धक्कादायक! निगडीतील शाळेत क्रीडा शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा दोन वर्षांपासून लैंगिक छळ, आरोपीला अटक
बदलापूर प्रकरण अद्याप तापले आहे त्यात निगडित एका शाळेतील क्रीडा शिक्षकाने एका अल्पवयीन विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्य म्हणजे हा क्रीडा शिक्षक गेल्या 2 वर्षांपासून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करत होता. या प्रकरणी निगडीच्या पोलीस ठाण्यात क्रीडा शिक्षकासह मुख्याध्यापक, संस्था चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या क्रीडाशिक्षकावर 2018 मध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल असून देखील शाळेने त्याला कामावर ठेवले.
या प्रकरणी पीडित मुलीच्या पालकांनी फिर्याद दिली असून क्रीडा शिक्षक, मुख्याध्यापक तसेच संस्थाचालक यांच्यासह आठ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये एका महिलेचा देखील समावेश आहे.
सध्या राज्यात बदलापूर प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पिंपरी चिंचवडच्या हद्दीतील सर्व शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला घेऊन सूचना शाळेच्या मुख्याध्यापक आणि शिक्षकांना देण्यात आल्या. तसेच कंत्राट पद्धतीने काम करणाऱ्या कामगारांची चारित्र्य पडताळणी तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
निगडी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना गुड आणि बॅड टच बाबतीत माहिती दिली.
शाळेतील 12 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीने पालकांकडे घडलेले सर्व सांगितले.तसेच कोणालाही या बाबतीत सांगितल्यावर तुला ठार मारेन अशी धमकी क्रीडा शिक्षकाने मुलीला दिली. पालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणी क्रीडा शिक्षकाला पोलसांनी अटक केली आहे. या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.
Edited By – Priya Dixit