स्पोर्ट्स mania
भारतीय टेबल टेनिसचा ‘पितामह’…शरथ कमल !
टेबल टेनिस…चपळता, वेगवान हालचाली यांची कसोटी पाहणारा खेळ…अशा प्रकारात चाळिशी ओलांडलेल्या खेळाडूकडून काय अपेक्षा असू शकते?… त्यानं फार तर स्थानिक स्तरावर आपले पराक्रम दाखवायचे किंवा ‘टेटे पॅड’ खाली ठेवण्याचे, निवृत्ती पत्करण्याचे वेध लागायचे…पण रोहन बोपण्णाप्रमाणंच 41 व्या वर्षी तो सुद्धा घड्याळाचे काटे जणू उलटे फिरवू लागलाय…घटना फार दूरची नव्हे, गेल्या मार्च महिन्यातली. ‘सिंगापूर स्मॅश’ची त्यानं नुसती पात्रता फेरी पार केली नाही, तर चक्क उपांत्यपूर्व स्तरापर्यंत धडक मारून दाखविली. भारतीय टेबल टेनिसच्या इतिहासात अशा कामगिरीचं दर्शन घडण्याची ही पहिलीच खेप. या भरात त्यानं चांगल्या-चांगल्या रँकिंगच्या प्रतिस्पर्ध्यांना आडवं करून दाखविलं….
खरं तर या स्पर्धेस सुरुवात होण्याच्या आधी त्यातील आपली वाटचाल फार दूरवर जाणार नाही असं खुद्द त्यालाच वाटत होतं…दशकभरापूर्वी हाच खेळाडू टेबल टेनिसचा निरोप घेण्याची भाषा बोलू लागला होता अन् टोकियो ऑलिम्पिक पुढं ढकलण्यात आल्यावर त्यावेळी 38 वर्षांच्या असलेल्या या टेबल टेनिसपटूला आपलं शरीर आणखी एक वर्ष साथ देऊ शकेल का असा प्रश्न पडला होता…पण भारतीय टेबल टेनिसच्या आव्हानाचं नेतृत्व करणं त्याच्याकडून कायम राहिलंय अन् आणखी चार महिन्यांनी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उतरण्यास तो सज्ज झालाय…अचंता शरथ कमल !
‘सिंगापूर स्मॅश’ची पात्रता फेरी सुरू झाली तेव्हा शरथनं आपण तीन दिवसांनी घरी येणार असल्याचं कुटुंबियांना सांगितलं होतं. पण प्रत्यक्षात तो इतका चांगला खेळत गेला की, त्याचा मुक्काम एक आठवडाभर लांबला. त्याची ही धाव इतकी महत्त्वाची का ?…कारण ‘सिंगापूर स्मॅश’ हा ‘ग्रँड स्मॅश’ मालिकेचा एक भाग. ‘वर्ल्ड टेबल टेनिस टूर’वरील ती सर्वोच्च पातळीची स्पर्धा, टेनिसमधील ‘ग्रँड स्लॅम’ किंवा बॅडमिंटनमधील ‘ऑल इंग्लंड ओपन’सारखी. त्यामुळं जगातील सर्वोत्तम खेळाडूंना त्यात उतरण्याचा मोह आवरत नाही…
अशा स्पर्धेत शरथ आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम टेबल टेनिस खेळला असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. पात्रता फेरीतून मुख्य स्पर्धेत पाऊल ठेवताना त्यानं तीन सामन्यांमध्ये गमावला तो फक्त एक गेम (इतर तीन भारतीय पुऊष खेळाडूंना तो अडथळा ओलांडणंही शक्य झालं नाही)…त्यानंतर 28 मिनिटांत त्यानं जागतिक क्रमवारीतील 31 व्या स्थानावरील निकोलस बर्गोसचा सफाया केला. पुढं मुकाबला होता तो त्याहून वरच्या क्रमांकावरील डार्को जॉर्गिकशी. त्यातच पहिला गेम गमावून चार सामन्यांत प्रथमच तो पिछाडीवर पडला. परंतु हाती गमावण्यासारखं फारसं काहीही नव्हतं. त्यामुळं शरथ पुढील गेम्समध्ये मनमोकळेपणे त्याचे ‘शॉट्स’ खेळला आणि त्यानंतर जे घडलं ते सर्वांना धक्का देऊन गेल्याशिवाय राहिलं नाही. त्यावेळी 88 व्या स्थानावर असलेल्या या खेळाडूनं 13 व्या क्रमांकावरील टेबल टेनिसपटूला उताणं पाडलं…
