स्पोर्ट्स mania

‘डावखुऱ्या फिरकी’चा ‘कुलदीप’क ! एखाद्या फिरकी गोलंदाजानं आल्या आल्या विलक्षण पराक्रम करून दाखविणं हे काही नवीन नव्हे. पण सूर गमावल्यावर, घसरल्यानंतर त्यातून सावरून पुन्हा झेप घेणं थोड्यांनाच जमलंय…‘रिस्ट स्पिनर’ असलेल्या डावखुऱ्या कुलदीप यादवनं ती किमया विलक्षण जिद्दीनं करून दाखविलीय… कपिलदेवनंतर आणि खास करून अलीकडच्या दोन दशकांत भारतीय भूमीत भरपूर नि दर्जेदार वेगवान गोलंदाज तयार व्हायला […]

स्पोर्ट्स mania

‘डावखुऱ्या फिरकी’चा ‘कुलदीप’क !
एखाद्या फिरकी गोलंदाजानं आल्या आल्या विलक्षण पराक्रम करून दाखविणं हे काही नवीन नव्हे. पण सूर गमावल्यावर, घसरल्यानंतर त्यातून सावरून पुन्हा झेप घेणं थोड्यांनाच जमलंय…‘रिस्ट स्पिनर’ असलेल्या डावखुऱ्या कुलदीप यादवनं ती किमया विलक्षण जिद्दीनं करून दाखविलीय…
कपिलदेवनंतर आणि खास करून अलीकडच्या दोन दशकांत भारतीय भूमीत भरपूर नि दर्जेदार वेगवान गोलंदाज तयार व्हायला लागले असले, तरी आपल्याकडे सदैव पीक येत राहिलंय ते फिरकीपटूंचं…त्यातील काही घराणी ‘लेगस्पिन’ची, काही खास ‘गुगली’ वा ‘टॉपस्पिन’ची, तर काही ‘ऑफस्पिन’ची अन् काही डावखुऱ्या फिरकीची…त्यापैकीच एक ‘चायनामन’ घराण्याचा वारसा चालविणारा, मनगटानं चेंडू फिरविणाऱ्या गोलंदाजांच्या दुर्मिळ गटात समाविष्ट होणारा बहाद्दर…कुलदीप यादव…
कुलदीप सर्वप्रथम प्रकाशझोतात आला तो 2014 च्या 19 वर्षांखालील विश्वचषकातील भारताचा आघाडीचा बळी घेणारा गोलंदाज बनून. शिवाय स्पर्धेच्या इतिहासातील हॅट्ट्रिक नोंदविणारा पहिला भारतीय गोलंदाज होण्याचा मान देखील त्यानं मिळवला. ही कामगिरी निवड समितीचं लक्ष वेधून गेल्याशिवाय राहिली नाही…2016 च्या ‘दुलीप ट्रॉफी’मध्ये या तऊण फिरकीपटूनं तीन सामन्यांत 17 बळी घेत संघाला अंतिम फेरीत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली…
मर्यादित संधी मिळून सुद्धा कुलदीप यादवच्या अपारंपरिक शैलीचा राष्ट्रीय स्तरावर होऊ लागलेला गाजावाजा त्याला 2017 मध्ये ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या मायदेशातील कसोटीसाठीच्या भारतीय संघात स्थान मिळवून देण्यास पुरेसा ठरला…मग धर्मशाला इथं दुखापतग्रस्त विराट कोहलीच्या जागी स्थान मिळालेल्या या फिरकीपटूनं अनुभवी ऑस्ट्रेलियन फलंदाजांनाही चकीत केलं. यादवनं पदार्पणातच चार बळी घेत निर्णायक भारतीय विजयाचा पाया घालण्यास आणि ‘बॉर्डर-गावस्कर चषक’ आपल्याकडे परत येण्यास मदत केली…
त्यानंतर कुलदीपला एकदिवसीय संघात प्रवेश करण्यासाठीही फार काळ थांबावं लागलं नाही. त्याच वर्षी झालेल्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यात ही संधी मिळून तिथं त्यानं पहिल्याच लढतीत पाच बळी घेतले. त्या दौऱ्यात तो संयुक्तपणे सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला…तरीही श्रीलंकेतील पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांमध्ये आश्चर्यकारकरीत्या त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. यादवनं मग अंतिम दोन सामने आणि त्यानंतरच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत पुनरागमन करताना आपल्याला वगळणं ही कशी मोठी चूक होती ते पुरेपूर सिद्ध केलं. कांगारुंविरुद्ध हॅट्ट्रिक करून तो कपिलदेव नि चेतन शर्मानंतर एकदिवसीय सामन्यांमध्ये अशी कामगिरी करून दाखविणारा पहिला गोलंदाज ठरला…
