स्पोर्ट्स mania
‘स्विंग’चा ‘सुलतान’…अँडरसन !
भारताची अफगाणिस्तानबरोबरची ‘टी-20’ मालिका संपलीय अन् आता वेध लागलेत ते इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेचे. ही मालिका प्रचंड महत्त्वाची आहे ती आर. अश्विनप्रमाणंच जेम्स अँडरसनसाठी देखील…अश्विनला 500 बळी घेणारा भारताचा दुसरा फिरकी गोलंदाज, तर अँडरसनला 700 बळींचा टप्पा गाठणारा इतिहासातील पहिलावहिला वेगवान गोलंदाज ठरण्यासाठी गरज आहे ती प्रत्येकी 10 बळींची…वयाची चाळिशी ओलांडून देखील इंग्लंडचा हा ‘स्विंगचा सुलतान’ थकलेला नाही, उलट नव्या जोमानं सिद्ध झालाय…आणखी सहा दिवसांनी सुरू होणाऱ्या मालिकेच्या निमित्तानं जेम्स अँडरसनच्या भारताविरुद्धच्या कामगिरीवर टाकलेला हा प्रकाशझोत…
साल 2021…इंग्लंडला भारताविरुद्धच्या त्या मालिकेत 1-3 अशा फरकानं पराभवाची नामुष्की सहन करावी लागली. त्यांचा एकमेव विजय नोंदला गेला तो चेन्नईतील पहिल्या कसोटीत. त्यात भारत दुसऱ्या डावात अवघ्या 192 धावांवर गारद झाला अन् त्याचा पाया घातला तो सदैव आपल्याला पिडलेल्या इंग्लंडच्या त्या घातक शस्त्रानं…लढतीचा शेवटचा दिवस खेळून काढण्याच्या भारताच्या इराद्यांना सुरुंग लावताना त्यानं पडझड सुरू केली. चिपॉकवरील खेळपट्टी आधीच संथ अन् पाचव्या दिवशी तर ती आणखी मंदावते. अशा वेळी एखाद्या चेंडूनं फलंदाजाची यष्टी उडवून लावण्याचं दृष्य पाहायला मिळणं दुर्मिळच…परंतु त्याच्या दुसऱ्याच चेंडूनं सलामीवीर शुभमन गिलचा ‘ऑफ स्टंप’ उखडून टाकला. चौथ्या चेंडूवर अजिंक्य रहाणे पायचित होता होता वाचला, मात्र त्याचा उपयोग झाला नाही. पाचव्या चेंडूनं भारताच्या या तत्कालीन उपकर्णधाराचा ‘ऑफ स्टंप’ गुल केला…तिन्ही वेळा चेंडू ‘रिव्हर्स स्विंग’ झाला…पाठोपाठ ऋषभ पंतला परतीची वाट दाखविताना याचाच कित्ता गिरविला गेला…
वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन हे नाव प्रसंगी किती संहारक बनू शकतं, त्याला ‘स्विंगचा सुलतान’ का म्हटलं जातं त्याचा हा समर्थ दाखला…दिवस संपला तेव्हा त्याच्या गोलंदाजीचे आकडे होते 11-4-17-3 अन् भारताच्या वाट्याला आला होता 227 धावांनी पराभव…त्या दिवशी अँडरसननं टाकलेलं पहिलं षटक हे आधुनिक काळातील कसोटी क्रिकेटमधील ‘रिव्हर्स स्विंग’च्या सर्वांत प्रभावी प्रदर्शनांपैकी एक मानलं जातं…
त्यानंतर अहमदाबादच्या स्टेडियमवरील चौथ्या कसोटीत भारतानं फिरकीसाठी पोषक खेळपट्टी बनविल्यानं जेम्स अँडरसनची भूमिका कमीच राहिली असली, तरी या वेगवान गोलंदाजानं केलेला मारा काही कमी तिखट नव्हता. भारताच्या पहिल्या डावात त्यानं 25 षटकांपैकी 14 निर्धाव टाकताना केवळ 44 धावांत 3 बळी घेतले. अँडरसनचं वय नि एकंदर परिस्थिती पाहता हा ‘स्पेल’ विलक्षणच म्हणायला हवा…पण त्याची सर्वांत विध्वंसक गोलंदाजी पाहायला मिळाली ती 2011 व 2014 मधील मायदेशातील मालिकांत. त्यावेळी तो आपल्या कारकिर्दीतील एका उत्कृष्ट टप्प्यात होता…
