सांबरा विमानतळ बनणार ‘आंतरराष्ट्रीय’ दर्जाचे

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या व्हर्च्युअल पायाभरणी : 265 कोटींचा निधी मंजूर, भविष्यात देशासह परदेशातही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता बेळगाव : बेळगावच्या सांबरा विमानतळाला ‘इंटरनॅशनल एअरपोर्ट’चा टच देण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. अत्याधुनिक व जादा प्रवासी क्षमता असणाऱ्या नव्या टर्मिनल इमारतीची पायाभरणी रविवार दि. 10 मार्च रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने […]

सांबरा विमानतळ बनणार ‘आंतरराष्ट्रीय’ दर्जाचे

पंतप्रधानांच्या हस्ते उद्या व्हर्च्युअल पायाभरणी : 265 कोटींचा निधी मंजूर, भविष्यात देशासह परदेशातही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता
बेळगाव : बेळगावच्या सांबरा विमानतळाला ‘इंटरनॅशनल एअरपोर्ट’चा टच देण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. अत्याधुनिक व जादा प्रवासी क्षमता असणाऱ्या नव्या टर्मिनल इमारतीची पायाभरणी रविवार दि. 10 मार्च रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने विमानतळाचे उद्घाटन केले जाणार आहे. हा एक बेळगावकरांसाठी मैलाचा दगड ठरणार असून भविष्यात देशासह परदेशातही विमानसेवा सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. बेळगाव विमानतळावरून प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. डिसेंबर 2023 मध्ये तर तब्बल 40 हजार प्रवाशांनी विमान प्रवास केला होता. प्रवाशांची वाढलेली संख्या पाहता सध्याची टर्मिनल इमारत अपुरी पडत आहे. त्यामुळेच दोन महिन्यांपूर्वी केंद्रीय विमानतळ प्राधिकरणाने बेळगाव विमानतळाला भरघोस निधी जाहीर केला होता. नव्या टर्मिनल बिल्डींगच्या उभारणीसाठी 265 कोटी रुपये दिले जाणार आहेत. कंत्राटदाराला दोन वर्षांच्या कालावधीमध्ये टर्मिनल बांधकामाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाचवेळी देशातील अनेक विमानतळांचे उद्घाटन तसेच पायाभरणी केली जाणार आहे. पुणे, ग्वाल्हेर, लखनौ, दिल्ली, कोल्हापूर, जबलपूर, अलीगढ, आझमगढ, चित्रकुट, मुरादाबाद, श्रावस्ती, आदमपूर आदी विमानतळांवर नव्या टर्मिनल इमारत उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यांचे उद्घाटन तर बेळगाव, हुबळी, कडप्पा व वाराणसी या विमानतळांच्या टर्मिनल इमारतींची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने होणार आहे.
अशी असणार टर्मिनल इमारत
नवीन टर्मिनल इमारतीमध्ये चार एअरोब्रिज उभारले जाणार आहेत. 1200 प्रवाशांचे आगमन व तितकेच प्रवासी इतर शहरांना जाण्याची व्यवस्था या टर्मिनल बिल्डींगमध्ये असणार आहे. एकाचवेळी 2400 प्रवासी हाताळण्याची क्षमता बिल्डींगमध्ये असणार आहे. सध्या बेळगाव विमानतळाकडे 3600 चौरस मीटर क्षेत्रफळाची टर्मिनल बिल्डींग असून एकाचवेळी 600 प्रवासी ये-जा करू शकतात. नव्या टर्मिनलमुळे प्रवासी क्षमता वाढली जाणार आहे.
केएमव्ही कंपनीला कंत्राट
टर्मिनल बिल्डींगच्या बांधकामासाठी देशातील नामवंत सात कंपन्यांनी निविदा भरल्या होत्या. यापैकी केएमव्ही या कंपनीने 220 कोटीची सर्वात कमी किमतीची निविदा भरली. त्यामुळे या कंपनीला टर्मिनल बिल्डींगच्या बांधकामाचे कंत्राट देण्यात आले आहे. पुढील दोन वर्षांत आंतरराष्ट्रीय विमानतळाप्रमाणे बेळगावच्या विमानतळाला नवे रूप दिले जाणार आहे.