तोतया पत्रकारांचा ससेमिरा; सामान्यांसाठी मरणाचा फेरा!

निपाणीत गावठी पापाराझींमुळे एकाचा बळी : खानापुरातही ब्लॅकमेलिंगचा प्रकार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या, व्यापक कारवाईची गरज बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट वाढला आहे. अलीकडे तर त्यांचा उपद्रव जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या आठवड्यात खानापूर व निपाणी येथे झालेल्या दोन घटनांमुळे या ‘गावठी पापाराझीं’चा पराक्रम ठळक चर्चेत आला आहे. निपाणी येथील एका हॉटेल कामगाराला तर […]

तोतया पत्रकारांचा ससेमिरा; सामान्यांसाठी मरणाचा फेरा!

निपाणीत गावठी पापाराझींमुळे एकाचा बळी : खानापुरातही ब्लॅकमेलिंगचा प्रकार, पोलिसांनी आवळल्या मुसक्या, व्यापक कारवाईची गरज
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यात तोतया पत्रकारांचा सुळसुळाट वाढला आहे. अलीकडे तर त्यांचा उपद्रव जीवघेणा ठरू लागला आहे. गेल्या आठवड्यात खानापूर व निपाणी येथे झालेल्या दोन घटनांमुळे या ‘गावठी पापाराझीं’चा पराक्रम ठळक चर्चेत आला आहे. निपाणी येथील एका हॉटेल कामगाराला तर आपल्या जीवाचे मोल द्यावे लागले. तोतया पत्रकारांवर खास करून ब्लॅकमेलिंगच्या व्यवसायात उतरलेल्या यु-ट्यूबर्सवर आळा घालण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. सध्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील व याआधीचे जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी तर सरकारी अधिकारी व सर्वसामान्य नागरिकांना खंडणीसाठी ब्लॅकमेल करणारे यु-ट्यूबर्स व तोतया पत्रकारांविरुद्ध मोहीमच उघडली होती. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांची बदली झाली आणि जिल्हाधिकाऱ्यांचे याकडे लक्ष कमी झाले. त्यामुळे पुन्हा या गावठी पापाराझींनी डोके वर काढले आहे. खानापूर व निपाणी येथे घडलेल्या घटना लक्षात घेता वेळीच या तोतयांना आवर घातला नाही तर परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याचा धोका आहे. गेल्या दोन वर्षात यु-ट्यूब चॅनेलच्या नावाने सरकारी अधिकारी, कंत्राटदार व सर्वसामान्य नागरिकांना खंडणीसाठी पिडणाऱ्या अनेक खासगी पापाराझींवर पोलिसांत गुन्हे दाखल झाले आहेत.
एक वर्षापूर्वी तर यु-ट्यूब चॅनेलच्या नावे वाहनांची तपासणी करीत कित्तूरजवळ कार अडवून कारमधील युवकाला लुटण्याची घटना घडली होती. निपाणी तालुक्यात रेशनदुकान चालविणाऱ्या एका दुकानदाराच्या घरात घुसून या खासगी पापाराझींनी तपासणीही केली होती. यमकनमर्डीजवळ तांदूळ वाहतूक करणारी वाहने अडवून ट्रकचालकांना लुटल्याच्याही घटना घडल्या होत्या. निपाणी, यमकनमर्डी, हिरेबागेवाडी, कित्तूर, खानापूरसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्थानकात या तोतयांविरुद्ध गुन्हेही दाखल झाले आहेत. ‘निपाणी येथील गोल्डन स्टार लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालतो. आम्ही त्याच्यावर प्रकाश टाकून पोलिसांकडून छापे टाकायला लावू. तुमच्यावर गुन्हे दाखल करू, तुम्हाला गजाआड करायला लावू, असे घडायचे नको असेल तर आम्हाला काय तरी देऊन प्रकरण मिटवा,’ असे सांगून धमकावल्यामुळे लॉज इमारतीवरून पडून किरण गणपती कांबळे (वय 40) रा. भीमनगर, निपाणी या कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला.