त्या दोन मालिकांदरम्यान जेम्स अँडरसननं दाखवून दिली ती खराब कामगिरीतून लगेच उसळी घेण्याची, दमदार पुनरागमन करण्याची क्षमता…त्याचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे आपली गोलंदाजी कुठं चुकते, कसलं आयुध काम करत नाही याचं नेहमी विश्लेषण करत राहण्याबरोबर झटपट बदल घडविण्यासाठी आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी तो विख्यात…हे अँडरसनला आणखी धोकादायक बनवतं. कारण एखाद्या दिवशी त्याच्या हातून चांगली कामगिरी घडली नाही म्हणून कोणीही त्याचं आव्हान जमेस न धरता राहू शकत नाही…
2011 च्या मालिकेत लॉर्ड्सवरील पहिल्या कसोटीतील भारताच्या पहिल्या डावात 23.5 षटकं मारा करून जेम्स अँडरसनला 87 धावांत अवघे 2 बळी मिळविता आले. त्याच्या दर्जाचा विचार करता हे अपेक्षाभंग करणारं प्रदर्शन…पण अंतिम दिवशी पाच बळी मिळवताना त्यानं भारतीय फलंदाजांना आश्चर्यचकीत करून सोडलं. शेवटच्या दिवसाची सुऊवात 1 बाद 80 धावांवरून केल्यानंतर भारतानं मनसुबा बाळगला होता तो इंग्लंडचा विजयाचा प्रयत्न हाणून पाडण्याचा. पण अँडरसननं राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्ही. व्ही. एस. लक्ष्मण व सुरेश रैना यांना पॅव्हेलियनमध्ये रवाना करत बरोबरीचं रुपांतर विजयात केलं…
2014 च्या मालिकेत देखील पाहायला मिळाली ती अशीच स्थिती…भारतानं लॉर्ड्सवर इंग्लंडला पराभूत करून 1-0 अशी आघाडी घेतल्यानंतरही मालिका शेवटी 3-1 अशा फरकानं यजमानांच्या खात्यात गेली. कारण जेम्स अँडरसननं सारा फरक घडवून हाणला. त्यानं तब्बल 25 बळी मिळविले अन् मालिकावीराचा किताब स्वाभाविकपणे चालून गेला तो त्याच्याकडे…
इंग्लंडच्या कुठल्याही क्रिकेटपटूप्रमाणं जेम्स अँडरसनसाठी देखील ‘अॅशेस’ ही अंतिम अन् सर्वांत गौरवास्पद लढाई. परंतु तो आपलं सर्वोत्तम कौशल्य नेहमी भारताविऊद्ध राखून ठेवतो असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये. याचा पुरावा मिळतो तो आकडेवारीतून…नाही तरी अव्वल गोलंदाज वा फलंदाजांना सर्वोत्कृष्ट खेळाडूंविरुद्ध कर्तबगारी बजावताना मिळणारा आनंद वेगळाच असतो. जेव्हा अँडरसननं 2000 च्या दशकाच्या प्रारंभी खेळायला सुऊवात केली तेव्हा सर्वांत प्रबळ फलंदाजी होती ती भारताकडे. तेंडुलकर, द्रविड, लक्ष्मण, गांगुली आणि सेहवाग अशी गोलंदाजांना नाव ऐकताक्षणी घाम फुटण्याजोगी ही पलटण. अँडरसनला त्यांच्याविऊद्ध पहिली संधी मिळाली ती मार्च, 2006 मध्ये. वानखेडेवर झालेल्या त्या पहिल्याच कसोटीत एकूण सहा बळी टिपताना त्यानं तेंडुलकर, द्रविड नि सेहवागसारख्यांना गारद करून दाखविलं…
