Zilla Parishad Election : उंब्रज – पाल जिल्हा परिषद गटात सकाळपासून उत्स्फूर्त मतदान

                                उंब्रज जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढत उंब्रज : नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उंब्रज व पाल जिल्हा परिषद गटात मतदारांचा सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत या दोन्ही गटांमध्ये […]

Zilla Parishad Election : उंब्रज – पाल जिल्हा परिषद गटात सकाळपासून उत्स्फूर्त मतदान

                                उंब्रज जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढत
उंब्रज : नऊ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर होत असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उंब्रज व पाल जिल्हा परिषद गटात मतदारांचा सकाळपासूनच उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दुपारी एक वाजेपर्यंत या दोन्ही गटांमध्ये सरासरी ४० टक्के मतदान झाले असून सकाळी ११ वाजल्यानंतर मतदानासाठी मतदारांची गर्दी वाढू लागल्याचे चित्र होते.
दुपारी उन्हाचा तडाखा वाढल्यानंतर काही काळ मतदानाचा वेग मंदावल्याचे दिसून आले. मात्र, प्रशासनाच्या वतीने वृद्ध व अपंग मतदारांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर व्हीलचेअर व आवश्यक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने मतदान प्रक्रिया सुरळीतपणे पार पडत आहे.
गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उंब्रज व पाल परिसरात जोरदार प्रचार सुरू होता. मूळतः ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार होते. मात्र, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अपघाती दुर्दैवी घटनेनंतर मतदान प्रक्रिया पुढे ढकलून ७ फेब्रुवारी रोजी घेण्यात आली. त्यामुळे सर्वच उमेदवारांना प्रचारासाठी आणखी दोन दिवसांचा अवधी मिळाला. या कालावधीत भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (एकनाथ शिंदे गट) यांच्यासह इतर पक्षांनी उंब्रज व पाल जिल्हा परिषद गटात सक्षम उमेदवार उभे करून जोरदार प्रचार केला. दोन्ही गटांमध्ये जिल्हा परिषदेसाठी सर्वसाधारण पुरुष आरक्षण असल्याने निवडणूक लढत अतिशय चुरशीची झाली आहे.
उंब्रज जिल्हा परिषद गटात पंचरंगी लढत पाहायला मिळाली असून या ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सर्वच उमेदवारांनी घरोघरी जाऊन प्रचार केल्याने संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण तापले असून मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, उंब्रज गणात तिरंगी, तर तळबीड गणात चौरंगी लढत रंगली असून या दोन्ही गणांमध्ये उमेदवारांचे राजकीय भवितव्य पणाला लागले आहे. पाल जिल्हा परिषद गटात तिरंगी पाल गण व चरेगाव गणातही तिरंगी लढतीमुळे चुरस निर्माण झाली आहे.
या तिरंगी व बहुरंगी लढतींचा नेमका फायदा कोणत्या पक्षाला होणार, हे ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.