उपउपांत्यपूर्व फेरीत इजिप्तच्या ओमर असारच्या रूपानं आणखी एक कठीण आव्हान पुढं उभं ठाकलं. 22 व्या क्रमांकावरील सदर खेळाडूबरोबरची लढत अत्यंत चुरशीची होईल, असं कुणालाही वाटणं साहजिक. परंतु वेगळ्याच पातळीवर पोहोचलेल्या शरथ कमलनं त्यात नोंद केली ती मुख्य स्पर्धेतील सर्वांत जलद विजयाची. पुढील फेरीत प्रवेश करण्यासाठी त्याला अवघी 24 मिनिटं लागली. खुद्द शरथनं देखील त्या सामन्यानंतर आपल्याला 3-0 अशा सहज विजयाची अपेक्षा नव्हती, असं प्रांजळपणे सांगून टाकलं…शेवटी त्याच्या घोडदौडीला उपांत्यपूर्व फेरीत रोखलं ते सहाव्या क्रमांकावरील फेलिक्स लेब्रुननं…
शरथ कमल ‘सिंगापूर स्पोर्ट्स हब’मधून बाहेर पडला तो ताठ मानेनं. अलीकडच्या काळातील ‘वर्ल्ड टेबल टेनिस’ स्पर्धेतील हे त्याचं सर्वोत्कृष्ट प्रदर्शन. या स्पर्धेत सहभागी होण्याची त्याची ही तिसरी खेप होती. पण पहिली फेरी ओलांडण्याचा पराक्रम त्याला प्रथमच करून दाखविता आला…या कामगिरीच्या जोरावर शरथनं पुऊष एकेरीच्या जागतिक क्रमवारीत 88 व्या क्रमांकावरून 35 व्या स्थानावर अशी मोठी झेप घेतली असून भारतीय खेळाडूंमध्ये तो पुन्हा अग्रस्थानावर जाऊन बसलाय…शिवाय यंदाच्या ऑलिम्पिकमधील एकेरी स्पर्धेत सहभागी होण्याची त्याची संधीही त्यामुळं कमालीची वाढलीय ती वेगळी. पॅरिसमधील स्पर्धा हे त्याचं चक्क पाचवं ऑलिम्पिक असेल. आजवर कोणत्याही भारतीय टेबल टेनिसपटूला इतक्या वेळा ऑलिम्पिकमध्ये सहभागी होता आलेलं नाहीये… या पार्श्वभूमीवर नुकतीच खबर थडकलीय ती ऑलिम्पिकमधील भारतीय चमूचा ध्वज धरण्याचा मान शरथ कमलला देण्यात आल्याची…ही निवड सार्थच म्हणायला हवी. कारण गेल्या 20 वर्षांपासून भारतीय टेबल टेनिसच्या आव्हानाचा ध्वज आहे तो त्याच्याच हाती अन् शरथ देखील थांबण्याचं नाव न घेता, थकण्याची चिन्हं न दाखविता नेटानं पावलं टाकत चाललाय!
टेबल टेनिसच्या वातावरणात वाढ…
अचंता शरथ कमलचा जन्म 12 जुलै, 1982 रोजी झाला तो चेन्नईत…टेबल टेनिस हे या कुटुंबाच्या जनुकांतच आहे असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. शरथचे वडील श्रीनिवास राव आणि काका मुरलीधर राव हे स्वत: एकेकाळचे टेबल टेनिसपटू. त्यानंतर ते प्रशिक्षणाकडे वळले…
घसरण नि पुनरागमन…
मध्यंतरी शरथ कमलच्या वाट्यालाही ‘बॅड पॅच’ आल्याशिवाय राहिला नाही…2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तसंच आशियाई खेळांमध्ये कोणतंही पदक त्याला मिळविता आलं नाही. इतकंच नव्हे, तर 2012 च्या लंडन ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्यात देखील त्याला अपयश आलं. मात्र 2016 च्या रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरून त्यानं ही घसरण रोखली आणि लवकरच आला तो त्याच्या कारकिर्दीतील एक उत्कृष्ट क्षण…
2018 च्या राष्ट्रकुल खेळांमध्ये शरथ ज्या ज्या गटांमध्ये उतरला त्या त्या ठिकाणी तो पदक कमाविल्याशिवाय राहिला नाही. एक सुवर्ण, एक रौप्य आणि दोन कांस्य अशी त्यानं पदकांची लयलूट केली…याशिवाय 2018 च्या आशियाई खेळांमध्ये सुद्धा त्यानं दोन कांस्यपदकं पटकावून छाप उमटविली…