कुलदीप यादव त्यानंतर एक गोलंदाज म्हणून विकसित होत गेला आणि आपली फिरकी प्रभावी बनविण्याच्या दृष्टीनं आवश्यक हातखंडेही त्यानं व्यवस्थित शिकून घेतले…2017 साली एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्यानं पहिल्या वर्षात 14 सामन्यांमध्ये 22 बळी, तर 2018 साली शिखर गाठताना कॅलेंडर वर्षात तब्बल 45 बळी खात्यात जमा केले. त्या वर्षीच्या इंग्लंड नि दक्षिण आफ्रिका दौऱ्यांत तो विलक्षण मारक ठरला. खास करून दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेत त्यानं ‘चायनामन’ व ‘गुगली’चा असा वापर केला की, सर्वांत निपुण समजल्या जाणाऱ्या फलंदाजांची देखील सहज फसगत झाली…
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीबरोबर कुलदीपची सहकारी ‘रिस्ट स्पिनर’ यजुवेंद्र चाहलसमवेत विलक्षण जोडी जमली (त्यातून त्यांना उद्देशून वापरल्या जाणाऱ्या ‘कुलचा’ या टोपणनावाचा जन्म झाला). ही दुक्कल इतकी प्रभावी ठरली की, त्यामुळं अश्विन व जडेजा या वरिष्ठ फिरकी जोडीला 2018 ते 2020 दरम्यान मर्यादित षटकांच्या संघाबाहेर राहावं लागलं…2019 च्या विश्वचषकातही कुलदीप व चहल हीच भारताची मुख्य फिरकी हत्यारं राहिली अन् विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली त्यांनी चांगली कामगिरी देखील करून दाखविली…
ग्रह फिरण्यास प्रारंभ झाला तो त्यानंतर…त्यावेळी जगभरात ‘मनगटी फिरकी’ची चलती असल्यानं फलंदाजांना अशा गोलंदाजांचा अधिकाधिक सामना करण्याची संधी मिळाली अन् त्यामुळं कुलदीपची रहस्यंही उलगडून त्याची धार बोथट बनली. मग बळी मिळवण्यासाठी तो संघर्ष करू लागला, त्याची गोलंदाजी महागडी बनू लागली (2020 व 2021 मधील एकदिवसीय सामन्यांत त्याला अवघे 8 बळी मिळविता आले)…शिवाय फिरकीपटूंकडे पाहण्याचा भारताचा दृष्टिकोन देखील बदलला. ज्याच्यासमवेत कुलदीपची जोडी बनायची त्या चहलशीच संघातील स्थानासाठी स्पर्धा करण्याचा प्रसंग त्याच्यावर ओढवला. कारण भारतीय संघ व्यवस्थापन किमान एका ‘फिंगर स्पिनर’ला प्राधान्य देऊ लागलं…खेरीज यादववर टीका होऊ लागली ती त्याच्या गोलंदाजीत हवा तितका वेग नसल्याची, तो एकसुरी बनल्याची. त्यातच गुडघ्यासह अनेक दुखापतींचा सामना करावा लागला अन् दीर्घ कालावधीसाठी भारतीय संघाबाहेर राहण्याची पाळी त्याच्यावर ओढवली…
मात्र कुलदीप यादवनं दमदार पुनरागमन केलं ते गेल्या वर्षीच्या बांगलादेशमधील कसोटी मालिकेतून. सामनावीर ठरलेल्या कसोटीत 8 बळी घेऊनही त्याला दुसऱ्या लढतीत वगळण्यात आलं. कारण व्यवस्थापनाला विविध संघरचना आजमावून पाहायच्या होत्या…तरीही कुलदीपनं हार न मानता ज्या काही मोजक्या संधी वाट्याला आल्या त्यांचं सोनं करून दाखविलं. ऑक्टोबरमधील दक्षिण आफ्रिकेच्या भारत दौऱ्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यांत पाहुणे केवळ 99 धावांवर गारद झाले होते ते त्यानं 18 धावा देऊन घेतलेल्या 4 बळींमुळंच…त्यानंतर यंदाचा आशिया चषक, विश्वचषक स्पर्धा अन् दक्षिण आफ्रिकेतील नुकत्याच झालेल्या ‘टी-20’ मालिकेतून पूर्वीचा कुलदीप यादव पुन्हा एकदा प्रकट झालाय, नव्हे त्याहून पुढं गेलाय असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये !
