सांबरा महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाची उत्साहात सांगता
अभूतपूर्व क्षण अनुभवण्यासाठी गर्दी : भंडाऱ्याच्या उधळणीत जयजयकार : देवीचा व्हन्नाट डोळ्यांचे पारणे फेडणारा : सायंकाळी देवीचे सीमेकडे प्रस्थान
वार्ताहर /सांबरा
सांबरा येथे नऊ दिवसांपासून सुरू झालेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाची बुधवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत यशस्वी सांगता झाली. हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील व परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे परिसर भाविकांच्या गर्दीने अक्षरश: फुलून गेला होता. डोळ्यांचे पारणे फेडणारा देवीचा व्हन्नाट (खेळ) पाहण्यासाठी परगावच्याही भाविकांनी तोबा गर्दी केली होती. बुधवारी श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाचा शेवटचा दिवस असल्याने भक्तांनी देवीच्या दर्शनासाठी तर महिलावर्गांनी ओटी भरण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती. दुपारी दोनपर्यंत देवीच्या दर्शनासाठी व ओटी भरण्याची मुभा होती. दोननंतर धार्मिक विधांना प्रारंभ करण्यात आला. सायंकाळी धार्मिक विधी झाल्यानंतर देवीला गदगेवरून उठविण्यात आले. यावेळी देवीचा व्हन्नाट (खेळ) सुरू झाला. मारुती गल्ली, लक्ष्मी गल्ली, महात्मा फुले गल्ली, गणेशनगर, मेन रोड, कामान्ना गल्ली, बेळगाव-बागलकोटमार्गे महादेव नगरमधून देवीचे सीमेकडे प्रस्थान झाले व यात्रेची सांगता झाली. देवीचा व्हन्नाट (खेळ) पाहण्यासाठी भक्तांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकातील गदगेच्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. आजूबाजूच्या घरांतून व मिळेल त्या ठिकाणी भक्त मोठ्या संख्येने थांबले होते. भंडाऱ्याच्या उधळणीत व श्री महालक्ष्मी देवीच्या जयजयकारात देवीचा व्हन्नाट (खेळ) सुरू होता. भक्तगण देवीचे रूप मनामध्ये साठवत देवीकडे सर्वांना चांगले आरोग्य लाभू दे, सुख-समृद्धी नांदू दे, सर्वांची भरभराट होऊ दे अशीच मनोकामना करत होते. बेळगाव-बागलकोट महामार्गावर देवीचे आगमन होताच रस्त्यावरील वाहतूक काही वेळ बंद करण्यात आली. रहदारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मारीहाळ पोलीस व वाहतूक पोलिसांनी परिश्रम घेतले.
पुढील यात्रा बारा वर्षांनी
श्री महालक्ष्मी देवीसमोर धार्मिक विधी झाल्यानंतर गाऱ्हाणे घालण्यात आले व देवीची पुढील यात्रा बारा वर्षांनंतर भरविण्याचे ठरविण्यात आले.
Home महत्वाची बातमी सांबरा महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाची उत्साहात सांगता
सांबरा महालक्ष्मीदेवी यात्रोत्सवाची उत्साहात सांगता
अभूतपूर्व क्षण अनुभवण्यासाठी गर्दी : भंडाऱ्याच्या उधळणीत जयजयकार : देवीचा व्हन्नाट डोळ्यांचे पारणे फेडणारा : सायंकाळी देवीचे सीमेकडे प्रस्थान वार्ताहर /सांबरा सांबरा येथे नऊ दिवसांपासून सुरू झालेल्या श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाची बुधवारी सायंकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत यशस्वी सांगता झाली. हा अभूतपूर्व सोहळा अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतील व परिसरातील हजारो भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे परिसर भाविकांच्या गर्दीने […]
