सेन्सेक्स कोसळला, गेल्या 4 वर्षांमधली एका दिवसातली सर्वात मोठी घसरण
शेअरबाजारात ट्रेडिंगच्या सुरुवातीपासूनची घसरण ट्रेडिंग बंद होईपर्यंत कायम राहिली.
आजची शेअर बाजारातली घसरण ही गेल्या 4 वर्षांमधली सर्वात मोठी एका दिवसातली घसरण होती. सेन्सेक्स 4390 पॉईंट्सनी घसरून 72,079 वर बंद झाला. तर निफ्टी 1379 पॉईंट्सनी घसरून 21,884 वर बंद झाला. आज सकाळी ट्रेडिंगला सुरुवात झाली तेव्हा 1000 अंकांनी घसरलेला सेन्सेक्स निवडणुकीचे कल येते गेले, तसा आणखी घसरत गेला.
बहुतेक एक्झिट पोल्सनी भाजप आणि एनडीए मोठ्या फरकाने सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तवला होता. यानंतर सोमवार 3 जूनच्या ट्रेडिंगमध्ये शेअर बाजाराने उसळी घेतली. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांकांनी रेकॉर्ड उंची गाठली होती. या दोन प्रमुख निर्देशांकांमध्ये 3% वाढ सोमवारच्या दिवशी नोंदवण्यात आली होती.
सेन्सेक्स काल 76,400 च्या पातळीच्याही वर गेला होता. तर निफ्टी 50 निर्देशांकही 23,250च्या पातळीवर होता. पण मंगळवार 4 जूनच्या ट्रेडिंगमध्ये शेअर बाजाराने ही वाढ गमावली. NDA चा तितक्या मोठ्या फरकाने विजय होणार नाही असा अंदाज निकालांच्या कलांवरून आल्यामुळे शेअर बाजारात अनिश्चितता निर्माण झाली आणि बाजारातली घसरण वाढत गेली.
दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास सेन्सेक्सने दिवसातली 70,234ची निचांकी पातळी गाठली. यावेळी सेन्सेक्समध्ये जवळपास 6234 पॉइंट्सनी घसरलेला होता. त्यानंतर मात्र सेन्सेक्स थोडा सावरला. सेन्सेक्समधल्या 30 पैकी 24 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. तर निफ्टीमधल्या 50 पैकी 41 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण नोंदवण्यात आली. बँक इंडेक्स, मिडकॅप, स्मॉलकॅप इंडेक्ससह सगळ्याच निर्देशांकांमध्ये घसरण नोंदवण्यात आली.