नोटीस काढूनही स्थायी समितीची बैठक रद्द

वारंवार असा प्रकार घडत असल्यामुळे अधिकारी-नगरसेवकांतून नाराजी : निधी वाटपावरून जोरदार विरोध बेळगाव : महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक शुक्रवारी होणार होती. याबाबत कौन्सिल विभागाने नोटीसही प्रसिद्ध केली. मात्र पुन्हा ती बैठक रद्द करण्यात आली आहे. वारंवार असा प्रकार घडत असल्यामुळे अधिकाऱ्यांतून तसेच काही नगरसेवकांतूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची […]

नोटीस काढूनही स्थायी समितीची बैठक रद्द

वारंवार असा प्रकार घडत असल्यामुळे अधिकारी-नगरसेवकांतून नाराजी : निधी वाटपावरून जोरदार विरोध
बेळगाव : महानगरपालिकेतील सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक शुक्रवारी होणार होती. याबाबत कौन्सिल विभागाने नोटीसही प्रसिद्ध केली. मात्र पुन्हा ती बैठक रद्द करण्यात आली आहे. वारंवार असा प्रकार घडत असल्यामुळे अधिकाऱ्यांतून तसेच काही नगरसेवकांतूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीची बैठक चार दिवसांपूर्वीच झाली होती. त्या बैठकीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी गटातील नगरसेवकांमध्ये निधी वाटपावरून गोंधळ उडाला होता. त्यानंतर या बैठकीतील सर्व ठराव स्थगित झाले होते. स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी गटनेते मुज्जम्मील डोणी यांनी निधी वाटपावरून जोरदार विरोध केला होता. त्यानंतर बैठकीत कोणताच निर्णय झाला नाही. त्यानंतर पुन्हा तातडीने शुक्रवारी सकाळी 11 वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पुन्हा ती बैठक रद्द करण्यात आल्याने अधिकाऱ्यांना नाहक ताटकळत थांबावे लागले. सकाळी बैठक असल्यामुळे अधिकारी उपस्थित होते. मात्र काही वेळानंतर बैठक रद्द झाल्याचे सांगण्यात आल्यामुळे अधिकाऱ्यांनाच पुन्हा माघारी फिरावे लागले. बैठक घ्यायची नसेल तर नोटीस कशासाठी काढली गेली? असा प्रश्न आता अधिकारी व नगरसेवक करत आहेत.
सावळा गोंधळ सुरूच
महानगरपालिकेतील विविध स्थायी समितीच्या बैठकींचा सावळा गोंधळ सुरूच झाला आहे. कौन्सिल सेक्रेटरींना बैठक घेण्याबाबत वारंवार सूचना केली जात आहे. अजेंडा तयार करण्यास सांगितला जातो. याचबरोबर इतिवृत्तही तयार करण्यास सांगितले जाते. अधिकारी इतर कामे सोडून या बैठकांचा अजेंडा तसेच इतिवृत्त तयार करतात. मात्र अचानक पुन्हा बैठक स्थगित केली जाते. यामुळे अधिकारीही कंटाळले आहेत. एकूणच स्थायी समिती बैठकींच्या आयोजनाबाबत सावळा गोंधळ सुरूच आहे.