वरील दिग्गज निवृत्त झाल्यानंतर जेम्स अँडरसनची लक्ष्यं बदलली. त्यांची जागा घेतली ती विराट कोहली, चेतेश्वर पुजारा नि अजिंक्य रहाणे यांनी. महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याविरुद्धही त्यानं तशाच प्रकारच्या यशाची चव चाखलीय…अँडरसन हे केवळ हमखास बळी मिळविण्याचं शस्त्र नाही. नवीन चेंडूवर फलंदाजांची तारांबळ उडविणारा त्याचा पहिला स्पेल पाहणं हा कुठल्याही अस्सल क्रिकेट शौकिनासाठी रोमांचक अनुभव. परंतु तितकाच प्रेक्षणीय असतो तो डावपेचांत किंचित बदल करून त्याच्याकडून जुन्या चेंडूवर केला जाणारा धारदार मारा…
2006 पासून भारताला जेम्स अँडरसन सातत्यानं दणके देत आलाय. आपल्याविरुद्धच्या 35 कसोटींमध्ये त्यानं मिळविलेत 139 बळी. कोणत्याही संघाविऊद्ध त्याला इतकं यश मिळालेलं नाहीये त्याखालोखाल क्रमांक लागतो तो ऑस्ट्रेलियाचा (39 सामन्यांतून 117 बळी)…गेल्या वर्षीच्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेतील दोन कसोटींत 10 बळी घेतल्यानंतर अॅशेसमध्ये अँडरसनकडून अगदीच निराशा झाली. पाच सामन्यांच्या त्या मालिकेत 0-2 नं पिछाडीवर पडल्यानंतर इंग्लंडनं जोरदार उसळी घेऊन बरोबरी साधली खरी, परंतु जेम्स अँडरसनला चार कसोटी लढतींतून केवळ पाच बळी खात्यात जमा करता आले. सरासरी पाहिल्यास त्याला प्रत्येक बळीसाठी 30.5 षटकं वाट पाहावी लागली…असं असलं, तरी इतिहासाचा विचार करता 41 वर्षांच्या या भेदक गोलंदाजापासून भारतानं अत्यंत सावध राहणंच योग्य ठरेल !
भारत दौऱ्यासाठी जय्यत तयारी…
41 व्या वर्षी देखील जेम्स अँडरसनचा परिपूर्णतेचा ध्यास कमी झालेला नाहीये. ‘अॅशेस’मध्ये फारसा प्रभाव पाडता न आल्यानंतर, गेल्या वर्षी जुलैमध्ये त्या मालिकेत शेवटचा व्यावसायिक क्रिकेट सामना खेळल्यानंतर त्यानं मागील सहा महिने घालवलेत ते त्याच्या ‘रनअप’मध्ये सुधारणा करण्यासाठी. याकरिता त्यानं फुटबॉल क्लब मँचेस्टर सिटीच्या इतिहाद स्टेडियमच्या शेजारी असलेला सार्वजनिक धावण्याचा ‘ट्रॅक’ वापरला आणि ‘स्पीड ड्रील’चाही आधार घेतला…
भारतातील 13 सामन्यांत अँडरसनन 29.32 च्या सरासरीनं घेतलेत 34 बळी. या भूमीतील इंग्लंडच्या चार कसोटी विजयांत त्यांचं योगदान राहिलंय अन् त्यापैकी तीन सामन्यांत त्यानं बजावलेली भूमिका अत्यंत मोलाची…2005-06 मध्ये मुंबईत 79 धावांत 6 बळी, 2012-13 मध्ये कोलकाता इथं 127 धावांत 6 बळी अन् 2020-21 मध्ये चेन्नईत 63 धावांत 5 बळी…
600 हून अधिक कसोटी बळी मिळविणारा पहिला वेगवान गोलंदाज असलेल्या अँडरसनचा हा सहावा भारतीय दौरा. त्यासरशी त्याला प्राप्त होईल तो भारतीय भूमीवर कसोटी सामना खेळणारा सर्वांत वयस्कर वेगवान गोलंदाज ठरण्याचा…
या मालिकेत विराट कोहली नि अँडरसन यांच्यातील चुरशीची लढतही पाहायला मिळेल. दोघेही आतापर्यंत 33 कसोटी डावांमध्ये आमनेसामने आलेत. त्यात अँडरसननं सात वेळा कोहलीचा बळी मिळविलाय, तर विराटनं त्याच्याविरुद्ध 43.57 च्या प्रभावी सरासरीनं 305 धावा केल्याहेत….
