तिकीट लावून तमाशाचे खेळ करण्याचे दिवस संपले! कवलापूरच्या प्रसिध्द ‘काळू बाळू ‘यांची पाचव्या पिढीचे तमाशात आगमन
सध्या जत्रा यात्रावर तमाशा तग धरून : सोशल मीडियाचा मोठा परिणाम
संजय गायकवाड सांगली
लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या राजकारणातील मंडळी एकमेकांना काळू बाळू यांची उपमा देत असले तरी उभ्या महाराष्ट्रात तमाशाला एक बेगळे वलय आणि अफाट प्रसिध्दी मिळवून दिली त्या सांगली जिल्ह्यातील कवलापूर गावच्या तमाशा सम्राट काळू-बाळू यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाने. ते आजही तग धरून टिकून आहे. सोशल मीडिया आणि टीव्ही चॅनेलच्या जमान्यात तमाशापुढे मोठे आव्हान उभे राहिले असून तिकीट लावून तमाशाचे खेळ करण्याचे दिवस संपले आहेत. सध्या तमाशांना केवळ जत्रा यात्रावर अवलंबून रहावे लागत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचे मतदान पार पडत असतानाच उद्धव ठाकरे यांची खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही मुलाखत म्हणजे काळू- बाळू यांचा तमाशा असा उल्लेख केला. त्यामुळे काळू-बाळू ही जोडगोळी पुन्हा एकदा लोकांच्या डोळ्यासमोर आली.
तमाशा आणि लोकनाट्याच्या निमित्ताने काळू-बाळू यांचे नाव माहित नाहीत, असे महाराष्ट्रातील एकही गाव नसेल. नागपूरपासून ते जालन्यापर्यंत आणि कोकणातील सिंधदुर्ग, रत्नागिरीपासून ते नाशिकापर्यंत असा उभा आडवा महाराष्ट्र गाजविणारी काळू-बाळू ही तमाशातील जोडगोळी सध्या हयातीत नसली तरी त्यांची पाचबी पिढी आज तमाशात उतरली आहे. नव्या पिढीनेही काळू-बाळू यांचा तमाशा जिंवत ठेवला आहे.