समाजवादी पक्षाचा ‘संगीत खुर्चीचा’ खेळ

आतापर्यंत अनेकदा  बदलले लोकसभा उमेदवार, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, संतापाची भावना  वृत्तसंस्था/ लखनौ लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा प्रथम टप्पा आता दोन आठवड्यांपेक्षाही कमी अंतरावर येऊन ठेपला आहे. तथापि, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची उमेदवारांसंबंधीची धरसोड अद्याप संपलेली नाही. कुंठीत निर्णयक्षमता, संभ्रम किंवा ऐनवेळची घालमेल, उमेदवार निवडीच्या संदर्भात दिसून येत आहे. आतापर्यंत या पक्षाने सातवेळा आपले उमेदवार बदलले आहेत. मेरठ […]

समाजवादी पक्षाचा ‘संगीत खुर्चीचा’ खेळ

आतापर्यंत अनेकदा  बदलले लोकसभा उमेदवार, कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ, संतापाची भावना 
वृत्तसंस्था/ लखनौ
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा प्रथम टप्पा आता दोन आठवड्यांपेक्षाही कमी अंतरावर येऊन ठेपला आहे. तथापि, उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाची उमेदवारांसंबंधीची धरसोड अद्याप संपलेली नाही. कुंठीत निर्णयक्षमता, संभ्रम किंवा ऐनवेळची घालमेल, उमेदवार निवडीच्या संदर्भात दिसून येत आहे.
आतापर्यंत या पक्षाने सातवेळा आपले उमेदवार बदलले आहेत. मेरठ मतदारसंघात प्रथम भानू प्रताप सिंग यांना प्रथम उमेदवारी देण्यात आली होती. त्यांनी प्रचारही करण्यास प्रारंभ केला होता. तथापि, पक्षनेते अखिलेश यादव यांनी अचानक आमदार अतुल प्रधान यांना उमेदवारी दिल्याची घोषणा करावी लागली. त्यामुळ सिंग नाराज झाले. पण त्यांनी फारशी खळखळ न करता पक्षनेतृत्वासमोर मान तुकविली. आता अतुल प्रधान यांनाही वगळण्यात आले असून त्यांच्याऐवजी सुनिता वर्मा यांची उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे. भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघात गाजलेल्या रामायण मालिकेत श्रीरामाची भूमिका केलेल्या अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा प्रचार जोरदार होत आहे.
मोरादाबादमध्येही तेच
मोरादाबाद मतदारसंघात प्रथम समाजवादी पक्षाने विद्यमान खासदार एस. टी. हसन यांचे नाव घोषित केले होते. त्यांनी पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्जही सादर केला होता. तथापि, त्याच दिवशी अखिलेश यादव यांनी त्यांच्या जवळचे असणारे अझम खान यांच्या सांगण्यावरुन रुची वीरा यांची उमेदवारी घोषित केली. त्यांनीही दुसऱ्या दिवशी अर्ज सादर केला. तथापि, पुन्हा अखिलेश यादव यांचे मन बदलले. त्यांनी हसन हेच खरे उमेदवार असल्याची घोषणा केली आणि रुची वीरा यांना माघार घेण्यास लावली. त्यामुळे आझम खान नाराज झाल्याचे वृत्त आहे.
रामपूरमध्येही गोंधळ
रामपूर मतदारसंघात अखिलेश यादव यांनी प्रथम आझम खान यांनाच उमेदवाराचे नाव सुचविण्याची सूचना केली. आझम खान यांनी अखिलेश यादव यांनी स्वत: किंवा यादव कुटुंबापैकी कोणीतरी उभे राहण्याची सूचना केली. अखिलेश यादव यांनी बरीच चर्चा करुन आपले पुतणे तेज प्रताप यादव यांचे नाव निश्चित केले. पण त्याच वेळी आझम खान यांच्याशी जवळीक असणाऱ्या नेत्यांनी पत्रकार परिषद आयोजित करुन, अखिलेश यादव या मतदारसंघातून निवडणूक लढविणार नसतील, तर आम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा इशारा दिला. या घटनेच्या दुसऱ्याच दिवशी समाजवादी पक्षाने मोईबुल्लाह नदवी यांना उमेदवारी घोषित करुन गोंधळात आणखी भरच टाकली. त्यानंतर काही तासांनीच आझम खान यांच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या असीम रझा यांनीही समाजवादी पक्षाच्याच तिकीटावर उमेदवारी अर्ज सादर करुन मोठाच संभ्रम निर्माण केला आहे.
बाघपत, बिजनौर, गौतम बुद्ध नगर
बाघपत या मतदारसंघात प्रथम या पक्षाने अमलपाल शर्मा यांना उमेदवारी दिली. तथापि, काही दिवसांमध्येच त्यांना माघार घ्यावयास लावून त्यांच्याऐवजी मनोज चौधरी यांची निवड केली. गौतम बुद्ध नगर मतदारसंघात प्रथम महेंद्र सिंग नागर यांच्या नावाची घोषणा बराच गाजावाजा करुन करण्यात आली. तथापि, चारच दिवसांमध्ये त्यांच्या जागी राहुल अवाना यांची निवड करण्यात आली. पण हा निर्णयही अल्पकालीनच ठरला. दोन दिवसांनी पुन्हा अवाना यांना वगळून नागर यांनाच तिकीट देण्यात आले. बिजनौर मतदारसंघात प्रथम यशवीर सिंग यांना उमेदवारी देण्यात आली. नंतर त्यांच्या स्थानी नूरपूरचे विद्यमान आमदार राम अवतार सैनी यांचे पुत्र दीपक सैनी यांना उमेदवारी देण्यात आली.
कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम, संताप
पक्ष नेतृत्वाच्या अशा धरसोड प्रवृत्तीमुळे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा प्रचंड गोंधळ उडाला असून त्यांनी पक्षनेतृत्वाविरोधात संताप व्यक्त करण्यास प्रारंभ केला आहे. अशा प्रकारे आतापासूनच स्थिती असेल तर काम करण्यास उत्साह कोठून आणायचा, असा त्यांचा प्रश्न आहे. प्रथम घोषित केलेले आणि नंतर माघार घ्यावयास लावलेले अनेक नेतेही कमालीचे नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.