सातारा लोकसभा मतदारसंघ : शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना की…?
“लोकसभा उमेदवार निवडीमध्ये माझ्याकडून चूक झाली हे मी जाहीरपणे मान्य करतो. पण मला आनंद आहे की, ती चूक सुधारण्यासाठी साताऱ्याच्या घराघरातील तरुण-वडीलधारे 21 तारखेची वाट पाहात आहेत आणि या दिवशी ते श्रीनिवास पाटलांना विजयी करतील.”
“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्वागतासाठी वरुण राजानेही आपल्याला आशीर्वाद दिले आहेत. त्यांच्या आशीर्वादाने हा सातारा जिल्हा महाराष्ट्रात चमत्कार करणार आहे.”
2019 च्या विधानसभा निवडणुकीची राज्यभरात धामधूम सुरू होती. या विधानसभा निवडणुकीसोबत एका लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूकही होणार होती. हा मतदारसंघ म्हणजे सातारा.
लोकसभा निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर ही पोटनिवडणूक होत होती. उदयनराजे भोसलेंविरुद्ध निवडणुकीच्या रिंगणात उभे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील.
श्रीनिवास पाटील यांच्या प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भर पावसात केलेलं हे भाषण महाराष्ट्रभर गाजलं.
त्यांनी म्हटल्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्याने चमत्कार केलाच, पण विधानसभा निवडणुकीच्या निकालाचं चित्रही इथून बऱ्याच अंशी बदललं.
शरद पवारांना साताऱ्याने भरभक्कम साथ देण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. पक्षाच्या स्थापनेपासूनच सातारा हा कायम राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे.
आता मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष दुभंगल्यानंतर या लोकसभा मतदारसंघातली सगळीच गणितं बदलली आहेत.
त्यामुळेच आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत इथे शरद पवार विरुद्ध अजित पवार असा संघर्ष रंगणार का? भाजप ही जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडणार की उदयनराजेंना उमेदवारी देणार? महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघ हा कायम शिवसेनेकडे राहिला असल्याने एकनाथ शिंदे या जागेवर दावा सांगणार का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
सातारा जिल्ह्यातल्या या सगळ्या राजकीय समीकरणांबद्दल आपण जाणून घेणार आहोतच, पण त्यासोबत या मतदारसंघाचा इतिहास, 2014 आणि 2019 च्या निवडणुकीत इथे नेमकं काय झालं होतं, आज या मतदारसंघाचे नेमके प्रश्न काय आहेत याचाही थोडक्यात आढावा घेणार आहोत.
1996 च्या ‘त्या’ निवडणुकीचा अपवाद वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीचं वर्चस्व
सातारा हा दीर्घकाळ काँग्रेसच्या विचारधारेकडे झुकलेला मतदारसंघ राहिला आहे. 1952 साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालिन सातारा दक्षिण आणि सातारा उत्तर मतदारसंघातून अनुक्रमे काँग्रेसचे वेंकटराव पीराजीराव पवार आणि गणेश सदाशिव आळतेकर हे निवडून आले होते. किसन वीर यांनीही या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं.
1967 ते 1984 असा प्रदीर्घ काळ या मतदारसंघाचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्याने केलं. आणिबाणीनंतर 1977 साली झालेल्या निवडणुकीत रायबरेलीतून इंदिरा गांधींचा पराभव झाला, मात्र साताऱ्यामधून यशवंतराव चव्हाण आणि कराडमधून प्रेमलाकाकी चव्हाण या भरघोस मताधिक्याने जिंकून आल्या होत्या.
काँग्रेसचे नेते प्रतापराव भोसले, अभयसिंहराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदारसंघाचं नेतृत्व केलं.
काँग्रेसला भक्कम साथ मिळण्यात सहकाराच्या राजकारणाचीही वाटा होता.
1996 ची निवडणूक ही अपवाद होती. यावेळी साताऱ्यातून शिवसेनेचे उमेदवार हिंदुराव निंबाळकर निवडून आले होते. अर्थात, त्यांच्या विजयाला काँग्रेसमधील अंतर्गत कलहही कारणीभूत ठरला.
काँग्रेसचे साताऱ्याचे तत्कालिन खासदार प्रतापराव भोसले हे शरद पवार यांचे पक्षांतर्गत कट्टर विरोधक म्हणून ओळखले जात होते.
विद्यमान खासदार असल्यामुळं प्रतापरावांची उमेदवारी कापणं शक्य नव्हतं. परंतु प्रतापराव भोसले यांचा पराभव करण्याची व्यूहरचना आखण्यात आली होती असं म्हणतात. त्यासाठी काँग्रेसच्या मतांमध्ये विभागणी करण्यासाठी अनेक समविचारी उमेदवार उभे करण्याची खेळी करण्यात आली.