कसोटींत सर्वाधिक बळी मिळविलेले गोलंदाज…
मुथय्या मुरलीधरन : 800
शेन वॉर्न : 708
जेम्स अँडरसन : 690
अनिल कुंबळे : 619
स्टुअर्ट ब्रॉड : 604
ग्लेन मॅकग्रा : 563
भेदक गोलंदाजी…
प्रकार सामने डाव बळी डावात सर्वोत्कृष्ट सामन्यात सर्वोत्कृष्ट सरासरी 5 बळी 10 बळी
कसोटी 183 341 690 42 धावांत 7 बळी 71 धावांत 11 बळी 26.42 32 3
वनडे 194 191 269 – 23 धावांत 5 बळी 29.22 2 –
टी20 19 19 18 – 23 धावांत 3 बळी 30.67 – –
खेळ जुनाच ओळख नवी ! : फ्रीस्टाईल कुस्ती
जगभरात प्रचलित असलेल्या कुस्तीच्या अनेक शैलींपैकी सर्वांत लोकप्रिय ती कुठली असं विचारल्यास ‘फ्रीस्टाईल’ असंच उत्तर द्यावं लागेल. या शैलीनं 1904 च्या सेंट लुईस खेळांतून ऑलिम्पिकमध्ये पदार्पण केलं. तथापि, ‘फ्रीस्टाईल कुस्ती’ ही ‘ग्रीको रोमन’ कुस्तीच्या बरोबरीनं ऑलिम्पिकमध्ये कायमस्वरूपी क्रीडाप्रकार बनला तो अँटवर्पमधील 1920 च्या स्पर्धेपासून…
‘ग्रीको रोमन’प्रमाणंच एक सामान्य फ्रीस्टाईल कुस्ती लढत 30 सेकंदांच्या ‘ब्रेक’सह तीन मिनिटांच्या दोन सत्रांत विभागली असते. अधिकृत 15 वर्षांखालील, कॅडेट्स आणि प्रौढांच्या लढतीसाठी या सत्रांचा कालावधी प्रत्येकी दोन मिनिटांपर्यंत कमी केला जातो…
यात दोन स्पर्धक कुस्तीगीर नऊ मीटर व्यासाच्या ‘मॅट’वर एकमेकांना सामोरे जातात. प्रतिस्पर्ध्याच्या दोन्ही खांद्यांना कमी कालावधीसाठी का असेना, ‘मॅट’वर टेकविण्याचा प्राथमिक उद्देश त्यात बाळगला जातो अन् अशा प्रकारे कुस्तीपटूला चीत करणं झटपट विजय मिळवून देऊन जातं…
आधुनिक काळातील कुस्तीमध्ये, खास करून ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये अशा प्रकारे प्रतिस्पर्ध्याला चीत करून विजय मिळविता येणं ही दुर्मिळ गोष्ट असते. मात्र एखादी लढत जिंकण्यासाठी इतर अनेक मार्ग असतात…
यापैकी सर्वांत सामान्य तो गुणांच्या आधारे मिळविलेला विजय. वैध पद्धतीनं धरून ठेवणं, फेकणं, पाडणं, युक्तीनं प्रतिस्पर्ध्याची पाठ मॅटवर अनेक सेकंदांसाठी टेकविणं किंवा बचावात्मक स्थितीतून उसळी घेऊन अनुकूल परिस्थितीत असलेल्या प्रतिस्पर्ध्यावर वर्चस्व गाजविणं याद्वारे कुस्तीपटू गुण कमावू शकतो…
कुस्तीपटूनं केलेल्या चाली किती कठीण आहेत त्यावरून गुण प्राप्त होतात. एका चालीतून 1 ते 5 पर्यंतचे गुण प्राप्त करतात येतात. जास्त गुण मिळवून देणाऱ्या चालींमध्ये खास करून प्रतिस्पर्ध्याला उचलून खाली फेकणं वा पाडणं जास्तीत जास्त गुण मिळवून जातं…
जर प्रतिस्पर्ध्यानं नियमांचं उल्लंघन केलं, तर कुस्तीपटूला गुण मिळू शकतात. जसं की बेकायदेशीर पद्धतीनं धरून ठेवणं, पकडीच्या वेळी बचाव, प्रतिकार करण्याऐवजी पळून जाण्याचा प्रयत्न करणं, खूप नकारात्मक किंवा निक्रिय असणं इत्यादी. यामुळे सहसा इशारा दिला जातो. एका लढतीच्या दरम्यान तीन इशारे मिळाल्यास दोषी कुस्तीगीर आपोआप अपात्र ठरतो…
