सिकंदर शेखकडून गुरुजित सिंग चारीमुंड्या चित

सिकंदर बेळगाव केसरी, माऊली कोकाटे बेळगाव मल्ल सम्राट, हादी इराणी दर्शन केसरीचे मानकरी बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय निकाली जंगी कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने पंजाबच्या गुरुजित सिंग मगरोडचा अवघ्या दीड मिनिटात एकलांगी एकेरी कस चढवून आस्मान दाखवित उपस्थित 40 हजारहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. माऊली कोकाटेने घुटण्यावरती महदी इराणचा […]

सिकंदर शेखकडून गुरुजित सिंग चारीमुंड्या चित

सिकंदर बेळगाव केसरी, माऊली कोकाटे बेळगाव मल्ल सम्राट, हादी इराणी दर्शन केसरीचे मानकरी
बेळगाव : बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटना आयोजित आंतरराष्ट्रीय निकाली जंगी कुस्ती मैदानात महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखने पंजाबच्या गुरुजित सिंग मगरोडचा अवघ्या दीड मिनिटात एकलांगी एकेरी कस चढवून आस्मान दाखवित उपस्थित 40 हजारहून अधिक कुस्ती शौकिनांची मने जिंकली. माऊली कोकाटेने घुटण्यावरती महदी इराणचा पराभव करून बेळगाव मल्ल सम्राट हा किताब पटकाविला. तर हादी इराणने प्रकाश बनकरचा बॅक थ्रो (खालून पुट्टी) वर विजय संपादन करीत दर्शन केसरी किताबाचा मानकरी ठरला. बेळगाव केसरीसाठी झालेल्या लढत महाराष्ट्राचा अस्सल मल्ल महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख व भारत केसरी गुरुजित सिंग मगरोड पंजाब ही कुस्ती दर्शनचे संचालक श्रीकांत देसाई, डॉ. गिरीश सोनवलकर, रमाकांत कोंडुस्कर, आर. एम. चौगुले, बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष सुधीर बिर्जे, सचिव जोतिबा हुंदरे, ए. जी. मंतुरगी, कुस्ती ठेकेदार बाळाराम पाटील, चेतन बुद्दण्णावर आदी मान्यवरांच्या हस्ते ही कुस्ती लावण्यात आली. या कुस्तीत पहिल्याच मिनिटाला सिकंदरने दुहेरी पटात शिरून गुरुजित सिंगला खाली घेत ताबा मिळविला. ताकदीचा उपयोग करून गुरुजितला घिश्शावर फिरविण्याचा प्रयत्न केला. खालून डंकी मारून गुरुजित वर येण्याचा प्रयत्न करीत असताना सिकंदरने उलटी मारून पायाला एकलांगी भरून एकेरी कस चढवत गुरुजितला चारीमुंड्या चित करीत उपस्थित शौकिनांची मने जिंकली. त्याला मान्यवरांच्या हस्ते बेळगाव केसरीचा किताब देऊन त्याला गौरविण्यात आले.
मल्ल सम्राट किताबासाठी कुस्ती उद्योजक श्रीकांत देसाई, गिरीश सोनवलकर, जय भारत फौंडेशनचे नंदकुमार तलरेजा, बसवणगौडा पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते उपमहाराष्ट्र केसरी महाराष्ट्राचा उगवता तारा माऊली कोकाटे पुणे व आंतरराष्ट्रीय पदकविजेता महदी इराण ही कुस्ती लावण्यात आली. पहिली काही मिनिटे दोघांनी एकमेकांची ताकद आजमावली. तिसऱ्या मिनिटाला माऊली कोकाटेने एकेरी पट काढून महदीला खाली घेत ताबा मिळविला पण महदीने खालून डंकी मारून वरती येण्याचा प्रयत्न केला पण माऊलीने त्याला तिथे दाबून ठेवले व मानेवरचा कस काढून घुटण्यावर फिरविण्याचा प्रयत्न केला पण त्यातून दोनवेळा महदीने सुटका करून घेतली. आठव्या मिनिटाला माऊलीने पुन्हा महदीला खाली घेत मानेवर घुटणा ठेवून घुटण्यावरती फिरवित चित करीत उपस्थितांची वाहव्वा मिळविली. त्याला मान्यवरांच्या हस्ते बेळगाव मल्ल सम्राट हा किताब देण्यात आला. दर्शन केसरी किताबासाठी कुस्ती दर्शनचे संचालक श्रीकांत देसाई व बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्यावतीने उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर व हादी इराणी ही लावण्यात आली. या कुस्तीत प्रकाश बनकरने एकेरी पट काढून हादीला खाली घेत कब्जा मिळविला. पण हादीने खालून डंकी मारून वरती आला. पण त्यातून प्रकाश बनकरने सुटका करून घेतली. आठव्या मिनिटाला प्रकाश बनकरने एकेरी पट काढून हादीला खाली घेतले व मानेवर घुटणा ठेवून फिरविण्याचा प्रयत्न करीत असताना हादीने बॅक थ्रो मारून प्रकाश बनकरवर नेत्रदीपक विजय मिळविला. त्याला श्रीकांत देसाई यांच्या हस्ते दर्शन केसरी हा किताब देऊन गौरविण्यात आले. चौथ्या क्रमांकाची कुस्ती डबल कर्नाटक केसरी कार्तिक काटे दावणगेरी व मनीष हरियाणा यांच्यात झाली. या कुस्तीत दुसऱ्या मिनिटाला मनीष हरियाणाने एकेरी पट काढून कार्तिकला खाली घेत झोळी मारण्याचा प्रयत्न केला. पण खालून डंकी मारत कार्तिकने गदेलोट करून मनीषला चारीमुंड्या चित करीत आपली विजयी घोडदौड कायम राखली.
