‘स्मार्ट सिटी’ ठरतेय ठोकेदुखी

रस्ते खोदल्याने पणजी परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच पणजी : पणजी शहरातील मळा भागात कोर्तीन व इतर ठिकाणी जाणारे रस्ते खोदून ते बंद करण्यात आल्यामुळे शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची मोठी कुचंबणा होत आहे. वाहतूक कोंडीमुळे त्यांचे दररोज हाल होत असून शाळेतून सुटलेल्या आपल्या मुलांना शोधणे महाकठीण होऊन बसले आहे. मळा येथून जाणारा जुना बांबोळी […]

‘स्मार्ट सिटी’ ठरतेय ठोकेदुखी

रस्ते खोदल्याने पणजी परिसरात वाहतूक कोंडी नित्याचीच
पणजी : पणजी शहरातील मळा भागात कोर्तीन व इतर ठिकाणी जाणारे रस्ते खोदून ते बंद करण्यात आल्यामुळे शाळकरी मुले आणि त्यांचे पालक यांची मोठी कुचंबणा होत आहे. वाहतूक कोंडीमुळे त्यांचे दररोज हाल होत असून शाळेतून सुटलेल्या आपल्या मुलांना शोधणे महाकठीण होऊन बसले आहे. मळा येथून जाणारा जुना बांबोळी रस्ताही अनेक ठिकाणी खोदल्याने वाहतूक ठप्प होत असून तेथे दोन तीन ठिकाणी तरी वाहतूक पोलीस नेमण्यात यावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
शाळांच्या अवतीभवतीचे रस्ते बंद
खोदण्यात आणि बंद करण्यात आलेले रस्ते हे शाळांच्या अवतीभवती असल्यामुळे पालकाना मुलांना शाळेत पोहोचवणे आणि पुन्हा न्यायला येणे मोठी डोकेदुखी होऊन बसली आहे. चर्च चौकातून कोर्तीनमार्गे खाली उतरल्यानंतर डावीकडे वळणारे व जुन्या बांबोळी मार्गाला जोडणारे काही रस्ते खोदून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत.
शाळेत पोहोचायला होतोय उशीर
मेरी इमॅक्युलेट, पिपल्स हायस्कूल व इतर काही शाळा आहेत. त्या शाळांभोवती असणारे काही रस्ते खोदून बंद करण्यात आल्यामुळे शाळेत पोहोचायला मुलांना उशिर होतो तसेच शाळा सुटल्यानंतर वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे घरी जाण्यास उशिर होतो, असे अनुभव पालकांना, शाळकरी मुलांना येत आहेत.
अरुंद रस्त्यांवर वाहतूक कोंडी
जे रस्ते खुले आहेत ते लहान व अरुंद असल्यामुळे चारचाकी वाहने आली की वाहतूक ठप्प होते. त्यातच बांबोळी मार्गावर शाळेसभोवती काही वाहने पार्क करून ठेवली जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली की ती सुटता सुटत नाही.
वाहतूक कोंडी नियंत्रणासाठी पोलीस ठेवावेत
दुपारी शाळा सुटल्यानंतर होणारी कोंडी सोडण्यासाठी एकही पोलीस तेथे नेमण्यात आलेला नाही. त्यामुळे कोंडीतून सुटण्यासाठी वाहनचालकांना प्रामुख्याने पालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. ही कोंडी चुकवण्यासाठी अनेक वाहनचालक जुन्या न्यायालयाच्या मार्गाने वर जाऊन खाली उतरतात. परंतु तेथेही दोन्ही बाजूंनी वाहने वर-खाली येत असल्यामुळे कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. यावर उपाय म्हणून शाळांच्या आसपास व खुल्या असलेल्या रस्त्यावर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस ठेवावेत, अशी पालकांची मागणी आहे.