2019 साली अनुभवी शरथ कमल जागतिक क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम 30 व्या स्थानावर पोहोचला…कमलेश मेहताच्या आठ किताबांच्या दोन दशकं टिकलेल्या विक्रमाला मोडीत काढून त्यानं विक्रमी नववं राष्ट्रीय विजेतेपद आपल्या नावावर जमा केलं ते त्याच वर्षी…
पहिलं आंतरराष्ट्रीय जेतेपद मिळविल्यानंतर एका दशकानं दुसरं चालून आलं ते 2020 मध्ये. त्यावेळी वयाच्या 37 व्या वर्षी शरथ कमलनं ‘ओमान ओपन’मध्ये किताब पटकावला…
2020 ते 2024…
2020 साली टोकियोत झालेले खेळ हे शरथ कमलचं चौथं ऑलिम्पिक. पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाल्यानंतर दुसऱ्या फेरीत त्यानं पोर्तुगालच्या तियागो आपोलोनियाचा 4-2 असा पराभव केला. त्यानंतर त्याला चीनच्या दिग्गज आणि पुढं सुवर्णपदक जिंकलेल्या मा लाँगकडून 4-1 असं पराभूत व्हावं लागलं असलं, तरी त्यानं चांगली झुंज दिली…
वय झालेलं असूनही शरथनं मंदावण्याची कोणतीही लक्षणं न दाखवता 2021 च्या आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत पुरुषांच्या सांघिक व दुहेरी अशा दोन्ही गटांमध्ये कांस्यपदकं पटकावली…
2022 च्या एप्रिल महिन्यात त्यानं अंतिम सामन्यात साथियान ज्ञानशेखरनवर 4-3 असा शानदार विजय मिळवून विक्रमी दहावं राष्ट्रीय विजेतेपद खात्यात जमा केलं. असं असलं, तरी त्याच्या हातून त्या वर्षातील सर्वांत मोठी कामगिरी घडणं अजून बाकी होतं…
हा प्रताप नोंदला गेला राष्ट्रकुल खेळांत…शरथ कमलनं पुऊष एकेरीच्या अंतिम फेरीत इंग्लंडच्या लियाम पिचफोर्डचा पराभव करून सुवर्णपदक मिळविलं. शिवाय श्रीजा अकुलासह मिश्र सांघिक गटात सुवर्ण, साथियान ज्ञानशेखरनसमवेत पुऊषांच्या दुहेरीत रौप्य अन् पुऊषांच्या सांघिक गटात सुवर्णपदक…
उल्लेखनीय बाब म्हणजे 2022 मध्येच शरथ कमलला भारताचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार ‘खेलरत्न’ प्रदान करून सन्मानित करण्यात आलं…
खेळ जुनाच ओळख नवी ! ‘रोड सायकलिंग’
‘रोड सायकलिंग’…पक्क्या रस्त्यांवर रंगणारा अन् सायकल शर्यतींचा सर्वांत पारंपरिक, लोकप्रिय तसंच शुद्ध मानला जाणारा प्रकार…‘रोड सायकलिंग’मध्ये देखील विविध गट आहेत. यात ‘टाइम ट्रायल’, ‘रोड’ रेस, ‘स्टेज रेस’, ‘क्रायटेरियम्स’, ‘सर्किट रेस’ नि ‘टीम टाइम ट्रायल’ यांचा समावेश होतो. ऑलिंपिकमध्ये मात्र पुऊष नि महिला सायकलपटू भाग घेतात ते ‘टाइम ट्रायल’ अन् ‘रोड रेस’मध्ये…
‘रोड सायकलिंग’ म्हणजे मूळ ऑलिम्पिकच्या स्पर्धांपैकी एक. कारण तो प्रकार 1896 सालच्या अथेन्समधील पहिल्या आधुनिक ऑलिम्पियाडमध्ये झळकला होता. पुढील तीन ऑलिम्पिकमधून वगळण्यात आल्यानंतर त्यानं ‘टाइम ट्रायल’सह पुनरागमन केलं ते स्टॉकहोममधील 1912 च्या खेळांपासून…1984 च्या लॉस एंजेलिसमधील ऑलिम्पिकपासून त्यात महिलांच्या ‘रोड रेस’ची भर पडली. त्यानंतर चार वर्षांनी जोड मिळाली ती महिलांच्या ‘टाइम ट्रायल’ची…अटलांटा येथील 1996 च्या ऑलिम्पिकपूर्वी व्यावसायिक सायकलस्वारांना खेळांमध्ये उतरण्यास मनाई होती…