निपाणी पोलिसांनी बाळाप्पा बसवंत गुडगेनट्टी (वय 28) रा. गोडीहाळ, ता. बेळगाव, नितेश शाम कित्तूर (वय 29) रा. वैभवनगर बेळगाव, जान मारुती कऱ्याप्पगोळ (वय 35) मूळचा राहणार भैरनट्टी, ता. मुडलगी, सध्या रा. रामतीर्थनगर बेळगाव या तिघा जणांना निपाणीचे पोलीस निरीक्षक बी. एस. तळवार यांनी अटक केली आहे. खरे तर कोणत्याही ठिकाणी गैरधंदे सुरू असतील तर त्याच्यावर छापे टाकण्याचा अधिकार शासकीय यंत्रणेलाच असतो. पत्रकारांच्या निदर्शनास हे गैरधंदे आल्यानंतर त्याला वाचा फोडता येते. तसे न करता खंडणीसाठी धमकावल्यामुळे हॉटेल कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. 12 जानेवारी रोजी सायंकाळी निपाणी येथे ही घटना घडली. 11 जानेवारी रोजी वनखात्याचा पास घेऊन हत्तरगुंजी-गणेबैलजवळ बांबू तोडणाऱ्या कंत्राटदाराला धमकावून त्याच्याजवळून 40 हजार रुपये उकळणाऱ्या पाच तोतयांना खानापूर पोलिसांनी 13 जानेवारी रोजी अटक केली आहे. खानापूरचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक यांनी शशीधर चंद्राप्पा नायक (वय 34) रा. गांधीनगर खानापूर, बाळाप्पा ऊर्फ शरद कल्लाप्पा होन्ननायक (वय 55) रा. नंदगड, शशीकांत तळवार (वय 30) रा. सुरापूर, रवी बाळाप्पा मादर (वय 38) रा. मुडेवाडी, पांडुरंग बसाप्पा गुळण्णावर (वय 38) रा. रुमेवाडी या पाच जणांना अटक केली आहे.
40 हजार उकळल्याचा आरोप
‘बांबू वाहतूक करण्यासाठी तुमच्याजवळ पास आहे का?’ अशी विचारणा करीत केलेला व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन 40 हजार रुपये उकळल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांच्या मार्गदर्शनानुसार निपाणी व खानापूर पोलिसांनी या दोन्ही प्रकरणातील संशयितांच्या मुसक्या आवळल्या असल्या तरी अशा प्रकरणांमुळे खंडणीखोर यु-ट्यूबर्स व तोतया पत्रकारांविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
वेळीच आवर घालणे जरुरीचे
खंडणीखोर नेहमी सरकारी अधिकारी, डॉक्टर, कंत्राटदार आदींना आपले लक्ष्य बनवित असतात. पीडीओ या पापाराझींचे पहिले बळी ठरतात. सरकारी डॉक्टर, परिचारिका, इतर सरकारी कार्यालयातील अधिकारी यांना खंडणीसाठी तगादा लावला जातो. रायबाग, रामदुर्ग, खानापूर आदी तालुक्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी तर खंडणीखोर तोतयांना आवरा, अशी मागणी करत तालुका प्रशासनाकडे निवेदनच सादर केले होते. निपाणीपासून कित्तूरपर्यंत या खासगी पापाराझींचा वावर असून प्रसंगी ट्रक व इतर वाहने अडवून कागदपत्रे तपासणे, ट्रकमध्ये आढळणाऱ्या मालाविषयी विचारणा करणे, संबंधितांना धमकावून खंडणी उकळणे आदी प्रकार सुरू आहेत. काकतीजवळ तर या तोतयांनी महामार्गावर वाहने अडवून चालकाकडे कागदपत्रे नाहीत म्हणून दहा हजार रुपये उकळल्याची उदाहरणे आहेत. यासंबंधी भारत लाईव्ह न्यूज मीडियाने याआधीही सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले आहे. पोलीस व इतर शासकीय यंत्रणेने या खासगी पापाराझींना वेळीच आवर घातला नाही तर परिस्थिती आणखी हाताबाहेर जाण्याचीच भीती अधिक आहे.