सहा मिनिटांच्या लढतीच्या शेवटी गुण एकत्र केले जातात आणि सर्वाधिक गुण मिळवणारा कुस्तीगीर विजयी घोषित केला जातो. बरोबरी झाल्यास ज्या कुस्तीपटूनं एकाच चालीतून जास्तीत जास्त गुण मिळवलेले आहेत त्याला विजेता घोषित केलं जातं…जर कुस्तीपटू तो निकष लावल्यानंतर देखील समान पातळीवर राहत असतील, तर मिळालेल्या इशाऱ्यांची कमीत कमी संख्या आणि नोंदविलेला अंतिम गुण यांना ‘टायब्रेकिंग’ घटक म्हणून विचारात घेतलं जातं…
‘फ्रीस्टाईल’मध्ये एखाद्यानं सामन्याच्या कोणत्याही टप्प्यावर त्याच्या प्रतिस्पर्ध्यावर 10 गुणांची आघाडी मिळविल्यास लढत संपल्याचं घोषित केलं जातं आणि आघाडीवर असलेल्या कुस्तीपटूला तांत्रिक श्रेष्ठतेनुसार विजेता ठरविलं जातं…
‘फ्रीस्टाईल नि ‘ग्रीको रोमन’ या दोन शैलींमधील सर्वांत महत्त्वाचा फरक म्हणजे पायांचा वापर. ‘ग्रीको रोमन’मध्ये प्रतिस्पर्ध्याला कंबरेच्या खाली धरून ठेवणं किंवा बचाव वा आक्रमणासाठी पायांचा वापर करणं वर्ज्य आहे. ‘फ्रीस्टाइल’ शैलीच्या कुस्तीमध्ये मात्र असं कोणतंही बंधन लागू होत नाही…
‘फ्रीस्टाइल’मध्ये बरंच स्वातंत्र मिळतं अन् कुस्तीपटूला प्रतिस्पर्ध्याचे नितंब, पाय यावर हल्ला करण्याची परवानगी मिळते. म्हणून या शैलीतील लढतीच्या सुरुवातीला सहसा कुस्तीपटू पायांचा बचाव करण्याच्या दृष्टीनं खूप वाकून राहण्याचा पवित्रा घेतात…
– राजू प्रभू
गोव्याची सक्षम पॅरा अॅथलेट : साक्षी काळे
नरेश गावणेकर /फोंडा
जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासाला कठोर परिश्रमाची जोड मिळाली तर आपण जीवनात यशस्वी होऊ शकतो. अशीच जिद्द मनात ठेवून यशाची पायरी चढत आहे गोव्याची साक्षी ईश्वर काळे. दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या पहिल्या खेलो इंडिया पॅरा अॅथलेटिक स्पर्धेत तिने रौप्य व कांस्यपदक पटकावून गोव्यासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. अशी कामगिरी करणारी ती गोव्याची पहिली पॅरा अॅथलेट ठरली आहे. 10 ते 17 डिसेंबर 2023 दरम्यान झालेल्या या स्पर्धेत तिने टी 11/12 विभागात लांब उडीत रौप्य तर 100 मी. शर्यतीत कांस्यपदक प्राप्त केले. त्यापूर्वी 2022 साली भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय वरिष्ठ पॅरा अॅथलेटिक स्पर्धेत तिने लांब उडीत सुवर्ण, 200 मी. शर्यतीत रौप्य तर जानेवारी 2023 मध्ये गुजरात येथे झालेल्या स्पर्धेत लांब उडीत सुवर्ण, गोळाफेकीत रौप्य व 100 मी. शर्यतीत रौप्यपदक पटकावले आहे. याशिवाय 2023 मध्ये बेंगलुरु येथे झालेल्या इंडियन ओपन पॅरा अॅथलेटिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत 100 मी. शर्यतीत रौप्यपदक पटकावले होते. अॅथलेटिक्समध्ये तिला प्रशिक्षक स्नेहा मोरे व देवी गावकर यांचे मार्गदर्शन लाभले. साक्षी ही ‘पार्शल ब्लाईंड’ आहे. अंधुक दृष्टी असलेल्या साक्षीने केलेली कामगिरी तिच्या जिद्दीची साक्ष देत आहे.
