सौदी अरेबियाचा अमेरिकेला मोठा झटका

कच्च्या तेलाच्या विक्रीसाठी डॉलरचा करणार नाही वापर : पेट्रो-डॉलर कराराची मुदत संपुष्टात वृत्तसंस्था/ रियाध मागील काही काळापासून जागतिक स्तरावर एक नवा ट्रेंड दिसून येत आहे. एका मागोमाग एक अनेक देश जागतिक व्यापारासाठी अमेरिकन डॉलर्सचा वापर बंद करण्याचा मार्ग अवलंबित आहेत. संबंधित देश आता स्वत:च्या चलनाला प्राधान्य देत आहेत. यामुळे अमेरिकेला झटका बसत आहे. परंतु तूर्तास […]

सौदी अरेबियाचा अमेरिकेला मोठा झटका

कच्च्या तेलाच्या विक्रीसाठी डॉलरचा करणार नाही वापर : पेट्रो-डॉलर कराराची मुदत संपुष्टात
वृत्तसंस्था/ रियाध
मागील काही काळापासून जागतिक स्तरावर एक नवा ट्रेंड दिसून येत आहे. एका मागोमाग एक अनेक देश जागतिक व्यापारासाठी अमेरिकन डॉलर्सचा वापर बंद करण्याचा मार्ग अवलंबित आहेत. संबंधित देश आता स्वत:च्या चलनाला प्राधान्य देत आहेत. यामुळे अमेरिकेला झटका बसत आहे. परंतु तूर्तास याचा अमेरिकेच्या डॉलर्सच्या मूल्यावर कुठलाच प्रभाव पडत नसल्याचे चित्र आहे, पण, लवकरच अमेरिकन डॉलर्सचा अनेक देशांकडून वापर होत नसल्याने नकारात्मक प्रभाव पडू शकतो. अमेरिकन डॉलर्सच्या वापराप्रकरणी आता एका मित्र देशानेच झटका दिला आहे.
सौदी अरेबियाकडून आता कच्च्या तेलाच्या विक्रीसाठी डॉलरऐवजी चिनी युआन स्वीकारण्याचा विचार सुरू आहे. यामुळे कच्च्या तेलाची जागतिक बाजारपेठ आणि आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या आघाडीवर मोठा बदल होणार आहे. सौदी अरेबियाने कच्च्या तेलाच्या विक्रीच्या बदल्यात युआन हे चलन स्वीकारण्याचा निर्णय घेतला तर जागतिक पेट्रोलियम बाजारपेठेत अमेरिकेच्या डॉलरच्या प्रभुत्वाला धक्का पोहोचू शकतो.
पेट्रो-डॉलर करार 1973 च्या कच्च्या तेलाच्या संकटानंतर अस्तित्वात आला होता. यात सौदी अरेबिया स्वत:च्या कच्च्या तेलाच्या निर्यातीचे मूल्य केवळ अमेरिकन डॉलरमध्ये निश्चित करणार आणि कच्च्या तेलाच्या विक्रीतून प्राप्त अतिरिक्त रकमेचा वापर अमेरिकन ट्रेझरी बाँडखरेदीसाठी करणार असल्याचे या करारात निश्चित करण्यात आले होते. याच्या बदल्यात अमेरिकेने सौदी अरेबियाला सैन्य समर्थन आणि संरक्षण प्रदान केले होते. या कराराद्वारे सौदी अरेबियाने स्वत:ची आर्थिक आणि राष्ट्रीय सुरक्षा सुनिश्चित केली आणि अमेरिकेने कच्च्या तेलाचा एक विश्वासार्ह पुरवठादार आणि मोठा गुंतवणुकदार प्राप्त केला होता.
पेट्रो-डॉलर करार
अमेरिका आणि सौदी अरेबिया यांच्यात मागील 50 वर्षांपासून पेट्रो-डॉलर करार होता. या कराराच्या बदल्यात सौदी अरेबिया कच्च्या तेलाच्या विक्रीच्या बदल्यात अमेरिकन डॉलर्सच्या स्वरुपात रक्कम स्वीकारत होता. हा करार 9 जून रोजी संपुष्टात आला असून सौदी अरेबिया आता या कराराला मुदतवाढ देण्याच्या विरोधात आहे. सौदी अरेबियाच्या या निर्णयामुळे अमेरिकन डॉलरच्या मूल्यासोबत अमेरिकन अर्थव्यवस्थेवरही नकारात्मक प्रभाव पडणार असल्याचे मानले जात आहे.
निर्णयामागील कारण
सौदी अरेबिया स्वत:च्या सुरक्षेसाठी अमेरिकेकडून दशकांपूर्वी देण्यात आलेल्या आश्वासनांच्या पूर्ततेबद्दल असमाधानी आहे. याचमुळे सौदी अरेबियाने आता युआन-मूल्यानुसार कच्च्या तेलाच्या विक्रीच्या कराराकरता चीनसोबत वाटाघाटी सुरू केल्या आहेत. युआन चलनाचा स्वीकार करून सौदी अरेबिया एकप्रकारे अमेरिकेऐवजी चीनच्या दिशेने झुकत असल्याचे संकेत देत आहे. याचबरोबर जागतिक कच्च्या तेलाच्या बाजारात मूल्यनिश्चिती व्यवस्था आणि व्यापार प्रथांमध्ये बदल दिसून येऊ शकतात.