पाचव्या क्रमांकाच्या कुस्तीत नागराज बशीडोणीने सुदेश ठाकुरवर हप्ते डावावरती विजय मिळविला. सातव्या क्रमांकाच्या कुस्तीत प्रकाश इंगळगीने किर्तीकुमार बेनकेचा एकचाक डावावरती पराभव केला. आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत पवन चिकदीनकोपने कमल शेरावतवर एकचाक डावावरती विजय मिळविला. नवव्या क्रमांकाच्या कुस्ती किरण जाधव कोल्हापूरने संजू इंगळगीला एकेरी पट काढून एकचाक डावावर चित केले. दहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत तात्या धुळे कोल्हापूर याने आंतरराष्ट्रीय पदक विजेता महेश लंगोटीचा छडीटांग डावावर नेत्रदीपक विजय मिळविला. त्याचप्रमाणे रोहित पाटीलने विशाल हरियाणाचा एकचाकवर, विकास पवार कोल्हापूरने दयानंद घटप्रभाचा एकचाकवर, कार्तिक इंगळेने हनुमंत घटप्रभाचा हप्ते डावावर, प्रथमेश कंग्राळीने गजानन निर्वानट्टीचा झोळीवर पराभव केला. तर हनुमंत गंदीगवाड, महेश तीर्थकुंडये, बाळू शिंदीकुरबेट, परसू हरिहर, निखील कंग्राळी, विनायक पाटील येळ्ळूर, गौस कुंदरगे, यश कोरे गल्ली, मंथन सांबरा, सिद्धार्थ तीर्थकुंडये, मल्लेश अथणी यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर मात करून विजय मिळविले.
आकर्षक पहिल्या क्रमांकाच्या कुस्तीत बेळगावचा उगवता तारा पार्थ पाटील कंग्राळी व सोहेल शेख उपमहाराष्ट्र केसरी ही कुस्ती पहिल्या मिनिटापासून सर्वांचे लक्ष वेधून होती. पहिल्याच मिनिटाला पार्थ पाटीलने एकेरी पट काढून साहेलला खाली घेत एकलांगी भरून फिरविण्याचा प्रयत्न केला. पण सोहेलने त्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. खालून डंकी मारून सोहेलने पार्थवर कब्जा मिळविला. पण पार्थने कडी तोडून पुन्हा सोहेलवर ताबा मिळविला. एकेरी पट काढून सोहेलला एकलांगी भरून चित करण्या प्रयत्न करत असताना सोहेलला गंभीर दुखापत झाल्याने पार्थ पाटीलला विजयी घोषित करण्यात आले. दुसऱ्या आकर्षक कुस्तीत सुरज पाटीलने दयानंद शिरगुप्पीचा एकचाक डावावरती पराभव केला. तिसऱ्या क्रमांकाच्या कुस्तीत रुपेश कर्लेने अजित चौगुलेचा एकलांगी डावावरती पराभव केला. आखाड्याचे पंच म्हणून सुधीर बिर्जे, सुधीर पाटील, जोतिबा हुंदरे, ए. जी. मंतुरगे, बाळाराम पाटील, चेतन बुद्दण्णावर, बाहुबली पाटील, बसवराज गोडगेरी, प्रशांत पाटील, गणपत बन्नोसी, गणपत हट्टीकर आदींनी काम पाहिले. हे कुस्ती मैदान यशस्वी करण्यासाठी बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
मनोरंजन कुस्तीत देवा थापा निकालावर विजय
बेळगाव जिल्हा कुस्तीगीर संघटनेने युट्युबचा जादुगर देवा थापाला खास आमंत्रित केले होते. कुस्ती शौकीन सुद्धा देवा थापाच्या या कुस्तीसाठी मोठ्या संख्येने हजर झाले होते. देवा थापा मैदानात येताच सर्वांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याची कुस्ती समशेर सिंग पंजाब याच्याबरोबर लावण्यात आली. या कुस्तीत त्याने ज्युडोच्या प्रकारे प्रतिस्पर्ध्याला गोल फिरवित मनोरंजन केले. शेवटी देवा थापाने समशेर सिंगला एकेरी हाताचा कस चढवित निकाल डावावरती चित केले. त्यानंतर उपस्थित कुस्ती शौकिनांनी त्याला उचलून धरले.
क्षणचित्रे

आखाड्यात स्क्रीन टीव्ही लावल्यामुळे कुस्ती शौकिनांना कुस्तीचा आनंद लुटता आला.
बऱ्याच वर्षानंतर आनंदवाडीचा आखाडा कुस्ती शौकिनांनी तुडुंब भरला होता. कुस्ती शौकिनांना कोणताही व्यत्यय येऊ नये म्हणून कडक रोषणाईची व्यवस्था चारी बाजूंनी केली होती. त्यामुळे कुस्ती शौकिनांना कुस्ती स्पष्ट दिसत होती.
कुरुंदवाडच्या रणवीर आवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी रणालगीच्या तालावर सर्व कुस्ती शौकिनांना व उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले.
कुस्ती समीक्षक कृष्णा चौगुले यांनी कुस्तीच्या ठेक्यात कुस्तीचे वर्णन करून कुस्ती शौकिनांना कुस्तीबद्दलची माहिती पुरविली.
कुस्ती मैदानात चोख बंदोबस्त करण्यात आला होता.
कुस्ती मैदानासभोवती बॅरिकेड्स घालून शौकिनांना व्यवस्था करून घालून देण्यात आली होती.