श्रेयस अय्यर सराव शिबिरात दाखल

वृत्तसंस्था/ कोलकाता कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आपल्या संघाच्या आगामी आयपीएल स्पर्धेपूर्वीच्या सराव शिबिरात दाखल झाला. अलीकडे श्रेयस अय्यरला पाठ दुखापतीची समस्या सातत्याने जाणवत असल्याने तो आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यात उपलब्ध राहणार किंवा नाही याबद्दल साशंका निर्माण झाली होती. शनिवारी अय्यरचे कोलकातामध्ये आगमन झाल्यानंतर केकेआर संघाने त्याच्या स्वागतार्थ शहरामध्ये स्वागताचे मोठे फलक लावले. […]

श्रेयस अय्यर सराव शिबिरात दाखल

वृत्तसंस्था/ कोलकाता
कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर आपल्या संघाच्या आगामी आयपीएल स्पर्धेपूर्वीच्या सराव शिबिरात दाखल झाला. अलीकडे श्रेयस अय्यरला पाठ दुखापतीची समस्या सातत्याने जाणवत असल्याने तो आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यात उपलब्ध राहणार किंवा नाही याबद्दल साशंका निर्माण झाली होती. शनिवारी अय्यरचे कोलकातामध्ये आगमन झाल्यानंतर केकेआर संघाने त्याच्या स्वागतार्थ शहरामध्ये स्वागताचे मोठे फलक लावले.
29 वर्षीय श्रेयस अय्यरला गेल्या वर्षी आयपीएल स्पर्धा हुकली होती. गेल्या एप्रिल महिन्यात श्रेयस अय्यरच्या पाठीवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. तब्बल 4 महिन्यांच्या विश्रांतीनंतर त्याने सप्टेंबर महिन्यात क्रिकेट क्षेत्रात पुनरागमन केले. दरम्यान इंग्लंड विरुद्धच्या पहिल्या 2 कसोटी सामन्यात त्याला खेळताना या दुखापतीच्या थोड्या वेदना जाणवत होत्या. त्यामुळे त्याला या मालिकेतील शेवटच्या 3 सामन्यांसाठी संघातून वगळण्यात आले होते. रणजी क्रिकेट स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अय्यर खेळू शकला नाही. पण त्यानंतर त्याने उपांत्य आणि अंतिम फेरीत संघात आपला सहभाग दर्शविला. मुंबईने रणजी करंडकावर आपले नाव पुन्हा एकदा कोरताना विदर्भचा पराभव केला. या अंतिम सामन्यातील शेवटच्या दोन दिवसांमध्ये अय्यरला पुन्हा या दुखापतीच्या वेदना होऊ लागल्याने तो अस्वस्थ झाला होता. 2024 च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत केकेआर संघाचा सलामीचा सामना 23 मार्च रोजी सनरायझर्स हैद्राबाद संघाविरुद्ध इडन गार्डन्स मैदानावर होणार आहे.