श्रीदत्त क्षेत्र आत्मतीर्थ पांचाळेश्वर
महाराष्ट्रातील गेवराई तालुका हा बीड जिल्ह्यात येतो. गेवराई येथे परमपावन गोदावरी नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले हे आत्मतीर्थ स्वयंसिद्ध स्थान आहे. या ठिकाणी श्री दत्तप्रभूंची चरणकमले रोज नियमाने लागतात. तेच हे आत्मतीर्थ. येथील कण न कण आणि अणूरेणू श्रीप्रभूंच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. हे श्रीदत्तप्रभूंचे भोजन स्थान आहे. गंगातीराच्या परिसरात मध्यभागी असलेल्या श्रीप्रभूंच्या भोजनस्थानी एक भव्य मंदिर बांधण्यात आलेले आहे. त्यामुळे या क्षेत्राचे महत्त्व द्विगुणित झालेले आहे. या स्थानाचे महत्त्व वेगळेच आहे. श्रीदत्तात्रेयप्रभू दररोज दुपारी प्रत्यक्ष भोजन स्वीकारण्यासाठी येत असतात.
या संदर्भात एक कथा आहे. पूर्वी त्रेतायुगात कुसुमावती नगरीत देवश्रवा नावाचे ऋषी राहत होते. त्यांना आत्मऋषी नावाचा पुत्र होता. देवश्रवांनी अतिशय भावपूर्वक उपासना केल्यामुळे श्रीदत्तात्रेयप्रभू प्रसन्न होऊन त्यांच्या घरी प्रगट झाले. देवश्रवा श्रीदत्तात्रेयप्रभूंच्या भजनपूजनात मग्न असताना त्यांचा शिष्य पांचाळराजा आपल्या गुरूंच्या भेटीला आला असता त्याला तेथे श्रीदत्तात्रेयप्रभूंचे दर्शन झाले. आपले गुरू आणि श्रीदत्तगुरूंची विनवणी करून श्रीदत्तप्रभूंना आपल्या निवासस्थानी पांचाळेश्वरला आणले आणि आपल्या राजसिंहासनी बसवून त्यांची षोडशोपचारे पूजा केली. आणि त्यांना विनंती केली, “हे आर्तदानी भक्तवत्सला, माझी सगळी चिंता नष्ट करून माझा पुनर्जन्म चुकवावा.”
यावर श्रीदत्तप्रभू त्याला म्हणाले, ”आम्हांला तुमच्या हातून काही महत्त्वाचे कार्य करवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला चिरायू पद प्राप्त होईल. तोपर्यंत आपण राज्यपद सांभाळा.” असे म्हणून श्रीदत्तप्रभू तिथून निघून गेले.
त्या काळात ऋषी पुलस्ती यांचे पुत्र कुंभ आणि निकुंभ यांनी उच्छाद मांडला होता. ते नगरांची नासधूस करत असत. त्यांची नासधूस बघून देवश्रवा ऋषींनी पांचाळेश्वराला जाऊन पांचाळराजाला म्हणाले की, “हे राजन, आपण या राक्षसबांधवांपासून मुक्ती द्या. पांचाळराजाने श्रीदत्तप्रभूंच्या आशीर्वादाने आणि आदेशानुसार कुंभ-निकुंभाशी युद्ध करून त्यांचा वध केला. त्यामुळे सर्व ऋषीमुनी त्यांच्या आतंकापासून भयमुक्त झाले. परंतु, ते दोघे ऋषी पुलस्ती पुत्र असल्यामुळे आपण ब्रह्म-हत्या केली हा दोष राजा पांचाळेश्वराच्या मनात सलत होता. आत्मऋषींनी धाव घेत श्रीदत्तप्रभूंना प्रसन्न केले आणि श्रीदत्तप्रभू प्रगटल्यावर पांचाळराजाने त्यांना प्रार्थना केली. “महाराज माझ्याकडून ब्रह्महत्या झाली आहे. मी पुलस्ती कुळाचा नाश केला आहे. आपण मला ब्रह्महत्येच्या पापातून मुक्ती द्यावी.”
महाराजांनी त्याला अभय देत म्हटले की, “राजा, आपण घाबरू नये. आम्ही आपणास या पापातून मुक्त करून अक्षयपद देऊ. यापूर्वी आपण धनुष्य सज्ज करून पातळातून अग्रोदक काढावे.” राजा पांचाळराजाने बाण वेधून पाताळातून पाणी काढले. आत्मऋषींनी त्या पाण्याने श्रीदत्तगुरूंचे चरण धुवून ते चरणामृत राजा पांचाळराजास प्यायला दिले. ते चरणामृत पिऊन राजास ब्रह्महत्येच्या पापापासून मुक्ती मिळाली. यासाठी हे स्थान आत्मतीर्थ असे म्हटले जाते.
पांचाळराजाला पापमुक्त करून श्रीदत्तात्रेयप्रभू तिथून जाणार तेवढ्यात आत्मऋषींनी प्रभू दत्तात्रेयांचे चरण धरून विनवणी केली, ”हे दयासागरा, आपण दररोजचे दुपारचे जेवण या आत्मतीर्थावर येऊन स्वीकार करावे. आमची विनंती स्वीकारावी.”
श्रीदत्तप्रभू यांनी हसतमुखाने ‘तथास्तु’ म्हणून आशीर्वाद देऊन तिथून निघाले. तेव्हापासून आजतागायत श्रीदत्तगुरू दररोज भोजन करण्यासाठी आत्मतीर्थ या ठिकाणी येतात. यामुळे हे स्थान पवित्र आहे.