द. आफ्रिका प्रथमच वर्ल्डकप फायनलमध्ये

चोकर्सचा पुसून काढला डाग : उपांत्य फेरीत अफगाणिस्तानवर दणदणीत विजय : आफ्रिकन गोलंदाजांची शानदार कामगिरी : अफगाणचा स्वप्नभंग वृत्तसंस्था /त्रिनिदाद अँड टोबॅगो दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव करत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणचा संघ अवघ्या 56 धावांत गारद झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने किरकोळ लक्ष्याचा […]

द. आफ्रिका प्रथमच वर्ल्डकप फायनलमध्ये

चोकर्सचा पुसून काढला डाग : उपांत्य फेरीत अफगाणिस्तानवर दणदणीत विजय : आफ्रिकन गोलंदाजांची शानदार कामगिरी : अफगाणचा स्वप्नभंग
वृत्तसंस्था /त्रिनिदाद अँड टोबॅगो
दक्षिण आफ्रिकेने उपांत्य फेरीत अफगाणिस्तानचा 9 गडी राखून पराभव करत टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणचा संघ अवघ्या 56 धावांत गारद झाला. यानंतर दक्षिण आफ्रिकेने किरकोळ लक्ष्याचा सहज पाठलाग केला. दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 8.5 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात विजय मिळवला. विशेष म्हणजे, क्रिकेटच्या इतिहासात आफ्रिकन संघाने प्रथमच टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. 16 धावांत 3 बळी घेणाऱ्या मार्को जॅन्सेनला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. दरम्यान, भारत व इंग्लंड यांच्यातील विजयी संघ द. आफ्रिकेसोबत 29 जून रोजी बार्बाडोस येथे अंतिम सामना खेळेल.
येथील ब्रायन लारा स्टेडियमवर झालेल्या सामन्यात नाणेफेक जिंकून रशीद खानने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण त्याचा हा निर्णय त्यांच्यावरच उलटला. दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांसमोर अफगाणिस्तानच्या संपूर्ण संघाने गुडघे टेकले. अझमतुल्ला ओमरझाई व्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजास दुहेरी धावसंख्या पार करता आली नाही. अझमतुल्लाने सर्वाधिक 12 चेंडूत केवळ 10 धावा केल्या. अफगाणिस्तानचा संघ पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही, 11.5 षटकांत 56 धावा करुन ऑलआऊट झाला. विशेष म्हणजे, अफगाण संघाचा उपांत्य फेरीपर्यंतचा प्रवास अफलातून असा होता. पण, उपांत्य फेरीत मात्र अफगाण खेळाडूंनी आफ्रिकेसमोर सपशेल शरणागती पत्करली.
मार्को जॅन्सेनने पहिल्याच षटकात अफगाणिस्तानला धक्का देत गुरबाजला बाद केले. तर त्याच्या स्पेलमधील पुढच्या षटकात गुलबदिनला माघारी धाडले. पुढच्याच षटकात कागिसो रबाडाने दोन विकेट्स घेत अफगाणिस्तानचे कंबरडे मोडले. त्याने पहिल्या चेंडूवर इब्राहिम झद्रनला क्लीन बोल्ड केले. चौथ्या चेंडूवर त्याने मोहम्मद नबीलाही बोल्ड केले. यानंतर इतर तळाच्या फलंदाजांनीही हजेरी लावण्याचे काम केले. आफ्रिकेकडून मार्को जॅन्सेन व तबरेज शम्सी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले. रबाडा व नोर्तजे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
आफ्रिकेचा दणदणीत विजय
अफगाणिस्तानने दिलेले 57 धावांचे सोपे आव्हान आफ्रिकेने अवघ्या 8.5 षटकांत एका गड्याच्या मोबदल्यात पूर्ण केले. आफ्रिकेने रीझा हेंड्रिक्स आणि कर्णधार एडन मार्करम यांच्या नाबाद 55 धावांच्या भागीदारीच्या जोरावर अफगाणिस्तानविरुद्ध सहज विजय मिळवला. रीझा हेंड्रिक्सने 25 चेंडूत 29 तर एडन मार्करमने 21 चेंडूत 23 धावा केल्या. सलामीवीर डी कॉक मात्र लवकर बाद झाला. लक्ष्याचा पाठलाग करताना द. आफ्रिकेने सामन्यात एकतर्फी विजयाची नोंद केली. द. आफ्रिकेने 67 चेंडूत 9 विकेट्स शिल्लक असताना विजय मिळवत फायनलमध्ये एंट्री केली.
पराभवानंतर रशीद खान भावूक
टी-20 विश्वचषकात बलाढ्या संघांना हरवून उपांत्य फेरी गाठलेल्या अफगाणिस्तानच्या संघाची सध्या जगभरात चर्चा आहे. दक्षिण आफ्रिकेने अगदी लाजिरवाण्या धावसंख्येवर अफगाणिस्तानला रोखून उपांत्य फेरीतूनच माघारी पाठवलं असलं तरी इथवर पोहोचण्याचा प्रवास पाहता अनेक स्तरावरून रशीद खानच्या संघाचे कौतुक झाले. उपांत्य फेरीतील एकतर्फी पराभवानंतर मात्र कर्णधार रशीद भावूक झाल्याचे पहायला मिळाले. हा सामना आमच्यासाठी कठीण होता. एक संघ म्हणून आम्ही नक्कीच चांगली कामगिरी करू शकलो असतो. खरं सांगू का, आम्ही फलंदाजीत अपयशी ठरलो. पण पुढील काळात अधिक ताकदीने पुनरागमन करू. ज्यांनी आमच्यावर विश्वास ठेवला आणि लढा चालू ठेवण्यास आम्हाला मदत केली त्या प्रत्येकाचे आभार, असे रशीद सामन्यानंतर म्हणाला.
32 वर्षानंतर द.आफ्रिका अंतिम फेरीत
दक्षिण आफ्रिकेवर आतापर्यंत चोकर्सचा टॅग होता, तो त्यांनी पुसून काढला आहे. क्रिकेटच्या इतिहासात (वनडे व टी-20) तब्बल 32 वर्षांनंतर आफ्रिकेचा संघ विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. आतापर्यंत वनडे व टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत त्यांना 6 वेळा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर एक सामना त्यांचा टाय झाला होता. उपांत्य फेरीपर्यंत आफ्रिकन संघ पोहोचत होता पण अंतिम फेरीत त्यांना मजल मारता येत नव्हती. यामुळे संघाचा चोकर्स म्हणूनही उल्लेख करण्यात येत होता. पण, 2024 मधील या टी-20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत पोहोचत त्यांनी इतिहास रचला आहे. याशिवाय हा टॅग देखील पुसून काढला आहे. 1992 च्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेचा इंग्लंडकडून पराभव झाला होता. यानंतर 1999 मध्ये आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यातील मॅच टाय झाली होती. त्यांना 2007 मध्येही ऑस्ट्रेलियाविरुद्ध,  2009 मध्ये पाकिस्तानविरुद्ध, 2014 मध्ये भारताविरुद्ध, 2015 मध्ये न्यूझीलंडकडून तर 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता.
संक्षिप्त धावफलक
अफगाणिस्तान 11.5 षटकांत सर्वबाद 56 (इब्राहिम झद्रन 2, गुलबदिन नईब 9, ओमरझाई 10, करीम जनत 8, रशीद खान 8, तबरेज शम्सी 6 धावांत 3 बळी, यान्सेन 16 धावांत 3 बळी) द.आफ्रिका 8.5 षटकांत 1 बाद 60 (डिकॉक 5, हेंड्रिक्स 29, मार्करम 23, फारुखी 1 बळी)