शनि साडेसाती चिंतन कथा
साडेसाती
चिंतन
एका मैत्रीणीने संदेश पाठवला, “कोणताही बाष्कळपणा न करता, जरा गंभीरपणाने साडेसातीवर लेख लिहीशील का?”
मी, “तुला साडेसाती सुरू झालीय का?” असे विचारले.
त्यावर ती म्हणाली, “नवऱ्याला साडेसाती सुरू झाली आहे.”
मी म्हंटले,” मग तू कशाला काळजी करतेस? त्याला आतापर्यंत सवय झाली असेल.”
त्यावर ती खळखळून हसली, म्हणाली, “झाला तुझा वाह्यातपणा सुरू?”
विनोदाचा भाग सोडला तर गेल्या महिन्याच्या अखेरीस शनीने घर बदलले आणि सगळीकडे चर्चा सुरू झाली,
कोणाची संपली?
कोणाची सुरू झाली?
काय म्हणून काय विचारता महाराजा, “साडेसाती”!
मकर, कुंभ आणि मीन या तीन राशींना सध्या साडेसाती सुरू आहे.
शनी ज्या राशीत असेल त्या राशीला साडेसात वर्ष काही अप्रिय घटना आणि मानसिक त्रास सहन करावा लागतो असे समजले जाते,
म्हणून त्या कालावधीला साडेसाती असे नाव पडले.
ती येऊ नये असे प्रत्येकाला वाटत असेल तरी ती कोणालाही टाळता येत नाही.
ज्योतिष मानत नाही, असे कितीही म्हंटले तरी प्रत्येक माणूस मनातून साडेसातीला थोडातरी घाबरतो.
एक गोष्ट आहे.
शनी आणि लक्ष्मी दोघांनी विष्णूला विचारले की “आमच्यातले कोण छान दिसते?”
प्रसंगावधानी, हजरजबाबी विष्णू भगवान म्हणाले,
“लक्ष्मी येताना छान दिसते
आणि
शनी महाराज जातांना चांगले दिसतात.”
शनी परीक्षक आहे. शाळेत अभ्यास किंवा ऑफिसमध्ये ऑडिट असते, तशी साडेसाती असते. चोख वागेल त्याने घाबरायचे काहीच कारण नाही.
दर तीस वर्षांनी भेट देऊन साडेसात वर्ष मुक्काम करत असल्याने प्रत्येकाला आयुष्यात दोन ते तीन वेळा साडेसातीला सामोरे जावे लागते.
देशपांडे नावाचे माझे सहकारी साहेबांनी बोलावले की…
“मी सरांशी गप्पा मारून आलोच”
असे सांगून जायचे. आल्यावर त्यांच्या चेहऱ्यावरून साहेब काय बोलले असावे याचा अंदाज येत नसे.
एकदा त्यांना विचारले,
“तुम्हाला सर ओरडत नाहीत का?
चुका काढत नाहीत का?”
देशपांडे म्हणाला,
“ओरडतात.”
मी: ” तुम्हाला वाईट वाटत नाही का?”
देशपांडे: “वाटतं…, मीही माणूस आहे. मी मन लावून काम करतो त्यामुळे कौतुक व्हावं, अशी मला अपेक्षा असते.
पण एका साहेबांनी मला सांगितले, ते मी लक्षात ठेवलं आहे.”
मी: “काय?”
देशपांडे:
“एकदा साहेब मला ओरडले म्हणून मी खूप नाराज झालो. ऑफिसची वेळ संपली तरी रागाने काम करत बसलो.
साहेब घरी निघतांना त्यांना मी दिसलो.
ते मला म्हणाले,
“देशपांडे चला, चहा पिऊ.”
चहा पितांना ते म्हणाले,
“देशपांडे, तू लहान आहेस म्हणून सांगतो.
जो माणूस कौतुक करतो तो आवडतो, जो चुका दाखवतो त्याचा राग येतो. हा मनुष्य स्वभाव आहे.
घरी वडील आणि ऑफिसमध्ये साहेब काहीही बोलले तरी राग धरायचा नाही. त्यात आपले भले असते.
आपण मानत नसलो तरी त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळतं. त्यांना जे माहित आहे ते त्यांनी सांगितले नाही तर आपल्याला कळणार कसे?
