उत्तर गोव्यासाठी श्रीपादभाऊ निश्चित

दक्षिणेत कामत, सावईकर, कवळेकर यांच्यात चुरस : भाजपची दोन्ही जागांसाठी वेगळी रणनीती पणजी : भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ठरवण्यासाठी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक समितीची बैठक रात्री उशिरा सुरू झाली. मात्र उशिरापर्यंत बैठकीत गोव्याचा विषय आला नव्हता. दक्षिण गोव्यासाठी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे नाव घेतल्याने बरीच गडबड उडाली आहे. तथापि […]

उत्तर गोव्यासाठी श्रीपादभाऊ निश्चित

दक्षिणेत कामत, सावईकर, कवळेकर यांच्यात चुरस : भाजपची दोन्ही जागांसाठी वेगळी रणनीती
पणजी : भारतीय जनता पक्षाचे उमेदवार ठरवण्यासाठी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या निवडणूक समितीची बैठक रात्री उशिरा सुरू झाली. मात्र उशिरापर्यंत बैठकीत गोव्याचा विषय आला नव्हता. दक्षिण गोव्यासाठी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे नाव घेतल्याने बरीच गडबड उडाली आहे. तथापि नरेंद्र सावईकर आणि बाबू कवळेकर या दोन नावांमध्ये चुरस वाढली आहे.उत्तर गोव्यासाठी श्रीपाद नाईक यांचे नाव जवळपास निश्चित झालेले आहे. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत 12 राज्यांच्या उमेदवारांची यादी निश्चित केली जाणार होती. बैठक रात्री उशिरा सुरू झाली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत तसेच प्रदेश भाजपा अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे पुन्हा काल गुऊवारी दुपारी नवी दिल्लीला रवाना झाले. त्यांच्या समवेत माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर हे देखील गेलेले आहेत. भारतीय जनता पार्टीने यावेळी दोन्ही ठिकाणी जोर लावला असून दोन्ही जागांवर उमेदवार निवडून आणण्यासाठी वेगळी रणनीती निश्चित केलेली आहे. उत्तर गोव्यात केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि माजी मंत्री दयानंद सोपटे यांच्या नावाची चर्चा सुरू आहे.
काँग्रेसतर्फे उत्तरेत खलप, दक्षिणेत चोडणकर
दक्षिणेत काँग्रेससाठी गिरीश चोडणकर यांच्या नावाचा विचार पक्षश्रेष्ठींनी चालविला आहे. काँग्रेसची बैठक नवी दिल्ली येथे 10 मार्च रोजी होणार आहे. त्यावेळी गोव्यातील संभाव्य काँग्रेस उमेदवाराची नावे निश्चित करण्यात येणार आहेत. दक्षिण आणि उत्तर गोव्यासाठी काँग्रेसचे उमेदवार कोण असतील यासंदर्भात बुधवारी नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे चर्चा करून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर हे गोव्यात परतले आहेत. नवी दिल्लीमध्ये रमाकांत खलप यांच्या नावावर बैठकीत चर्चा करण्यात आली. याशिवाय काँग्रेसच्या अन्य दोन व्यक्तींची नावे या बैठकीत चर्चेस घेण्यात आली. अंतिम निर्णय येत्या 10 मार्च रोजी होणाऱ्या बैठकीत होणार आहे.