शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांमध्ये रोगप्रतिबंधक औषध फवारणी करा

महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची अधिकाऱ्यांना सूचना बेळगाव : सरकारी वसतिगृहे, अंगणवाडी, झोपडपट्टी, शाळा, महाविद्यालये, दाट वस्तीच्या ठिकाणी, चायनीज स्टॉल या परिसरात डेंग्यू, मलेरिया व अन्य साथीच्या आजारांबाबत जनजागृतीसाठी तातडीने पाऊल उचला, अशी सक्त ताकीद महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना केली आहे. विश्वेश्वरय्यानगर येथील कार्यालयामध्ये बैठक घेऊन त्यांनी ही सूचना केली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी […]

शाळा, महाविद्यालये, वसतिगृहांमध्ये रोगप्रतिबंधक औषध फवारणी करा

महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांची अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : सरकारी वसतिगृहे, अंगणवाडी, झोपडपट्टी, शाळा, महाविद्यालये, दाट वस्तीच्या ठिकाणी, चायनीज स्टॉल या परिसरात डेंग्यू, मलेरिया व अन्य साथीच्या आजारांबाबत जनजागृतीसाठी तातडीने पाऊल उचला, अशी सक्त ताकीद महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना केली आहे. विश्वेश्वरय्यानगर येथील कार्यालयामध्ये बैठक घेऊन त्यांनी ही सूचना केली आहे. प्रत्येक प्रभागामध्ये डास प्रतिबंधक औषध फवारणी केलीच पाहिजे. याचबरोबर पाणीसाठा करून ठेवू नका, अशी नागरिकांना सूचना करण्यासाठी प्रभागातील महसूल व आरोग्य निरीक्षकांनी प्रत्येकाच्या घरी भेट देऊन मार्गदर्शन करा, असे आयुक्तांनी सांगितले. डेंग्यू, मलेरिया, काविळीचे रुग्ण आढळून येत आहेत. काही ठिकाणी दूषित पाणीपुरवठा होत असल्याने काविळीचे रुग्ण वाढत आहेत. तेव्हा कोणत्याही ठिकाणी पिण्याच्या पाणीपाईपला गळती लागली असेल तर तातडीने दुरुस्ती करावी. एलअॅण्डटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना व तेथील कर्मचाऱ्यांना याबाबत तातडीने माहिती देऊन दुरुस्ती करण्यासाठी पाऊल उचलावे.
सध्या पावसाळा सुरू असून पाईप फुटली तर त्यामध्ये दूषित पाणी मिसळते. त्यामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. डेंग्यू, मलेरिया आजार रोखण्यासाठी फॉगिंग करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. शहरातील सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या ठिकाणी औषधांचा साठादेखील उपलब्ध करून देण्यात यावा, अशी सूचना आरोग्याधिकाऱ्यांना देण्यात आली. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. काही ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामध्ये पाणी साचून राहात आहे. तेव्हा तातडीने त्या ठिकाणी माती व खडी टाकून खड्डे बुजवावेत, असे सार्वजनिक बांधकाम खात्याला सांगण्यात आले. शहरातील जलतरण तलाव व इतर तलावांच्या परिसरात अधिक काळजी घ्या. पाण्याचा साठा झाल्यामुळे त्यातूनच डेंग्यू फैलावणाऱ्या डासांची उत्पत्ती होते. याबाबत जनतेला मार्गदर्शन करा, त्यासोबत स्वत:ही काळजी घ्यावी, असे त्यांनी सांगितले. या बैठकीला आरोग्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे, पर्यावरण विभागाचे अभियंते हणमंत कलादगी, अभियंते आदिलखान पठाण, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी उपस्थित होते.