याचवेळी उदयनराजे भोसले यांनी पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्याचबरोबर पार्थ पोळके, कर्नल आर. डी. निकम असे इतरही उमेदवार उभे करण्यात आले.
त्याचाच परिणाम म्हणून शिवसेनेच्या हिंदुराव नाईक-निंबाळकरांनी प्रतापराव भोसलेंचा बारा हजार मतांनी पराभव केला.
1999 साली जेव्हा काँग्रेसपासून वेगळं होत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर सातारा लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेसचंच वर्चस्व राहिलं आहे.
2014 आणि 2019 च्या निवडणुकीत काय झालं होतं?
2009 साली उदयनराजे भोसले पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले. त्यांनी शिवसेनेच्या पुरूषोत्तम जाधव यांचा पराभव केला.
2014 मध्येही राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे भोसलेंनाच उमेदवारी दिली. एरव्ही भाजप-शिवसेना युतीमध्ये पहिल्यापासून सातारा मतदारसंघ हा शिवसेनेकडेच राहिला होता. मात्र, 2014 ला युतीमध्ये ही जागा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला सोडण्याचा निर्णय घेतला गेला. नाराज झालेल्या पुरूषोत्तम जाधव यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.
पण उदयनराजे भोसले यांना 5,22,531 मतं मिळाली, तर पुरूषोत्तम जाधव यांना 1,55,937. रिपाइंच्या अशोक गायकवाड यांना 71808 मतं मिळाली. देशभरात मोदी लाट असतानाही राष्ट्रवादी काँग्रेसने आपला बालेकिल्ला टिकवला.
2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसने तिसऱ्यांदा उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली. शिवसेनेने त्यांच्याविरोधात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली.
उदयनराजेंनी या निवडणुकीत नरेंद्र पाटील यांचा पराभव केला, पण त्यांचं मताधिक्य कमालीचं घटलं होतं. उदयनराजेंना या निवडणुकीत 5 लाख 79 हजार 026 मतं मिळाली, तर नरेंद्र पाटील यांना 4 लाख 52 हजार 498 मतं मिळाली.
पण उदयनराजे भोसले यांनी या निवडणुकीनंतर अवघ्या पाच महिन्यांत खासदारकीचा राजीनामा दिला आणि भाजपमध्ये प्रवेश केला.
साताऱ्यात लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आणि भाजपकडून उदयनराजेंना उमेदवारीही देण्यात आली. तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासाठी प्रचार सभाही घेतली होती.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून शरद पवारांनी आपले जुने सहकारी आणि ज्येष्ठ नेते श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी दिली.
शरद पवारांची पावसातील सभा हा या निवडणुकीतला टर्निंग पॉइंट होताच. पण उदयनराजेंविषयी मतदारसंघात फार अनुकूल वातावरणही नव्हतं16 व्या लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडून आलेल्या उदयनराजे भोसले यांची लोकसभेतील उपस्थिती अवघी 27 टक्के होती.
त्यांनी प्रश्नही उपस्थित केले नाहीत, कोणते खाजगी विधेयक मांडले नाही की चर्चेत भागही घेतला नव्हता. या सगळ्याचा फटकाही उदयनराजेंना बसलाच.
सातारा लोकसभा मतदारसंघाची रचना आणि बलाबल
सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सुरूवातीला अकरा विधानसभा मतदारसंघ होते. 2009 च्या पुनर्रचनेत सातारा मतदारसंघ सहा विधानसभा मतदारसंघात विभागला गेला.
पूर्वी कराड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात होता, तो पुनर्रचनेत सातारा लोकसभा मतदारसंघात विलीन झाला आणि नव्याने माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली.
आता सातारा लोकसभा मतदारसंघात वाई, कोरेगाव, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण, सातारा या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.
2019 च्या निवडणुकीत या प्रत्येक मतदारसंघामध्ये श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे यांचं मताधिक्य नेमकं कसं होतं हे पाहूया.
म्हणजेच कोरेगाव आणि सातारा हे दोन मतदारसंघ वगळता उरलेल्या चारही मतदारसंघात श्रीनिवास पाटलांना मताधिक्य होतं.
सध्या वाईचे आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील आहेत. ते अजित पवार गटाकडे आहेत. कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत.
कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब पाटील आमदार आहेत. सध्या ते शरद पवार गटाकडे आहेत. कराड दक्षिणमधून काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आमदार आहेत.
पाटणमधून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे शंभूराज देसाई, तर सातारा विधानसभा मतदारसंघातून शिवेंद्रराजे भोसले हे आमदार आहेत.
या सर्वपक्षीय बलाबलामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची गणितं रंजक झाली आहेत आणि त्यामुळेच सातारा लोकसभा मतदारसंघावर महायुतीतील तिन्ही पक्षांनी दावा केला आहे.
