रॉयल चॅलेंजर्सचा मुकाबला आज गुजरात टायटन्सशी

वृत्तसंस्था/ बेंगळूर ‘आयपीएल’मध्ये आज शनिवारी होणार असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि गुजरात टायटन्स यांच्यात झुंज रंगणार आहे. गणिताच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू आणि गुजरात टायटन्स अजूनही आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात, परंतु ते स्वप्न जिवंत राहण्यासाठी त्यांना या सामन्यात विजय मिळविणे आवश्यक आहे. रॉयल चॅलेंजर्स 10 सामन्यांतून 6 गुणांसह तळाशी आहेत, तर टायटन्स 10 […]

रॉयल चॅलेंजर्सचा मुकाबला आज गुजरात टायटन्सशी

वृत्तसंस्था/ बेंगळूर
‘आयपीएल’मध्ये आज शनिवारी होणार असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर आणि गुजरात टायटन्स यांच्यात झुंज रंगणार आहे. गणिताच्या दृष्टिकोनातून पाहिल्यास रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरू आणि गुजरात टायटन्स अजूनही आयपीएल प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात, परंतु ते स्वप्न जिवंत राहण्यासाठी त्यांना या सामन्यात विजय मिळविणे आवश्यक आहे. रॉयल चॅलेंजर्स 10 सामन्यांतून 6 गुणांसह तळाशी आहेत, तर टायटन्स 10 सामन्यांतून 8 गुणांसह आठव्या स्थानावर आहेत.
तथापि, चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स (प्रत्येकी 10 गुण) यांना स्वीकाराव्या लागलेल्या पराभवांमुळे या दोन संघांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.  फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखालील संघ त्यांच्या मागील दोन सामन्यांमध्ये विजय नोंदवल्यामुळे त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा थोडा अधिक आत्मविश्वासाने भारलेला आहे. त्या दोन सामन्यांत त्यांना नवीन नायक देखील सापडले आहेत. त्यापैकी एक विल जॅक्स असून त्याने गुजरात टायटन्सविऊद्ध सामना जिंकून देणारे शतक झळकावले, तर कॅमेरून ग्रीनने अखेरीस हैदराबादविऊद्ध महत्त्वपूर्ण धावा जमविल्या तसेच बळी घेऊन आपल्या अष्टपैलूत्वाला साजेशी कामगिरी केली. घरच्या मैदानावरही आरसीबीला त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.
अव्वल स्थानावर असलेल्या विराट कोहलीचा फॉर्म कायम असून तो आयपीएलच्या या आवृत्तीत 500 धावांचा टप्पा पार करणारा पहिला फलंदाज बनला आहे. तथापि, रॉयल चॅलेंजर्सला त्यांच्या गोलंदाजांकडून आणखी प्रभावी कामगिरीची अपेक्षा असेल. भारताच्या टी-20 विश्वचषक संघात स्थान मिळालेला मोहम्मद सिराज, यश दयाल, कर्ण शर्मा आणि स्वप्नील सिंग यांना एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर प्रभावीरीत्या मारा करावा लागेल. कारण जरी गुजरात टायटन्सची कामगिरी सातत्यपूर्ण नसली, तरी त्यांच्याकडे बेंगळूरच्या माऱ्याचा समाचार घेण्यास सक्षम असे फलंदाज आहेत.
पण हे फलंदाज अनेकदा अपयशी ठरलेले आहेत आणि दिल्ली कॅपिटल्स तसेच आरसीबीविऊद्धच्या गुजरात टायटन्सच्या सलग दोन पराभवांतून ते स्पष्ट झालेले आहे. शुभमन गिल आणि भारद्वाज साई सुदर्शन यांनी मिळून 700 हून अधिक धावा जमविल्या आहेत, तर वृद्धीमान साहा, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, विजय शंकर आणि शाहऊख खान यांना या हंगामात 200 धावांचा टप्पा देखील पार करता आलेला नाही. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या मधल्या आणि तळाकडच्या फळीला ठिसूळ स्वरूप आले आहे.
त्यांची गोलंदाजीही अपेक्षेनुरुप चमकलेली न्नसून स्टार फिरकीपट रशिद खानने देखील 10 सामन्यांमध्ये षटकामागे आठ धावा देत फक्त आठ बळी घेतले आहेत. मोहित शर्माने 10 सामन्यांमध्ये 10 बळी घेतले आहेत, परंतु प्रति षटक सुमारे 11 धावा दिल्या आहेत, तर उमेश यादवने प्रति षटक 10.5 धावा देत केवळ 7 बळी टिपले आहेत. संदीप वॉरियर, नूर अहमद, आर. साई किशोर आणि अजमतुल्ला उमरझाई यांनी देखील खूप धावा दिलेल्या आहेत.
संघ : रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर, विजयकुमार वैशाख, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टोपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार, कॅमेरून ग्रीन, अल्झारी जोसेफ, यश दयाल, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, स्वप्नील सिंग, सौरव चौहान.
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), डेव्हिड मिलर, मॅथ्यू वेड, वृद्धिमान साहा, केन विल्यमसन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नळकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, नूर अहमद, साई किशोर, रशिद खान, जोशुआ लिटल, मोहित शर्मा, अजमतुल्ला ओमरझाई, उमेश यादव, शाहऊख खान, सुशांत मिश्रा, कार्तिक त्यागी, मानव सुतार, स्पेन्सर जॉन्सन, संदीप वॉरियर, बी. आर. शरथ.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7.30 वा.