वेगवान गोलंदाजीकडून फिरकीकडे…
कुलदीप यादवनं मुळात फिरकी नव्हे, तर स्वप्न बाळगलं होतं ते वेगवान गोलंदाज, दुसरा झहीर खान बनण्याचं. पण त्यापेक्षा त्याच्या गुणवत्तेला फिरकी गोलंदाजीच न्याय देऊ शकेल हे प्रशिक्षक कपिल पांडे यांनी हेरलं अन् त्याला मार्ग बदलायला लावला…‘लहानपणी वेगवान गोलंदाजी करण्यात मी चांगला होतो. कारण माझी मनगटं चांगली चालायची. मी वयाच्या दहाव्या-अकराव्या वर्षी चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करू शकत होतो. पण आडवी आली ती माझी कमी उंची’, कुलदीप सांगतो…
? वेगवान गोलंदाजी सोडायची नसल्यामुळं कुलदीप काही दिवस प्रशिक्षणासाठीही गेला नव्हता. पण प्रशिक्षकांनी त्याचं मन वळविलं…‘मला खूप राग आला होता. पण सर म्हणाले की, जर मला खरोखरच क्रिकेट खेळायचं असेल, तर फिरकीची कला अवगत करावी लागेल. त्यामुळं मी अकादमीत परतलो…जेव्हा मला फिरकी गोलंदाजी करायला सांगितली गेली तेव्हा नकळत हातून ‘चायनामन’ टाकला गेला. प्रशिक्षकांनी हा दुर्मिळ गुण असल्याचं लगेच हेरलं’, तो जुन्या आठवणी जागविताना म्हणतो…
खेळ जुनाच, ओळख नवी ! ‘पिकलबॉल’
अमेरिकेत सर्वांत वेगानं वाढणारा खेळ म्हणून पिकलबॉल’कडे पाहिलं जातंय…2022 च्या एका अहवालानुसार हा खेळ खेळणाऱ्यांची संख्या आता त्या देशात 48 लाखांवर पोहोचलीय अन् सलग दुसऱ्या वर्षी तिथं सर्वांत वेगानं वाढणाऱ्या खेळांत त्यानं अव्वल स्थान पटकावलंय…

बॅडमिंटन, टेनिस नि पिंगपाँगचं मिश्रण असलेला हा खेळ…पिकलबॉल 1965 साली बेनब्रिज आयलंड, वॉशिंग्टन इथं जोएल प्रिचार्ड, बिल बेल आणि बार्नी मॅकलम या तीन शेजाऱ्यांनी जन्मास घातला तो बॅडमिंटन कोर्टवर जुने पिंगपाँग पॅडल आणि छिद्रं असलेला चेंडू वापरून. कंटाळलेल्या मुलांना व्यस्त ठेवण्याच्या हेतून त्यांनी ही संकल्पना पुढं आणली होती…
1967 पर्यंत पहिलं कायमस्वरूपी पिकलबॉल कोर्ट बांधलं गेलं, तर 1984 पासून ‘अमेरिकी पिकलबॉल संघटना’ या खेळाचा कारभार पाहू लागली….आता या खेळाचा झपाट्यानं प्रसार होऊन जगभरातील अंदाजे 70 देश पिकलबॉलच्या ‘आंतरराष्ट्रीय महासंघा’त सामील झालेत आणि 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये प्रात्यक्षिक खेळ म्हणून त्याचा समावेश व्हावा याकरिता प्रयत्न चालू आहेत…
‘पिकलबॉल’ खेळण्यासाठी फारशा साधनांची आवश्यकता नसते…टेनिस आणि बॅडमिंटनमध्ये दिसणाऱ्या ‘स्ट्रिंग रॅकेट’नं नव्हे, तर हा खेळ सपाट ‘पॅडल’नं खेळला जातो. जरी मूळ ‘पॅडल’ लाकडाचं वापरलं होतं, तरी आज शैलीनुसार विविध आकार आणि जाडीची ‘पॅडल्स’ वापरली जातात. तथापि, ‘पॅडल’ची लांबी 17 इंचांपेक्षा जास्त असू शकत नाही…