गोड बोलून जी कामे होत नाहीत ती कडक वागण्याने लवकर होतात.
वडिलांना मुलांचे भले व्हावे असे वाटत असते,
साहेबांनाही सहकाऱ्यांचे चांगले व्हावे, काम उत्तम व्हावे असेच वाटते.
त्यांची खुर्ची त्यांना लोकांमधे फार मिसळू देत नाही, आणि त्यांना फार गोड बोलता पण येत नाही.”
शनी महाराज असेच असतात.
पितृतुल्य मायेने धाकात ठेवतात. ते शत्रू नाहीत, ते करतील त्यात माणसाचे शंभर टक्के हित असते. ते मनाविरुद्ध असल्याने माणूस नाराज होतो,
त्यात शनीचा दोष नाही.
शनीसारखी निष्ठा असावी, वाईटपणा येऊनही तो त्याचे काम चोख करतो.
साडेसातीत माणूस कमी कालावधीत खूप शिकतो, दृष्टिकोन बदलतो, माणसे ओळखायला लागतो, स्वतःच्या क्षमता जाणतो, शिस्त अंगी बाणते.
माणूस घाबरला, विरोधात गेला तर त्रास होतो कारण व्हायचे ते होतेच.
कष्टाची, बदलाची, लीनतेची तयारी ठेवली तर माणूस यातून सहजपणे पार होतो.
कोणत्याही कल्पना, तक्रारी केल्या नाहीत तर हा काळ खूप प्रगतीचा ठरतो, जातांना खूप संधी, अनुभव, शहाणपण देऊन जातो.
या काळाकडे कसे बघतो, कसे सामोरे जातो त्यावर होणारा त्रास अवलंबून असतो.
टिळक, सावरकर यांनी तुरुंगवासातही उत्तम साहित्य निर्माण केले. संधीचा फायदाच नाही तर त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही मार्ग शोधला.
अशी जिगर हवी. ओझे घेऊनच चढावे लागणार असेल तर खाऊ आणि पाणी घेऊन चढण्याचे प्रसंगावधान हवे.
कधी कधी अचानक पाऊस येतो, जवळ छत्री, रेनकोट काहीच नसते. पाऊस पडणे कोणाच्याच हातात नसते, त्यामुळे न चिडता थांबायचे किंवा भिजायचे, हे दोनच पर्याय असतात.
वेळ नसेल तर भिजत जायचे,
वेळ असेल तर थांबायचे,
ही निर्णयक्षमता साडेसातीत येते.
चिडचिड करून त्रास करून घ्यायचा नाही, हे शहाणपण येते.
भिजत जातांना किंवा वाट बघतांना चहा, भजी, कणीस असे काही खायचे, हे कळते.
चांगल्या वाईट घटना आयुष्यभर घडत असतात. कधी इतरांची साथ मिळते, कधी नाही.
आपला आनंद आपण मिळवायचा, आपली वाट आपण आत्मविश्वासावर चालायची, कुबड्या घेऊन चालायचे नाही हे माणूस शिकतो.
मला वाटले, माझ्या लक्षात आले नाही, इतकं चालतं, अशी वाक्ये मनात आणायची नाहीत. नाही तर महाराज पिच्छा पुरवतात.
शरण जाणे, हा सोपा मार्ग आहे, पण अहंकार आड येतो. अहंकार मनात धरून मारुती, पिंपळ, कोणालाही फेऱ्या मारून उपयोग होत नाही. अंगी नम्रता असेल तरच शांत राहता येते. गुरूला शरण जाणे, हा सर्वात उत्तम मार्ग आहे.
गुरूकडे गेलं की बरीचशी तयारी गुरू करून घेतात.
शाळेत असताना शिकवणी लावून अभ्यास करा किंवा आपापला करा, अभ्यास करावा लागतो, परीक्षा नको, अभ्यास नको असे म्हणून चालत नाही.
हॉटेलमध्ये खाल्लं की बिल द्यावे लागते, नाहीतर भांडी घासावी लागतात.
डोकं शांत, मन प्रसन्न, काम चोख असेल तर काय चुकतंय, काय करायला हवं हे लक्षात येतं.
