हिमाचलात सहा काँग्रेस आमदार अपात्र
तरीही पक्षांतर्गत खदखद कायमच, मंत्र्याच्या राजीनाम्यासंबंधी संभ्रम, भाजपचे स्थितीवर लक्ष
वृत्तसंस्था /शिमला
राज्यसभा निवडणुकीत ज्या सहा आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी करुन भारतीय जनता पक्षाला मतदान केले होते, त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. मात्र, तरीही पक्षांतर्गत खदखद कायम आहे. राजीनामा दिलेले मंत्री विक्रमादित्यसिंग यांनी राजीनामा मागे न घेण्याचे संकेत दिले आहेत. तर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू यांनी आयोजित केलेल्या भोजन कार्यक्रमाला 40 पैकी 31 आमदार उपस्थित राहिल्याने बंडखोरी अद्यापही असल्याचे स्पष्ट होत आहे. आपले सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करीत आहे, असा आरोप काँग्रेसने केला आहे. भारतीय जनता पक्ष पैशाच्या बळाचा उपयोग करुन लोकनियुक्त सरकार संपविण्याचा खेळ खेळत असला तरी आमचे सरकार भक्कम आहे, असा दावा काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश यांनी केला. भारतीय जनता पक्षाने काँग्रेसचे आरोप फेटाळले असून, ज्यांना पक्ष सांभाळता येत नाही, ते त्यांच्या अपयशाचे खापर विनाकारण आमच्यावर फोडत आहेत, असा प्रतिवार केला आहे.
नाट्यामय घडामोडी
हिमाचल प्रदेशात राज्यसभा निवडणुकीनंतर सलग तिसऱ्या दिवशीही मोठ्या घडामोडी घडल्या. विधानसभा अध्यक्षांनी काँग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांना अपात्र ठरविले आहे. या आमदारांनी मतदारांचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे त्यांना विधानसभेचे सदस्य म्हणून राहण्याचा अधिकार नाही. त्यामुळे त्यांना अपात्र ठरविण्यात येत आहे, असे त्यांनी आदेशात स्पष्ट केले आहे. काँग्रेसने या आमदारांची पक्षातूनही 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आव्हान देणार
पक्षादेश काढण्यात न आल्याने आम्ही आमच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार मतदान केले. त्यामुळे आमची विधानसभेतून हकालपट्टी केली जाऊ शकत नाही, असे स्पष्ट करत, या सहा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाईल, असे प्रतिपादन केले आहे. विधानसभा अध्यक्षांनी आमची बाजू विचारात न घेताच दिलेला हा निर्णय लोकशाहीविरोधी असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. लवकरच पुढचे पाऊल ते उचलणार आहेत.
भारतीय जनता पक्षाचा आरोप
राज्यातील काँग्रेस सरकारने आपले बहुमत गमावले असल्याचे राज्यसभा निवडणुकीत स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. भारतीय जनता पक्षाच्या 15 आमदारांना निलंबित करुन हे सरकार सत्तेला चिकटून राहण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र तो यशस्वी होणार नाही. हे सरकार आता पडण्याच्या बेतात आहे, अशी टिप्पणी भारतीय जनता पक्षाने केली आहे.
कमी आमदार उपस्थित
हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुख्खू यांनी काँग्रेसच्या आमदारांसाठी प्रीतीभोजनाचे आयोजत केले होते. मात्र या कार्यक्रमाला 40 पैकी 31 आमदार उपस्थित राहिल्याने, सहा आमदारांना अपात्र ठरविल्यानंतरही पक्षात फूट कायम असल्याचे स्पष्ट झाले. कारण आणखी तीन आमदार या भोजनाला अनुपस्थित राहिले. यावरुन अद्याप सारे काही ठीक नाही, हे दिसून येत आहे.
राजीनाम्यासंबंधी संभ्रम
हिमाचल प्रदेशातील मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी बुधवारी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. पण नंतर त्यांनी राजीनामा स्वीकारण्याचा आग्रह पक्षश्रेष्ठींकडे धरणार नसल्याचे स्पष्ट केले होते. पण गुरुवारी त्यांनी राजीनामा मागे घेणार नसल्याचे संकेत दिल्याने काँग्रेसच्या वर्तुळात चिंता वाढल्याचे दिसून येत आहे.
अपात्रतेलाही विरोध
काँग्रेसच्या हिमाचल प्रदेश शाखेच्या अध्यक्षा प्रतिभा सिंग यांच्या विधानांमुळेही काँग्रेसची कोंडी होत आहे. पक्षाने सहा आमदारांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याचे पाऊल उचलावयास नको होते अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. आमदारांच्या भावना समजून घेणे योग्य ठरले असते. असे प्रतिपादन त्यांनी केले.
सुक्खू लोकसभा निवडणुकीपर्यंतच
हिमाचलचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुक्खू हे मुख्यमंत्रिपदावर लोकसभा निवडणूक होईपर्यंतच राहतील, असेही संकेत काँग्रेसकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर काय होणार याची चर्चाही आतापासूनच होत आहे. परिणामी अस्थिरतेच्या आणखी लाटा येत राहण्याची शक्यता आहे.
Home महत्वाची बातमी हिमाचलात सहा काँग्रेस आमदार अपात्र
हिमाचलात सहा काँग्रेस आमदार अपात्र
तरीही पक्षांतर्गत खदखद कायमच, मंत्र्याच्या राजीनाम्यासंबंधी संभ्रम, भाजपचे स्थितीवर लक्ष वृत्तसंस्था /शिमला राज्यसभा निवडणुकीत ज्या सहा आमदारांनी पक्षाविरोधात बंडखोरी करुन भारतीय जनता पक्षाला मतदान केले होते, त्यांना अपात्र घोषित करण्यात आले आहे. मात्र, तरीही पक्षांतर्गत खदखद कायम आहे. राजीनामा दिलेले मंत्री विक्रमादित्यसिंग यांनी राजीनामा मागे न घेण्याचे संकेत दिले आहेत. तर मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुक्खू […]