‘पिकलबॉल’मध्ये वापरला जाणारा चेंडू प्लास्टिकचा असतो आणि त्याला 26 ते 40 छिद्रं असतात. त्यामुळे टेनिस चेंडूपेक्षा हा चेंडू फटकावणं खूप हलकं आणि सोपे जातं. त्याचबरोबर खेळाची गती किंचित कमी राहण्यास देखील ते जबाबदार आहे. चेंडूचा आकार सामान्यत: 2.87 ते 2.97 इंच व्यासाचा असतो आणि चेंडू एकाच रंगाचा असावा लागतो…
खेळासाठी 3 फूट उंचीची जाळी देखील आवश्यक असते जी मैदानाच्या मध्यभागी जमिनीपासून 34 इंच उंचीवर टांगली जाते. या खेळाचं ‘कोर्ट’ सुमारे 44 फूट लांब नि 20 फूट रुंद असावं लागतं…
‘पिकलबॉल’ एकेरी किंवा दुहेरी पद्धतीनं खेळला जाऊ शकतो, दोन्हींसाठी समान आकाराचं कोर्ट वापरलं जातं. एकेरी आणि दुहेरी सामने हे मूलत: सारखेच असतात, फक्त सर्व्हिंग नियम आणि गुणांच्या पद्धतीत किंचित फरक असतो…
यात खेळाडू ‘अंडरहँड’ पद्धतीनं सर्व्हिस करून चेंडूला जाळ्यावरून तिरप्या प्रकारे त्याच्या प्रतिस्पर्ध्याच्या सर्व्हिस कोर्टमध्ये फटकावतो. त्यानंतर जोपर्यंत एखादा खेळाडू चेंडू फटकावण्यास चुकत नाही तोपर्यंत चेंडू जाळ्यावरून एकमेकांकडे फटकावला जातो…
यात ‘किचन’ नावाचा ‘नो-व्हॉली झोन’ असतो, जो दोन्ही बाजूंनी जाळ्यापासून 7 फूट अंतरात असतो. या विभागात ‘व्हॉलिंग’ करण्यास मनाई असते…
पिकलबॉलमध्ये तीन मूलभूत प्रकारचे ‘फॉल्ट’ असतात. जर सर्व्हिस ‘किचन’ क्षेत्र ओलांडून गेली नाही, फटका सीमारेषेबाहेर म्हणजे बेसलाइनच्या मागं किंवा साइडलाइनच्या बाहेर जाऊन पडला वा जाळ्यावर चेंडू हाणला, तर ‘फॉल्ट’ गणला जातो…
गुण केवळ सर्व्हिस करणाऱ्या संघालाच मिळतात. प्रत्येक ‘गेम’ 11 गुणांवर जाते, परंतु ती जिंकण्यासाठी दोन गुणांचा फरक असणं आवश्यक असतं. एका लढतीत सहसा तीन ‘गेम्स’चा समावेश असतो…

– राजू प्रभू
आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक जिंकायचं आहे
फिरोज मुलाणी /औंध
सांगलीत झालेल्या पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी मी तयारीनिशी गेली होती मात्र प्रतिक्षाने टांग मारल्यामुळे परतीचा रस्ता धरावा लागला होता. यंदा मात्र चुक सुधारली अंतिम फेरीत प्रतिक्षाची टांग धरुनच गुण वसूल केले. जिंकण्याचा आत्मविश्वास होता त्यामुळेच निर्णायक क्षणी निकाल बदलण्यात यश मिळाले. महाराष्ट्र केसरी किताब मिळाला याचा आनंद आहेच. आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक जिंकणे माझे पुढचे ध्येय आहे. कुस्तीपंढरी कोल्हापूरला मानाची महिला महाराष्ट्र केसरी किताब जिंकून देणारी शिरोळची अमृता पुजारी तरुण भारत बरोबर बोलताना सांगत होती.