‘रोड रेस’मध्ये सर्व सायकलपटू एकाच वेळी प्रारंभ करतात. ही क्षमतेचा कस पाहणारी शर्यत. महिलांसाठी ती 120 किलोमीटरपेक्षा जास्त, तर पुऊष सायकलपटूंसाठी 200 किलोमीटरांपेक्षा जास्त अंतराची राहते. अनेकदा शेवटच्या काही शेकडो मीटर्समध्ये जोरदार चुरस लागून ‘स्प्रिंट फिनिश’मध्ये तिचा निकाल लागतो. म्हणून सायकलस्वारांनी शर्यतीच्या पहिल्या टप्पात स्वत:ची स्थिती उत्तम राखून आपली ऊर्जा वाचवून ठेवणं आवश्यक असतं…
‘रोड रेस’ ही संघ केंद्रीत शर्यत असते, ज्यात सामान्यत: 150-180 रायडर्स सहभागी होतात. संघ साधारणपणे 8 ते 10 सायकलस्वारांचे बनलेले असतात. तथापि ऑलिम्पिकमध्ये संघाचा आकार पुऊषांसाठी कमाल पाच आणि महिलांसाठी चार सायकलपटूंपर्यंत मर्यादित असतो…
सहसा एका सायकलपटूला संघ नेता म्हणून शर्यतीपूर्वी निश्चित केलं जातं आणि त्याचे सहकारी अन्न, पाणी आणण्यापासून ते अपघात किंवा यांत्रिक बिघाड झाल्यास चाक किंवा त्यांची सायकल सोडून देण्यापर्यंत कोणत्याही प्रकारे मदत करतात….
या सायकलस्वारांच्या मागे वाहनातून शर्यतीचे अधिकारी, टीम कार, मीडिया आणि व्हीआयपी कार, तटस्थ सपोर्ट वाहनं आणि वैद्यकीय कर्मचारी असतात. संघाच्या कारमध्ये संघ संचालक बसतो आणि रेडिओ संपर्काद्वारे आपल्या खेळाडूंना सल्ला देतो तसंच शर्यतीची रणनीती ठरविण्याबरोबर महत्त्वाची माहिती पुरवितो. एक टीम मेकॅनिक देखील सोबत असतो. तो टायर पंक्चर, क्रॅश किंवा इतर यांत्रिक बिघाड झाल्यास उपकरणांसह सेवा देण्यासाठी सज्ज असतो…
‘टाइम ट्रायल’ हा एकेरी सायकलपटूचा प्रयत्न. यामध्ये स्पर्धक गटाने सुरुवात न करता एकेक करून अन् साधारणपणे एकेक मिनिटाच्या अंतराने रवाना होतात. ते ‘रोड रेस’पेक्षा खूपच कमी अंतर कापतात, क्वचितच ही शर्यत 50 किलोमीटरांपेक्षा जास्त असते…सायकलिंगचा हा सर्वांत मूलभूत प्रकार आणि त्याचा नियम अगदी सोपा. दिलेलं अंतर सर्वांत जलदरीत्या कापणारा खेळाडू हा विजेता ठरतो…
‘रोड रेस’प्रमाणं ‘टाइम ट्रायल’ देखील सहसा सार्वजनिक रस्त्यांवर घेतली जाते आणि ती ‘पॉइंट-टू-पॉइंट’ म्हणजे एक टोक ते दुसरे टोक अशी असते किंवा त्यात अनेक ‘फेऱ्या’ही असू शकतात. यात बहुतेक वेळा सेकंदाच्या भागाच्या साहाय्यानं विजेता ठरतो…
– राजू प्रभू
आंतरराष्ट्रीय कॅरमपटू आकांक्षा कदम
आत्मविश्वास, जिद्द व मेहनत असेल तर कोणतेच शिखर सर करणे अवघड नाही. हे सिध्द केलंय संगमेश्वर तालुक्यातील देवडे गावची सुकन्या आकांक्षा उदय कदम हिने. लहान वयातच आंतरराष्ट्रीय कॅरमपटू होण्याचा मान आकांक्षा हिने मिळवला आहे. तिने राज्यस्तरीय स्पर्धेत 9 वेळा विजेतेपद पटकावले आहे. आकांक्षाने बहारदार खेळाचे प्रदर्शन करत दिग्गज खेळाडूंचा पराभव करत अल्पावधीतच 30 सुवर्णपदकांची कमाई केली. आकांक्षाने वर्ल्ड चॅम्पियन होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे.
