Satara News | मसूर–उंब्रज रस्त्यावर अपघातांची मालिका; रेल्वे पुलाच्या उतारावर धोकादायक परिस्थिती

                                      साताऱ्यात मसूर–उंब्रज मार्गावर अपघात; मसूर-मसूर-उंब्रज मुख्य मार्गावरील रेल्वे पुलाच्या उतारावर संबंधित विभागाच्या निष्क्रियतेमुळे व रस्ता कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे. ठोस उपाय योजनेची सातत्याने मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत […]

Satara News | मसूर–उंब्रज रस्त्यावर अपघातांची मालिका; रेल्वे पुलाच्या उतारावर धोकादायक परिस्थिती

                                      साताऱ्यात मसूर–उंब्रज मार्गावर अपघात;
मसूर-मसूर-उंब्रज मुख्य मार्गावरील रेल्वे पुलाच्या उतारावर संबंधित विभागाच्या निष्क्रियतेमुळे व रस्ता कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे सातत्याने अपघातांची मालिका सुरू आहे. ठोस उपाय योजनेची सातत्याने मागणी करूनही दुर्लक्ष केल्याने प्रवासी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सध्या मसूर परिसरात रस्त्याचे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी रेल्वे पुलाच्या उतारावर मुरूम अस्ताव्यस्त पसरलेला आहे. त्यातच मोठे दगड गोटे रस्त्यावर पडलेले असल्याने वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.मसूरकडून उंब्रज कडे जाताना पुलाच्या चढावर आणि उतारावरही समोरून येणाऱ्या बाहनांच्या तीव्र प्रकाशझोतामुळे दुचाकीस्वारांना पुढील रस्ता स्पष्ट दिसत नाही. अशा परिस्थितीत खराब रस्त्याचा अंदाज न आल्याने अनेकदा अपघात घडत आहेत.
शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास अशाच प्रकारे एका दुचाकीस्वाराच्या डोळ्यावर समोरच्या वाहनाचा प्रखर प्रकाश पडल्याने तोल जाऊन तो रस्त्याच्या डाव्या बाजूच्या नाल्यात कोसळला. या अपघातात संबंधित युवकाचा पाय फ्रैक्चर झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
यापूर्वीही याच ठिकाणी कोणेगाव व कवठे गावाकडे वळणाऱ्या वाहनांचे अनेक अपघात झाले आहेत. या धोकादायक ठिकाणी तातडीने रस्ता समतल करणे, मुरूम व दगड-गोटे हटवणे, योग्य दिशादर्शक, फलक व परावर्तक (रिपलेक्टर)बसवणे, वेगमर्यादा दर्शविणारे फलक लावणे तसेच आवश्यक असल्यास स्पीड ब्रेकर उभारणे, अशी मागणी होत आहे.
एखाद्याचा जीव जाण्यापूर्वी संबंधित विभागाने तत्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे सातारा जिल्हा माजी उपाध्यक्ष अनिकेत कांबिरे व सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कांबिरे यांनी दिला आहे. कवठे व कोणेगाव ग्रामस्थांसह स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वारंवार अपघात होत असताना संबंधित विभाग गांधारीची भूमिका घेत आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी असून, येत्या काही दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असल्याचेही स्पष्ट केले आहे.