भुतरामहट्टीत धावणार सफारी बस

लवकरच होणार दाखल : वयोवृद्ध, लहान मुलांना सोयीस्कर बेळगाव : भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच सफारी बस दाखल होणार आहे. त्यामुळे वयोवृद्ध आणि बालकांची गैरसोय दूर होणार आहे. या बसच्या माध्यमातून प्राणी संग्रहालयाचा आनंद लुटता येणार आहे. म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टीतील प्राणी संग्रहालयाचा विकास साधण्यात आला आहे. तब्बल 39 […]

भुतरामहट्टीत धावणार सफारी बस

लवकरच होणार दाखल : वयोवृद्ध, लहान मुलांना सोयीस्कर
बेळगाव : भुतरामहट्टी प्राणी संग्रहालयात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय दूर करण्यासाठी लवकरच सफारी बस दाखल होणार आहे. त्यामुळे वयोवृद्ध आणि बालकांची गैरसोय दूर होणार आहे. या बसच्या माध्यमातून प्राणी संग्रहालयाचा आनंद लुटता येणार आहे. म्हैसूर येथील प्राणी संग्रहालयाच्या धर्तीवर भुतरामहट्टीतील प्राणी संग्रहालयाचा विकास साधण्यात आला आहे. तब्बल 39 हेक्टरमध्ये पसरलेल्या या संग्रहालयात विविध प्राणी आणि पक्षी ठेवले आहेत. त्यामुळे पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. मात्र, संग्रहालयात सफारी बसची कमतरता जाणवत आहे. सद्य परिस्थितीत दोन बसवर पर्यटकांचा ताण वाढू लागला आहे. त्यामुळे आणखी एक सफारी बस मागविण्यात आली आहे. येत्या 15 दिवसांत ही बस संग्रहालयाच्या सेवेत दाखल होणार आहे. शहरापासून अवघ्या 12 कि. मी. अंतरावरील प्राणी संग्रहालयात सिंह, वाघ, अस्वल, बिबटे, कोल्हे, सांबर, चितळ, तरस, हरिण, मगर यासह दुर्मीळ पक्षीही ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे वन्यप्रेमी नागरिकांचा ओघ कायम आहे. मात्र, सफारी बसअभावी पर्यटकांची गैरसोय होत होती. विशेषत: लहान मुले आणि वयोवृद्धांना संग्रहालयात फिरणे त्रासदायक होत आहे. याची दखल घेऊन प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने आणखी एक सफारी बसची व्यवस्था केली आहे. ही बस येत्या 15 दिवसांत प्राणी संग्रहालयात धावताना दिसणार आहे.
शैक्षणिक सहलींचा ओघ
डिसेंबर, जानेवारी या महिन्यांमध्ये संग्रहालयात विविध ठिकाणांहून शैक्षणिक सहली दाखल होऊ लागल्या आहेत. कर्नाटकसह महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतूनही पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. त्यामुळे महसूल वाढू लागला आहे.
संग्रहालयाची वेळ
भुतरामहट्टी प्राणीसंग्रहालय मंगळवार वगळता दररोज सकाळी 10 ते 5 या वेळेत सर्वांना खुले ठेवण्यात येत आहे. शिवाय नोकरदारवर्गाची गैरसोय टाळण्यासाठी शासकीय सुट्टीदिवशी संग्रहालय सुरू ठेवण्यात येत आहे. प्रौढांसाठी 40 रु. व लहान मुलांसाठी 20 रुपये प्रवेश शुल्क आकारले जात आहे.
बसमधून पाहणे सुलभ
प्राणी संग्रहालयात पर्यटकांचा ओघ वाढू लागला आहे. त्यामुळे आणखी एक सफारी बस दाखल होणार आहे. त्यामुळे संपूर्ण प्राणीसंग्रहालय काही वेळातच पाहणे शक्य होणार आहे. लहान मुले आणि वयोवृद्धांना ही बस सोयीस्कर ठरणार आहे.
– के. एन. वेन्नूर, आरएफओ, भुतरामहट्टी