानगी मिळवणं ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप मेहनत व कष्ट घ्यावे लागतात. मात्र, आपल्या जिल्ह्यातील मुलांसाठी अच्युत भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेली ही मेहनत निश्चितच कौतुकास्पद व प्रेरणादायी आहे. भविष्यात या सैनिक स्कूल मधून जेव्हा अधिकारी घडतील व सांगतील की आम्ही भोंसले सैनिक स्कूल मधून शिकलो हे सांगतील तेव्हा त्याचा जिल्ह्याचा नागरीक म्हणून अभिमान वाटेल. जिल्ह्यातील शहीद सैनिकांसाठी ही खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल, असेही ते म्हणाले.दरम्यान, या जिल्ह्यात जर काही चुकीचं होत असेल काही अडचण होत असेल कोणी त्रास देत असेल तर केवळ एक फोन करा. तुम्ही निश्चिंत रहा तुम्हाला येणारी अडचण ही तुमची नाही तर नितेश राणेंची असेल याचा विश्वास ठेवा, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी इंजिनिअरिंग व मेडीकल कॉलेजच्या माध्यमातून तसेच इतर शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी नेहमी प्रयत्न केले. त्यांच्याच प्रयत्नामुळे आज जिल्ह्याचा दहावी व बारावीचा निकाल राज्यात अव्वल लागत आहे. आ. केसरकर यांनी देखील शालेय शिक्षण मंत्री म्हणून शिक्षण विभागात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. या जिल्ह्याला एक चांगला शैक्षणिक दर्जा प्राप्त व्हावा यासाठी आमची सर्वांचीच एक जबाबदारी आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.माझ्या जिल्ह्यात कोणीही अशी अभिमानास्पद गोष्ट करीत असेल तर जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने तुमच्या पाठीशी राहणं हे माझं कर्तव्य आहे. केवळ उद्घाटनाचा प्रमुख अतिथी म्हणून नाही तर या जिल्ह्याचा पालक म्हणून मी तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. तुम्ही पुढे जात राहा तुम्हाला कोणी त्रास दिला तर मी आहे. अशा प्रकल्पांमध्ये वाट रोखणारे अनेक असणार मात्र तुम्ही मागे हटू नका लागेल ती ताकद तुमच्या मागे उभी करु. या पूर्ण प्रवासामध्ये आपण सर्वजण करीत असलेल्या वाटचालीत आम्ही आपल्या पूर्ण पाठीशी आहोत, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.
Home महत्वाची बातमी ‘भोसले सैनिक स्कूल’मूळे जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला नवा आयाम
‘भोसले सैनिक स्कूल’मूळे जिल्ह्याच्या शौर्यपरंपरेला नवा आयाम
मंत्री नितेश राणेंचे प्रतिपादन ; भोसले सैनिक स्कूलचे दिमाखात उद्घाटन सावंतवाडी । प्रतिनिधी : आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला एक शौर्याचा व संघर्षाचा इतिहास आहे. सैनिकांचा जिल्हा म्हणून हा जिल्हा ओळखला जातो. त्यामुळे केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या मान्यतेने कोकणात होत असलेले हे पहिले सैनिक स्कूल म्हणजे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्ण अक्षरामध्ये नोंद करण्यासारखा हा क्षण आहे. आपल्या जिल्ह्याच्या […]