साताऱ्यात तुतारी विरूद्ध घड्याळ की…?
या मतदारसंघाचा आजपर्यंतचा इतिहास पाहता महाविकास आघाडीकडून या जागेसाठी शरद पवार गट आग्रही राहणार हे उघड आहे.
इथून पुन्हा एकदा श्रीनिवास पाटील यांनाच उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर श्रीनिवास पाटील यांचे पुत्र सारंग पाटील हेही उत्सुक असल्याचं सांगितलं जात आहे.
कराड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील तसेच विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदेच्याही नावाची चर्चा आहे.
त्यामुळे शरद पवार जुन्याच चेहऱ्याला संधी देणार की सारंग पाटील किंवा दुसरा उमेदवार देणार याकडे सर्वांचं लक्ष आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीची ताकद पाहता अजित पवार हे स्वतःही ही जागा आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही आहेत.
बारामतीप्रमाणेच ज्या अन्य जागांसाठी अजित पवार इच्छुक आहेत त्यामध्ये सातारा आणि शिरुर हे दोन मतदारसंघ प्रामुख्याने आहेत.
हा मतदारसंघ अजित पवार गटाकडे गेल्यास माजी खासदार लक्ष्मणराव जाधव पाटील आणि वाईचे आताचे आमदार मकरंद जाधव पाटील यांचे भाऊ नितीन पाटील यांना उमेदवारी मिळू शकते.
काही दिवसांपूर्वी रामराजे निंबाळरांनीही साताऱ्यामधून अजित पवार गटाने निवडणूक लढविण्याबद्दल भाष्य केलं होतं.
आता साताऱ्यात तुतारी विरुद्ध घड्याळ अशी लढत झाली तर राष्ट्रवादीच्या मताचं विभाजन होऊ शकतं. अशावेळी कोरेगाव, पाटण, साताऱ्यातून अजित पवारांना भाजप आणि एकनाथ शिंदेंच्या गटाचं बळ मिळणार का?
हा प्रश्न उपस्थित होण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना लोकसभा लढविण्याची इच्छा आहे, का या प्रश्नावर उदयनराजे भोसले यांनी प्रत्येकाची इच्छा असते, त्याला मी काही अपवाद नाही, असं म्हटलं होतं.
भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनीही एका पत्रकार परिषदेत साताऱ्यात भाजपचाच उमेदवार असेल असं म्हटलं होतं.
युतीमध्ये सातारा लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेकडे राहिला असल्याने पुरुषोत्तम जाधव यांनीही तयारीचे संकेत दिले आहेत.
तर दुसरीकडे कराड उत्तर आणि दक्षिणचा भक्कम पाठिंबा सोडला तर इतर मतदारसंघात शरद पवार गटाला ताकद कशी मिळणार? हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे.
सहानुभूतीचे राजकारण की सातारकरांच्या समस्यांना प्राधान्य?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर शरद पवार गट आणि अजित पवार गट सातारा लोकसभा मतदारसंघात आमनेसामने आल्यानंतर भावनिक आवाहनं केली जातीलच. पण सातारकरांच्या वर्षानुवर्षांच्या समस्यांचं काय?
उदयनराजेंना उमेदवारी जाहीर केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी रस्त्यांसाठी पन्नास कोटींचा निधी, हद्दवाढीला मंजुरी अशा अनेक घोषणा दिल्या होत्या. मात्र, साताऱ्यातील बहुतांश रस्त्यांची अवस्था आजही फार बरी नाहीये.
सातारा जिल्ह्यातली अनेक कामं वर्षानुवर्षं रखडली आहेत. साताऱ्याचा औद्योगिक विकास मंदावलेलाच आहे. सातारा MIDC चा म्हणावा तसा विकास झाला नाही. शिरवळसारख्या ठिकाणी MIDC डेव्हलप झाली, मात्र साताऱ्यात मोठ्या कंपन्या फारशा नाहीत. त्याचाच परिणाम लहान उद्योगांवरही झाला आहे.
वैद्यकीय, आभियांत्रिकी आणि अन्य विषयांतली उच्च शिक्षण देणाऱ्या संस्थांचाही पुरेसा विकास झालेला नाही.
त्यामुळे शिक्षण आणि रोजगाराच्या संधीसाठी इथल्या तरुणांना बाहेर पडावं लागतं.
मोदी लाटेतही राखलेला आपला बालेकिल्ला शरद पवार यावेळीही राखणार का हा प्रश्न राजकीय विश्लेषकांसाठी जितका महत्त्वाचा आहे, तितकाच सामान्य नागरिकांसाठी विकासाच्या या या सगळ्या मुद्द्यांचा विचारही या निवडणुकीत होणार का हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
Published By- Priya Dixit