रोहित, विराट, जडेजाच्या टी 20 अध्यायाची सांगता

विजेतेपदासह घेतला संस्मरणीय निरोप वृत्तसंस्था/ बार्बाडोस भारताला दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्डकप विजेतेपद मिळवून दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहली व अष्टपैलू रविंद्र जडेजा या तिघांनी मोठा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने 2007 नंतर टी20 वर्ल्ड कप जिंकला, यानंतर या तीनही दिग्गजांनी हिच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय […]

रोहित, विराट, जडेजाच्या टी 20 अध्यायाची सांगता

विजेतेपदासह घेतला संस्मरणीय निरोप
वृत्तसंस्था/ बार्बाडोस
भारताला दुसऱ्यांदा टी 20 वर्ल्डकप विजेतेपद मिळवून दिल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, अनुभवी फलंदाज विराट कोहली व अष्टपैलू रविंद्र जडेजा या तिघांनी मोठा निर्णय घेत आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. टीम इंडियाने 2007 नंतर टी20 वर्ल्ड कप जिंकला, यानंतर या तीनही दिग्गजांनी हिच ती वेळ म्हणत निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. विशेष म्हणजे, रोहित आणि कोहलीच्या निवृत्तीने एका युगाचा अंत झाला. रोहित व कोहलीने अनेक टी 20 आंतरराष्ट्रीय विक्रम केले आहेत, जे कोणत्याही खेळाडूला तोडणे सोपे नाही. मात्र, आता दोघांनाही संस्मरणीय निरोप मिळाला आहे. या तिघांनीही टी 20 क्रिकेटमधून जरी निवृत्ती स्वीकारली असली तरी वनडे व कसोटी क्रिकेटमध्ये मात्र खेळत राहणार आहेत.
वर्ल्डकप जिंकल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने ही माझी टी-20 क्रिकेटमधील शेवटची मॅच होती असे जाहीर केले. हा फॉरमॅट खेळण्यास सुरुवात केल्यापासून मी याचा खुप आनंद घेतला. आता निरोप घेण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्याने सांगितले. निवृत्तीची घोषणा करताना रोहितने संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांचे आभार मानले. त्यांनी भारतीय क्रिकेटसाठी गेल्या 20 ते 25 वर्षात खूप काही केले आहे. ही एकमेव गोष्ट शिल्लक होती. मी आणि संपूर्ण संघ आनंदी आहोत की आम्ही त्यांच्यासाठी हे करु शकलो, असे रोहित म्हणाला.
जडेजाचाही टी 20 क्रिकेटला अलविदा
शनिवारी भारतीय संघाने आफ्रिकेचा पराभव करून टी 20 विश्वचषक जिंकला. या विजयानंतर विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या पाठोपाठ रविंद्र जडेजानेही टी 20 फॉरमॅटमधून निवृत्ती जाहीर केली. जडेजाने इंस्टाग्रामवर टी 20 विश्वचषकाची ट्रॉफी पोस्ट केली आहे. या पोस्टच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे, मनापासून मी टी 20 आंतरराष्ट्रीय करिअरला अलविदा म्हणत आहे. मी माझ्या देशासाठी नेहमीच 100 टक्के योगदान दिले आहे आणि देत राहीन. टी 20 विश्वचषक जिंकणे हे एक स्वप्न सत्यात उतरले आहे. आठवणी, उत्साह आणि अतूट पाठिंब्याबद्दल धन्यवाद.
विराटही टी 20 क्रिकेटमधून एक्झिट
यंदाच्या आयसीसी टी 20 विश्वचषकातील भारताने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 11 वर्षांनंतर आयसीसीच्या ट्रॉफीवर नाव कोरण्याचा इतिहास रचला. परंतू यादरम्यान भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीने टी 20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा जाहीर केली. सामन्यानंतर बोलताना विराटने सर्वांनाच धक्का दिला. ‘हा माझा शेवटचा वर्ल्डकप आहे. विश्वविजेतेपदासह टी 20 कारकीर्दीला अलविदा करण्याचा मी निर्णय घेतला आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटू शकतं की एकही धाव होणार नाही, पण काही दिवस तुमचे असतात. देवाचे आभार मानतो. मी संघाच्या विजयाच्या योगदान देऊ शकलो याचे समाधान आहे. मला भारतासाठी वर्ल्डकप जिंकायचा होता, हे स्वप्न सत्यात उतरले आहे. आता, नव्या पिढीकडे नेतृत्व सोपवण्याची वेळ आली आहे. युवा खेळाडू या जबाबदारीसाठी सज्ज आहेत.
प्रतिक्रिया
भारताने 11 वर्षानंतर आयसीसी टूर्नामेंट जिंकल्यानंतर भावूक झालेला रोहित म्हणाला, ‘मी पूर्णपणे हरवून गेलो आहे आणि मी माझ्या भावना शब्दात मांडू शकत नाही. हे सारेच अद्भूत आणि अविस्मरणीय असे आहे.
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा
 
आंतरराष्ट्रीय  20 क्रिकेटमधून निवृत्त होण्याची यासारखी योग्य वेळ कोणतीही नाही. आजवर टी 20 क्रिकेट खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटला. आता, कसोटी व वनडेवर फोकस असणार आहे.
दिग्गज फलंदाज, विराट कोहली
टी 20 वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न सत्यात उतरले आहे. हे माझ्या टी 20 कारकीर्दीचे सर्वोच्च शिखर आहे.
अष्टपैलू रविंद्र जडेजा