सावंतवाडी वन विभागाच्या चौकीवर झाड कोसळून कर्मचारी जखमी

सावंतवाडी वन विभागाच्या चौकीवर झाड कोसळून कर्मचारी जखमी

सावंतवाडी । प्रतिनिधी
मुसळधार पावसामुळे नरेंद्र डोंगर येथील वन विभागाच्या चौकीवर झाड कोसळून आत असलेला कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान घडली.नरेंद्र डोंगर येथील वनखात्याच्या चौकीवर माजी सैनिक विद्याधर सावंत हे आज ड्युटीवर होते. त्या चौकीवर झाड पडून आत असलेले सावंत हे कर्मचारी गंभीर जखमी झाले. रक्तबंबाळ अवस्थेत चौकीमध्ये अडकलेला असतानाच त्यांनी आपला सहकारी अशोक गावडे यांना फोन करून सदर घटनेची कल्पना दिली. अशोक गावडे तेथे तात्काळ पोहोचले व सावंत यांना त्याने चौकीमधून बाहेर काढले. आपला सहकारी उत्तम कदम यांच्या मदतीने सावंत यांना सावंतवाडी कुटीर रुग्णालयामध्ये दाखल केले .विद्याधर सावंत यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांच्यावर कुटीर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांना सहकार्य केले.