घटनात्मक मुल्यांच्या रक्षणासाठी शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात

नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात : हॉटेल सयाजी येथे उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांचा मेळावा कोल्हापूर प्रतिनिधी श्रीमंत शाहू छत्रपती यांना पद, पैसा, प्रतिष्ठा याची गरज नाही. मात्र देशाची वाटचाल आज एका वेगळ्या वळणावर आली आहे. या कठीण परिस्थितीत घटनात्मक मूल्ये धोक्यात आली आहेत. घटनात्मक मुल्यांच्या रक्षाणासाठीच श्रीमंत शाहू छत्रपती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोल्हापुरचा […]

घटनात्मक मुल्यांच्या रक्षणासाठी शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात

नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात : हॉटेल सयाजी येथे उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक यांचा मेळावा

कोल्हापूर प्रतिनिधी

श्रीमंत शाहू छत्रपती यांना पद, पैसा, प्रतिष्ठा याची गरज नाही. मात्र देशाची वाटचाल आज एका वेगळ्या वळणावर आली आहे. या कठीण परिस्थितीत घटनात्मक मूल्ये धोक्यात आली आहेत. घटनात्मक मुल्यांच्या रक्षाणासाठीच श्रीमंत शाहू छत्रपती लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. कोल्हापुरचा पुरोगामी विचारांचा वारसा घेवून ते ही लढाई लढत आहेत. त्यांना कोल्हापूरच्या जनेतेने साथ द्यावी, असे आवाहन नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंत थोरात यांनी केले.
कोल्हापूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या प्रचारार्थ हॉटेल सयाजी येथे जिह्यातील उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांचा मेळावा झाला. यामध्ये मार्गदर्शन करताना थोरात बोलत होते. यावेळी आमदार सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.
थोरात म्हणाले, स्वातंत्र्य, समता, भयमुक्त सामाजिक वातावरण यासाठी बहुसंख्याक वादाच्या विरोधात लढा देण्याची आता गरज आहे. ज्यावेळी असे प्रसंग देशात उभे राहतात त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे वारस पुढे येतात. आज अशाच परिस्थितीमध्ये तीन पक्षांच्या विनंतीला मान देऊन शाहू महाराज लोकसभा निवडणुकीत उभे आहेत. त्यामुळेच सर्व स्तरातून त्यांना पाठिंबा मिळत आहे. ज्यावेळी मुल्यांचा संघर्ष उभा राहतो त्यावेळी आपण तीन गोष्टी करू शकतो. गप्प राहणे, विरोधात बोलणे आणि कृती करणे. यातील कृती करण्याची आता गरज असल्याचे थोरात यांनी सांगितले.
श्रीमंत शाहू छत्रपती म्हणाले, काँग्रेसच्या सत्ताकाळात देशाने जी प्रगती केली त्या पायावरच गेल्या 10 वर्षात देशाचा विकास झाला आहे. मात्र आता ते मान्य केले जात नाही. लोकशाहीकडून देश एकाधिकारशाहीकडे आला आहे. पुढचा टप्पा हुकुमशाहीचा आहे. त्यामुळे वेळीच भूमिका घेऊन याला विरोध करणे गरजेचे आहे, असे श्रीमंत शाहू छत्रपती यांनी सांगितले.
आमदार सतेज पाटील म्हणाले, श्रीमंत शाहू छत्रपती खासदार झाल्यानंतर छत्रपती म्हणून त्यांचा कोल्हापूरच्या विकासासाठी नक्कीच फायदा होणार आहे. चंदगड, शाहूवाडी, राधानगरी अशा ग्रामीण भागातील नागरिकांची कामे वेळेत व्हावी. यासाठी शाहू महाराज खासदार झाल्यानंतर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी संपर्क कार्यालय करणार आहेत. मतदार संघाच्या पलीकडे जाऊन शाहू महाराज कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यासाठी काम करतील. त्यामुळे श्रीमंत शाहू छत्रपती यांना पाठबळ देण्याची ही एक वेगळी संधी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील, रिझर्व बँकेच्या डेप्युटी गव्हर्नर उषा थोरात, उद्योजक बाळ पाटणकर, संग्राम पाटील, निलराजे बावडेकर, सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर, सुरेंद्र जैन, आनंद माने, आर्किटेक्ट अजय कोराणे, विक्रांतसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.