घरी कुस्तीचा वारसा आहे. पणजोबा राजर्षी शाहू महाराज यांच्याकडे दत्तक मल्ल होतं आजोबा पैलवान होते. वडील शिरोळ साखर कारखान्यात नोकरीला आहेत. कुटुंबातील वडील चुलते सर्वांचे पाठबळ असल्याने मी कुस्तीकडे वळले. कोरोना महामारी संकट असले तरी ती माझ्यासाठी संधी घेऊन आला. माझा कुस्तीकडे असणारा कल पाहून घरच्यांनी मला मुरगुड येथील स्व. सदाशिव मंडलिक कुस्ती केंद्रात पाठवले. वस्ताद सुखदेव येरुडकर आणि प्रशिक्षक दादासाहेब लवटे यांनी मला दिशा दाखवली. आंतरराष्ट्रीय कुस्तीगीर स्वाती शिंदे, नंदिनी साळोखे यांच्यामुळे माझा हुरुप वाढला. कुस्तीत करीयर करायचे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून मी सरावात सातत्य ठेवले आहे. दररोज कसून आठ तास सराव होतो. शिवाय लवटे सर  डायट, कुस्तीत  बदललेले नियम याची माहिती देत असतात याचा देखील स्पर्धेदरम्यान फायदा होतो. चंद्रपूर येथील नवीन पाण्यामुळे पोट बिघडणार याची काळजी घेऊन मुरगुड मधून पाण्याचे जार घेऊन गेलो होतो. सरांनी दिलेल्या सुचनेनुसार डायट आणि मैदानात खेळ करीत गेले याचा फायदा स्पर्धेत झाला.
ऐन स्पर्धेच्या तोंडावर ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धा होत्या. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा तोंडावर असल्याने दुखापत नको याकरिता राज्यातील काही प्रतिस्पर्धी मल्ल या स्पर्धेत उतरले नाहीत. मात्र मी प्रशिक्षक लवटे सरांच्या मार्गदर्शनाखाली धाडस करून स्पर्धेत  सहभागी झाले. राष्ट्रीय स्तरावरील मल्लांचा स्पर्धेत सामना करावा लागला यामुळे भीती कमी झाली. शिवाय आत्मविश्वास वाढला याचा सुध्दा मला फायदा झाला. 2023 वर्ष माझ्यासाठी अतिशय फलदायी ठरले आहे. वर्षाच्या सुरुवातीला मी कोल्हापूरला झालेल्या स्पर्धेत खुल्या गटात शाहू केसरी किताब जिंकला. गोव्यात झालेल्या नॅशनल गेम मध्ये कांस्यपदक मिळविले. महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर आता वरीष्ठ राष्ट्रीय स्पर्धेची मी तयारी करणार आहे. महाराष्ट्र केसरी किताब कोल्हापूरला जिंकून दिला, यामुळे माझा आनंद द्विगुणित झाला आहे. लवटे सरांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय स्तरावरील पदक मला जिंकायचे असल्याचे अमृताने आवर्जून सांगितले.
शेवटच्या क्षणी बाजी पलटली
सेमी फायनलच्या कुस्तीत भाग्यश्री आघाडीवर होती. मी विजयाची संधी शोधत होते. शेवटचे दोन सेकंद बाकी होते अंतिम क्षणी मी गदालोट मारला आणि निकाल बदलला. तीच स्थिती फायनलमध्ये होती. प्रतिक्षा ओढून कुस्ती करते. ती कधी चूक करतेय याची मी वाट पहात होते. शेवटचे दहा सेकंद उरले होते विजयाचे पारडे प्रतिक्षाच्या बाजूने झुकले होते. या निर्णायक क्षणी मी प्रतिक्षाचा टांग मारण्याचा प्रयत्न अपयशी ठरवून विजयी गुण मिळवला. अर्थात हे सर्व अनपेक्षित आहे मात्र मी धोका पत्करून विजयाला गवसणी घातली होती.
राष्ट्रीय स्पर्धेवर फोकस
पहिल्याच वर्षी महाराष्ट्र केसरी होईन वाटले होते, मात्र सुरवातीला पराभवाचे तोंड पाहावे लागले. प्रशिक्षक दादा लवटे यांनी वर्षभर कच्च्या बाजू सुधारुन घेतल्या शिवाय वर्षभरात  प्रतिक्षा बागडी, भाग्यश्री फंड यांच्या बरोबर झालेल्या मैदानी कुस्तीत त्यांच्या ताकदीचा अंदाज आला. लढण्याचे तंत्र समजले याचाच बारकाईने अभ्यास केला. स्पर्धेत सरांनी दिलेल्या नियोजननानुसार खेळ करीत गेल्यामुळे किताब जिंकता आला असल्याचे अमृताने सांगितले.
 

Go to Source