30 सुवर्णपदके, 9 रौप्य व 10 ब्रॉन्झ पदके
वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा ध्यास
लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप
आकांक्षा हिचे पहिली ते सातवीपर्यंतचे शिक्षण साखरपा येथील डी.के. इंग्लिश स्कूल येथे झाले. आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण रत्नागिरीतील शिर्के हायस्कूल तर सध्या ती मुंबई येथील भवन महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरूखकर यांची आकांक्षा ही भाची आहे. मामा संदीप देवरूखकर यांनी कॅरम स्पर्धांत पटकावलेली अनेकविध चषक पाहून आकांक्षा हिला कॅरम खेळाची आवड निर्माण झाली.
पहिल्याच स्पर्धेत पराभव
वयाच्या नवव्या वर्षापासून ती कॅरम खेळू लागली. शालेय शिक्षण सुरू असताना पहिलीच स्पर्धा रत्नागिरी येथे पार पडली. यामध्ये आकांक्षा हिचा पराभव झाला तरीही खचून न जाता सराव सुरूच ठेवला. अन यानंतर मागे वळून न पाहता तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बहारदार खेळाचे प्रदर्शन करत सुवर्ण, रौप्य, कास्य पदकांची लयलूट केली आहे. आज कॅरम स्पर्धा व आकांक्षा कदम असे समीकरण झाले आहे. आकांक्षाला आंतरराष्ट्रीय कॅरमपटू संदीप देवरूखकर, महेश देवरूखकर, महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनचे अरूण केदार, यतिन ठाकुर, जिल्हा कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष प्रदीप भाटकर, मिलींद साप्ते, राहुल बर्वे, अजित सावंत, नितीन लिमये, वडील उदय कदम यांचे मौलिक मार्गदर्शन लाभत आहे.
रोज 5 ते 6 तास सराव
आकांक्षा हिने 14 व्या वर्षी ज्युनियर व सिनियर गटात राज्यस्तरीय स्पर्धेत विजेतेपदावर नाव कोरत नवा इतिहास रचला आहे. तसेच महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्यावतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेत 9 वेळा विजेतेपदावर नाव कोरले आहे. सध्या ती इंडियन ऑईल कंपनीकडून खेळते. कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यासाठी सरावाची अत्यंत आवश्यकता असते. आकांक्षा दररोज सुमारे पाच ते सहा तास कॅरमचा सराव करते. आकांक्षा हिने सन 2022 मध्ये 56 वी वरिष्ठ महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक, चेंबुर जिमखाना येथील राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक, सन 2023 मध्ये दादर येथे झालेल्या वरिष्ठ सिनियर कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक, रत्नागिरी जिल्हा मानांकन कॅरम स्पर्धेत सुवर्णपदक, पश्चिम बंगाल दुर्गापूर येथे झालेल्या इंटर इन्स्टीट्यूट राष्ट्रीय कॅरम स्पर्धेत 1 सुवर्ण व ब्रॉन्झ पदक, दिल्ली येथे झालेल्या 50 व्या वरिष्ठ कॅरम स्पर्धेत दोन ब्रॉन्झ पदके मिळवली आहेत. आकांक्षा हिच्या खेळाची दखल घेऊन तामिळनाडू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात तिची निवड झाली होती. मालदिव, सावंतवाडी, विलेपार्ले, जळगाव, वाराणसी, सावंतवाडी, डेरवण, कुडाळ, नायगाव, नागपूर, नरसोबाची वाडी आदी ठिकाणी झालेल्या कॅरम स्पर्धेत आकांक्षाने सुवर्ण, रौप्य, कास्य पदकांची कमाई केली. तिने आतापर्यंत विविध स्पर्धांमध्ये 30 सुवर्णपदके, 9 रौप्य व 10 ब्रॉन्झ पदकांची कमाई केली आहे. आकांक्षाने लहान वयात खुल्या गटातून खेळ करत दिग्गज खेळाडूंना धूळ चारत विजेतेपद पटकावले आहे. आकांक्षाच्या चमकदार कामगिरीची दखल घेत सन 2019-20 मध्ये रत्नागिरी जिल्हा कराडे ब्राह्मण सहकारी संघाचा राणी लक्ष्मीबाई गौरव पुरस्कार, तरूण भारत सन्मान पुरस्कार, विश्वसमता कलामंचचा राज्यस्तरीय विश्वसमता खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
– सुरेश करंडे