शक्तिमार्ग निढोरीकरांसाठी खडतरच! ३२८ शेतकरी होणार भूमीहिन

रवींद्र शिंदे / मुरगुड २५५ हेक्टर जित्राप लाभलेल्या निढोरी ता. कागल येथील शेतकऱ्यांना बहुचर्चित नियोजीत शक्तिमार्ग उभारणीची यंत्रणा वेगवान झाल्यामुळे तब्बल ३२८ शेतकरी भूमीहिन होणार असून संबंधित शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गावकऱ्यांचे तब्बल १०० एकरहून अधिक क्षेत्र या महामार्गामध्ये लुप्त होणार आहे. त्यामुळे संबंधीत शेतकऱ्याना भक्तिमार्गाचा प्रवास खडतरच ठरणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या २८ फेब्रुवारी […]

शक्तिमार्ग निढोरीकरांसाठी खडतरच! ३२८ शेतकरी होणार भूमीहिन

रवींद्र शिंदे / मुरगुड
२५५ हेक्टर जित्राप लाभलेल्या निढोरी ता. कागल येथील शेतकऱ्यांना बहुचर्चित नियोजीत शक्तिमार्ग उभारणीची यंत्रणा वेगवान झाल्यामुळे तब्बल ३२८ शेतकरी भूमीहिन होणार असून संबंधित शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गावकऱ्यांचे तब्बल १०० एकरहून अधिक क्षेत्र या महामार्गामध्ये लुप्त होणार आहे. त्यामुळे संबंधीत शेतकऱ्याना भक्तिमार्गाचा प्रवास खडतरच ठरणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या २८ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध झालेल्या राजपत्रात सार्वजनिक बांधकाम विभागाची अधिसूचना प्रसिध्द झाली. महाराष्ट्र महामार्ग अधिनियम १९५५च्या कलम ३ नुसार प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून महाराष्ट्र शासनाद्वारे पवनार ते पत्रादेवी हा नागपूर ते गोवा राज्यमार्ग ‘महाराष्ट्र शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग’ म्हणून संबोधण्यात येणार आहे. त्याला राज्य महामार्ग विशेष क्र.१० म्हणून घोषित करण्यात आले आहे. ११ जिल्ह्याना श्रीक्षेत्र संत बाळूमामा यांच्या आदमापुरातील समाधी स्थळाकडे जाणारा हा बहुचर्चित महामार्ग सावर्डेहून येऊन निढोरीत प्रवेश करून तो वाघापूर पाटीच्या दिशेने जाणार आहे. कागल तालुक्यात निढोरी या गावाला या महामार्गाने सर्वात मोठा फटका बसणार असून १०० एकराहून अधिक क्षेत्र या रस्त्यात जाणार असल्यामुळे अत्यल्प भूधारक शेतकरी यात भरडले जाणार आहेत. सरकारच्या रेडिरेकनर दर व मिळणारा अल्प मोबदला याचा विचार करता या शेतकऱ्यांना पुढील आयुष्यभर जगण्यासाठी कष्टपूर्वक धडपडावे लागणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची नाराजी ओढवून घेण्याचे धाडस सरकार करणार नाही, त्याऐवजी शेतकऱ्यांच्या पदरात पुरेपूर मोबदला सरकार देईल अशीही शक्यता वाटते. पण शक्य- अशक्यतेच्या या चर्चेमध्ये शेतकरी मात्र कमालीचा चिंतातूर झाला आहे.आपली शेतजमिनी जाणार या भितीने शेतकऱ्यांना ग्रासले आहे. कामाच्या पूर्ततेस ५ ते ६ वर्षांचा कालावधी लागणार आहे. या महामार्गामध्ये येणाऱ्या शेतजमिनी व घरांना मोबदला कसा व किती मिळणार ? याकडे आता निढोरीकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
रस्त्यासह सर्वच एकदम फास्ट!
११ जिल्ह्याना जोडणाऱ्या या रस्त्याने ७६० कि.मी. अंतराच्या महामार्गाचा प्रवास११ तासात होणार आहे. ८३,६०० कोटी रु. खर्चाच्या या रस्त्याने सर्व शक्तीपीठे जोडली जाणार आहेत. कणेरी मठापासून कागल तालुक्यातील सावर्डे खुर्द, सोनाळी, कुरणी, निढोरी या गाव भाग शेतजमिनीतून सहा पदरी मार्गाचे सर्व्हेक्षण झाले आहे. या फास्ट रस्त्याचे सर्वच काम सध्या फास्ट चालू आहे.