रियान परागचे दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 2024 च्या रणजी मोसमातील रायपूर येथे सुरू असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात आसामचा कर्णधार रियान परागने जलद शतक झळकवले. रणजी स्पर्धेच्या इतिहासातील परागचे हे दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक आहे. मात्र या सामन्यात छत्तीसगडकडून आसामला 10 गड्यांनी पराभव पत्करावा लागला. रणजी स्पर्धेच्या इतिहासामध्ये 2016 साली दिल्लीचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने झारखंड विरुद्ध […]

रियान परागचे दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
2024 च्या रणजी मोसमातील रायपूर येथे सुरू असलेल्या इलाईट ब गटातील सामन्यात आसामचा कर्णधार रियान परागने जलद शतक झळकवले. रणजी स्पर्धेच्या इतिहासातील परागचे हे दुसऱ्या क्रमांकाचे जलद शतक आहे. मात्र या सामन्यात छत्तीसगडकडून आसामला 10 गड्यांनी पराभव पत्करावा लागला.
रणजी स्पर्धेच्या इतिहासामध्ये 2016 साली दिल्लीचा फलंदाज आणि यष्टीरक्षक ऋषभ पंतने झारखंड विरुद्ध 48 चेंडूत जलद शतक झळकवले होते. पंतचा हा विक्रम अद्याप अबाधित आहे. रियान परागने या सामन्यातील सोमवारी खेळाच्या चौथ्या दिवशी 56 चेंडूत शतक झळकवले. रियान परागने 87 चेंडूत 12 षटकार आणि 11 चौकारांसह 155 धावांची खेळी केली. या सामन्यात आसामकडून छत्तीसगडला निर्णायक विजयासाठी 87 धावांची गरज होती. छत्तीसगडने बिनबाद 87 धावा 20 षटकात नोंदवून हा सामना 10 गड्यांनी जिंकला. एकनाथ केरकरने नाबाद 31 तर ऋषभ तिवारीने नाबाद 48 धावा जमविल्या. या सामन्यात छत्तीसगडने पहिल्या डावात 327 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर आसामचा पहिला डाव 254 धावात आटोपला. छत्तीसगडतर्फे वासुदेव बारेथ आणि जिवेश भुते यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. छत्तीसगडने 86 धावांची आघाडी पहिल्या डावात घेतली होती. आसामचा दुसरा डाव 155 धावात आटोपला. छत्तीसगडच्या पहिल्या डावात अमनदीप खरेने शानदार शतक (116) झळकवले होते.
पुडुचेरी विजयी
रणजी स्पर्धेतील अन्य एका सामन्यात पुडूचेरीने यजमान दिल्लीचा 9 गड्यांनी पराभव केला. पुडूचेरीचा मध्यमगती गोलंदाज मॅथ्यूने 5 गडी बाद केले. या सामन्यात सोमवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी दिल्लीने 8 बाद 126 या धावसंख्येवरुन दुसऱ्या डावातील खेळाला पुढे सुरूवात केली आणि त्यांचा डाव 145 डावात आटोपला. पुडूचेरीच्या मॅथ्यूने 39 धावात 5 तर गौरव यादवने 3 व सौरभ यादवने 2 गडी बाद केले. पुडूचेरीला निर्णायक विजयासाठी 51 धावांची गरज होती. पुडूचेरीने 1 बाद 51 धावा जमवित हा सामना 9 गड्यांनी जिंकला.
बडोदा संघ विजयी
रणजी स्पर्धेतील अन्य एका सामन्यात यजमान बडोदाने येथे सोमवारी खेळाच्या शेवटच्या दिवशी ओडीशाचा 147 धावांनी पराभव केला. या सामन्यात बडोदा संघाने ओडीशाला निर्णायक विजयासाठी 432 धावांचे कठीण आव्हान दिले होते. पण ओडीशाचा दुसरा डाव 284 धावात आटोपला. बडोदा संघातील 22 वर्षीय पिथियाने 61 धावात 5 गडी बाद केले. या सामन्यात बडोदा संघाने 6 गुण मिळविले. देहराडून येथे मध्यप्रदेश आणि उत्तराखंड यांच्यातील सामना अनिर्णित अवस्थेत संपला. या सामन्यात मध्यप्रदेशला 3 तर उत्तराखंडला 1 गुण मिळाला. मध्यप्रदेशने पहिल्या डावात 323 धावा जमविल्यानंतर उत्तराखंडचा पहिला डाव 192 धावात आटोपला. मध्यप्रदेशने दुसरा डाव 3 बाद 243 धावांवर घोषित केला. त्यानंतर उत्तराखंडने दिवसअखेर 8 बाद 266 धावा जमवित हा सामना अनिर्णित राखला. जम्मू काश्मिर आणि हिमाचल प्रदेश यांच्यातील सामना अनिर्णित राहिला. या सामन्यात हिमाचलप्रदेशला 3 तर जम्मू काश्मिरला 1 गुण मिळाला.
संक्षिप्त धावफलक – दिल्ली प. डाव 148, दु. डाव 145, पुडूचेरी प. डाव 244, दु. डाव 1 बाद 51, बडोदा प. डाव 351, दु. डाव 4 बाद 258 डाव घोषित, ओडिशा प. डाव 178, दु. डाव 284, जम्मू काश्मिर प. डाव 100, हिमाचल प्रदेश प. डाव 1 बाद 120, मध्यप्रदेश प. डाव 323, दु. डाव 3 बाद 243, उत्तराखंड प. डाव 192, दु. डाव 8 बाद 266.