अॅथलेटिक क्षेत्रामुळे जीवन बदलले
19 वर्षीय साक्षीचे बालपण कडसाल-खांडेपार, फोंडा येथे गेले. सध्या तिचे कुटुंब पालवाडा-उसगांव येथे राहत आहे. लहानपणापासून तिला फुटबॉल खेळायला आवडायचे. या खेळात तिला कारकीर्द घडवायची होती. परंतु कोरोना काळात ती खेळू शकली नाही. तसेच तिला गुडघ्याचे दुखणे सुरु झाले व गुडघ्यावर शस्त्रक्रीया करावी लागली. या कारणाने तिला फुटबॉल सोडून द्यावा लागला. याचवेळी येथील एक समाजसेवक सुदेश गावडे यांनी तिची ओळख गोवा पॅरालिम्पिक संघटनेचे अध्यक्ष सुदेश ठाकूर यांच्याशी करुन दिली. त्यामुळे तिने अॅथलेटिक क्षेत्रात प्रवेश केला. आज ती या क्षेत्रात यशाची शिखरे चढत आहे. या नवीन क्रीडा प्रकारामुळे तिचे जीवन बदलले आहे.
कुटुंबाची मोलाची साथ व प्रोत्साहन
साक्षीला क्रीडा क्षेत्रातील वाटचालीस कुटुंबाची मोलाची साथ लाभत आहे. तिची आई मिलन व वडील ईश्वर तसेच दोन मोठ्या बहिणी तिला सतत पाठींबा देत असतात. स्पर्धेत सहभागी होताना तिच्याबरोबर आई असते. दिल्ली येथे झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत तिचे वडील प्रथमच तिला धावताना पाहायला गेले होते. याचवेळी तिने दोन पदके पटकावून गेव्यासाठी ऐतिहासिक कामगिरी केली. तिचे वडील ईश्वर हे योगेश खांडेपारकर या बांधकाम कंत्राटदाराकडे ड्रायव्हर म्हणून काम करतात तर आई गृहिणी आहे. तिच्या यशस्वी कामगिरीमुळे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व विविध संस्थाकडून तिला सन्मानीत करण्यात आले आहे. साक्षीचे शालेय शिक्षण खांडेपार येथील एमआयबीके हायस्कूल व नंतर फोंडा येथील जीव्हीएम उच्च माध्यमिक विद्यालयात झाले. सध्या ती खांडोळा येथील सरकारी महाविद्यालयात बॅचलर इन वोकेशनल सॉफ्टवेअर अभ्यासक्रमात प्रथम वर्षात शिकत आहे. याशिवाय उसगाव येथील शिव सांस्कृती प्रतिष्ठानच्या ढोलताशा पथकात ती ढोलवादन करीत आहे.
सहकार्य केलेल्यांचे आभार
साक्षीला अनेक लोकांनी मदत व पाठींबा दिला आहे. अशा दात्यांचे, मार्गदर्शकांचे, प्रशिक्षकांचे तसेच मुख्यमंत्री, मंत्री, आमदार, ग्रामपंचायत, सरपंच, पंचसदस्य, योगेश खांडेपारकर, शासकीय खाते व अधिकारी, गोवा पॅरालिम्पिक संघटना, दिव्यांग संस्था व इतरांचे तिने आभार मानले आहे.
दिव्यांगांना मदत करण्याचा मानस
दिव्यांगाच्या समस्या काय असतात याची तिला पूर्ण जाणिव आहे. अनेकाना घराबाहेर पडण्याचा, शिक्षण घेण्याचा तसेच खेळात सहभागी होण्याचा विचारही मनात येत नाही. अशा मुलांना भविष्यात सहकार्य करण्यासाठी ती पुढाकार घेणार आहे.