रुग्णसेवेची पुण्याई अन् 87 ख्रिसमस पाहिलेली ‘सिस्टर निर्मला’!

  सीपीआरमध्ये तीन दशके रूग्णसेवा : बिजापूरकरांचा प्रवास : जुन्या आठवणींना उजाळा कोल्हापूर/ संजीव खाडे ख्रिसमस अर्थात नाताळचा सण सोमवारी 25 डिसेंबरला उत्साह, आनंद आणि जल्लोषात साजरा झाला. शहरातील ऐतिहासिक अशा वायल्डर मेमोरिअल चर्चमध्ये निर्मला आनंद बिजापूरकर प्रार्थनेसाठी आल्या होत्या. प्रभू येशूची प्रार्थना करून त्यांनी स्वत:च्या परिवारासाठी आशीर्वादही घेतला. 87 वर्षांच्या निर्मला बिजापूरकर यांनी तब्बल […]

रुग्णसेवेची पुण्याई अन् 87 ख्रिसमस पाहिलेली ‘सिस्टर निर्मला’!

 
सीपीआरमध्ये तीन दशके रूग्णसेवा : बिजापूरकरांचा प्रवास : जुन्या आठवणींना उजाळा
कोल्हापूर/ संजीव खाडे
ख्रिसमस अर्थात नाताळचा सण सोमवारी 25 डिसेंबरला उत्साह, आनंद आणि जल्लोषात साजरा झाला. शहरातील ऐतिहासिक अशा वायल्डर मेमोरिअल चर्चमध्ये निर्मला आनंद बिजापूरकर प्रार्थनेसाठी आल्या होत्या. प्रभू येशूची प्रार्थना करून त्यांनी स्वत:च्या परिवारासाठी आशीर्वादही घेतला. 87 वर्षांच्या निर्मला बिजापूरकर यांनी तब्बल 87 ख्रिसमस केवळ पाहिले नाहीत, त्यांचा आनंदही लुटला. सीपीआरमध्ये सिस्टर म्हणून रूग्णसेवा करत असताना त्या अधीक्षकपदापर्यंत पोहचल्या. पती आनंद हे देखील सीपीआरच्या नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य. बिजापूरकर दाम्पत्याने रुग्णसेवा केली. आज आयुष्याच्या उत्तरार्धात सिस्टर निर्मला आजी नव्हे तर पणजी बनून आनंदी जीवन जगत आहेत. ख्रिसमसच्या निमित्ताने त्यांच्या जीवन प्रवासाने जुन्या काळातील आठवणी जाग्या झाल्या.
एस्तर पॅटर्न शाळेच्या आवारातील रूकडीकर घरणे हे निर्मला यांचे माहेर. त्यांचे वडील भाऊराव रूकडीकर हे रेव्हरंड होते. आई तानुबाई घरकाम करायच्या. 9 ऑक्टोबर 1937 रोजी जन्मलेल्या निर्मला यांना भाऊ, बहिणी. मोठा परिवार. जुनी मॅट्रीक झाल्यावर निर्मला यांनी रूग्णसेवेसाठी नर्सिंगचा कोर्स करण्याचे ठरविले. आई, वडिलांनी त्यांना पाठबळ दिले. मिरजेतील मिरज मिशनमध्ये त्यांनी नर्सिंगचा कोर्स पूर्ण केला. याचवेळी कर्नाटकातील विजापूरचे आनंद संगाप्पा बिजापूरकरही तेथे शिक्षण घेत होते. निर्मला आणि आनंद यांची ओळख झाली. प्रेमाचे धागे जुळले. दोघांनी घरांच्याच्या संमतीने 1962 साली विवाह केला. निर्मला रूकडीकरच्या निर्मला बिजापूरकर बनल्या. त्याआधी निर्मला यांनी सिस्टर म्हणून सीपीआरमध्ये रूग्णसेवा सुरू केली होती. वैद्यकीय पेशातील पती आनंद यांच्याबरोबर निर्मला यांनी संसार आणि रूग्णसेवेला प्रारंभ केला. सीपीआरमधील प्रसुती विभागाची जबाबदारी निर्मला यांच्यावर आली. त्यांनी प्रामाणिकपणे पार पडली. रात्री अपरात्री, अडचणीच्या वेळी येणाऱ्या रूग्णांची केवळ सेवा न करत त्यांना दिलासा देण्याचे कामही निर्मला यांनी केले. प्रसुतीसाठी आलेल्या अडलेल्या गर्भवती महिलांची प्रसुती करून त्यांच्यासह बाळांची काळजी घेणाऱ्या सिस्टर म्हणून निर्मला यांची ओळख बनली. सीपीआरसह त्यांनी सोळांकूर, हेर्ले येथे सेवा बजावली. सोळांकूर येथे सेवेत असताना त्यांनी नदीला पूर आला असताना पुराच्या पाण्यातून सोळांकूरला जाऊन तेथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा दिली. पती आनंद हे सीपीआरमधील नर्सिंग विभागाचे प्राचार्य होते. दोघा पती-पत्नीने मिळून रूग्णसेवा आणि विद्यार्थ्याना मार्गदर्शनही केले. 1994-95 मध्ये निर्मला निवृत्त झाल्या. त्यांना दोन मुलगे उदय आणि अजय आणि एक मुलगी सुनीता. अजयचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले. उदय उद्योजक आहेत. मुलगी सुनीता ऑस्टेलियात स्थायिक झाली आहे. उदय यांच्या पत्नी वर्षा आयर्विन ख्रिश्चन हायस्कूच्या प्राचार्या आहेत. त्यांचा मुलगा अमन उद्योजक आहे, तर मुलगी विभा ही आयर्लंडला असते. (कै.) अजय यांच्या पत्नी मनिषा डॉ. डी. वाय. पाटील नर्सिंग कॉलेजला उपप्राचार्या आहेत. त्यांना रचना आणि शिरीन या दोन मुली आहेत. सिस्टर निर्माला यांच्या मुलीच्या मुलाचेही लग्न झाले असून नातसून आणि परतवंड पाहण्याचे भाग्य त्यांना लाभले आहे. मुले, सुना, नातवंडे, नातसून आणि परतवंडे असा तब्बल 17 जणांच्या परिवारासह निर्मला आनंदी जीवन जगत आहे. पती आनंद यांचे काही वर्षांपूर्वी वृद्धापकाळाने झालेले निधन आणि मुलगा अजयचा अपघाती मृत्यु यातून स्वत: सावरताना आपल्या परिवाराला जपणाऱ्या, मुलांसह नातवंडांनीही उच्च शिक्षण घेतले पाहिजे, याचा आग्रह धरणाऱ्या सिस्टर निर्मला आज केवळ आजी नाहीत तर पणजीही आहेत. सोमवारी ख्रिसमसच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि प्रभू येशू विषयी असणारी श्रद्धा त्यांच्या समर्पित जगण्याचे सार सांगून गेली.

एस्तर पॅटर्न ते बेकर गल्ली
पूर्वीच्या काळी ख्रिसमस सणाच्या काळात नाटक बसवायचो, घराची सजावट करणे, नवनवीन कपडे घालून चर्चेमध्ये प्रार्थनेसाठी कसे जात होतो. आई, वडील कसे जपायचे या आणि इतर आठवणी सांगत निर्मला बिजापूरकर यांनी एस्तर पॅटर्न ते सध्या राहत असलेल्या न्यू शाहूपुरीतील बेकर गल्लीतील घरापर्यंतचा प्रवास सांगितला.