स्वतः च्या चुका ऐकूनही घेत नाही म्हणून माणसात सुधारणा होत नाही. कोणी सांगितले तरी माणूस चुका स्वीकारत नाही आणि सुधारतही नाही. चूक मान्य केली तर सुधारायची थोडी तरी शक्यता असते.
घाबरावे असे शनी काही करत नाही.
आरोग्य आणि अध्यात्म या दोन गोष्टीचे माणसाला महत्त्व पटवण्याचे आणि पैसा, संपत्ती, मीपणा यावरचे लक्ष कमी करण्याचे काम शनी महाराजांकडे सोपवले आहे.
त्यांचा अनुभवावर, कृतीवर, शिस्तीवर भर आहे, समजवण्यावर नाही, ते उपदेश करत नाहीत, थेट अनुभव देतात.
माणसाला असणारी धुंदी / गुर्मी उतरवण्याचे काम शनी महाराजांना दिले आहे.
गीतेत कर्मण्येवाधिकारस्ते असे सांगितले आहे, त्याचा वस्तुपाठ शनी करून घेतात.
गीता, एकंदरीत संतसाहित्यात असलेला उपदेश शनी प्रत्यक्ष कृतीत आणायला लावतो.
ज्या माणसांना कष्ट, शिस्त, नम्रपणा आवडत नाही त्यांना साडेसातीत त्रास होतो.
खरं तर राग आणि अहंकाराने माणसाचे पूर्ण आयुष्यच खडतर जाते, त्रास होतो.
अतीचिकित्सा न करता काही गोष्टी सोडून देतात ती माणसे समाधानी, आनंदी असतात.
आयुष्य पूर्ण चांगले किंवा पूर्ण वाईट कधीच नसते.
साडेसातीत नाही तर एकूण आयुष्यातच…
मी म्हणीन ते,
मी म्हणीन तसे,
मी म्हणीन तेव्हा..
असे वागणाऱ्या माणसांना मानसिक त्रास जास्त होतो.
माणूस जे ठरवतो ते होतेच असे नाही,
होईल ते त्याच्या मनाप्रमाणे असते असे नाही,
तो करेल त्याचे श्रेय त्याला मिळते असेही नाही,
तो ज्यांना आपले समजतो ते त्याच्याशी आपलेपणाने वागतील असे तर मुळीच नाही.
एका मुलाला त्याची आई स्वतःची कामे कर असे सांगत असते.
आई एकदा त्याला कपडे धुवायला सांगते. तो कसेतरी धुतो. आई कपडे मातीत टाकून परत धुवायला लावते.
तू नीट कपडे धुतलेस तरच जेवायला मिळेल, असे सांगते.
मुलगा कपडे नीट धुतो, पण वाळत कसेतरी घातले म्हणून आई ते कपडे परत धुवायला लावले.
त्या मुलाने नंतर आयुष्यभर कपडे स्वच्छ धुतले आणि नीट वाळत घातले.
ही सत्यघटना आहे. याला शिस्त म्हणणार की छळ?
हे वळण / शिस्त वाटत असेल तर शनी वाईट वागवतो असे वाटणार नाही. चूक न सुधारता नुसती सांगून उपयोग नाही.
साडेसाती ही माणसाला सुधारण्यासाठी दिलेली संधी असते,
त्या संधीचे सोने करावे.
ज्ञानी, कर्तव्यकठोर, शिस्तप्रिय, धीरगंभीर शनी महाराज माणसाला खंबीर बनवतात. काहीही आयते देत नाहीत. काही मिळवायचे असेल तर कष्ट करायाला लावतात,
माहिती हवी असेल तर अभ्यास करावा लागतो, आराम करून चालत नाही.
साडेसाती म्हणजे नुसता त्रास नसतो, त्याची रसाळ फळे नंतर नक्की मिळतात.
साडेसातीसाठी आध्यात्मिक उपाय या लेखात नाहीत, तो उद्देशही नाही. साडेसातीमागची मनोभूमिका मांडली आहे. आहे त्या परिस्थितीला सामोरे जाणे उत्तम.
सांगा बरं, साडेसाती चांगली की वाईट????
शुभं भवतु !
– सोशल मीडिया