बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला…नाही तर त्याला बसवला असता; रोहितच्या वक्तव्यावर सभागृहात हशा

बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला…नाही तर त्याला बसवला असता; रोहितच्या वक्तव्यावर सभागृहात हशा

विधानभवनात रोहित शर्माची तुफान बॅटिंग! रोहितसह सुर्या, जैस्वाल व दुबेचा सत्कार

मुंबई प्रतिनिधी

भारतीय क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेला नमवत 17 वर्षानंतर टी 20 वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली. कॅरेबियन बेटावर अजिंक्यपद पटकावल्यानंतर गुरुवारी सकाळी मायदेशात टीम इंडियाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शुक्रवारी भारतीय संघातील चार मुंबईकर खेळाडू कर्णधार रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल व शिवम दुबे यांचा महाराष्ट्र विधानभवनात सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे, महाराष्ट्राच्या विधानभवनात प्रथमच अशा प्रकारचा सत्कार सोहळा पार पडला.

अंतिम सामन्यात सुर्यकुमारने डेव्हिड मिलरच्या घेतलेल्या झेलची चर्चा अद्यापही सुरु आहे. रोहित शर्माने विधीमंडळातील वक्तव्यादरम्यान सूर्यकुमार यादवच्या झेलवर मोठं वक्तव्य केले आहे. रोहित शर्मा विधीमंडळातही बोलायला पुढे आला तेव्हा त्याच्या नावाचा जयजयकार सुरू होता. रोहित त्याचे भाषण मराठीत केले. आपल्या भाषणाची सुरूवात सर्वांना नमस्कार अशी केली. मी संघातील सहकाऱ्यांचा आभारी आहे. हे माझ्यामुळे किंवा सूर्या किंवा शिवम किंवा यशस्वीमुळे झाले नाही. सर्वा खेळाडूंमुळे हे शक्य झाले. मी लकी देखील आहे की मला जी टीम भेटली जी जबरदस्त होती. प्रत्येक सामन्यात सर्वांनी योगदान दिले, त्यामुळे आपण जिंकलो, असे रोहित म्हणाला. सूर्याच्या झेलवर बोलताना रोहित म्हणाला, ‘सूर्याने आता सांगितलं की बरं झालं त्याच्या हातात बॉल बसला. बरं झालं तो बॉल बसला नाहीतर पुढे त्याला मी बसवला असता.‘ असं म्हणताच विधीमंडळासह रोहित शर्माही जोरजोरात हसू लागला.
मुख्यमंत्री शिंदे यांची फटकेबाजी
टीम इंडियाच्या विजयाचे शिलेदार असलेल्या भारतीय संघातील 4 मुंबईकर खेळाडूंचा महाराष्ट्राच्या विधिमंडळात सत्कार करण्यात आला. यावेळी, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी तुफान फटकेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या भाषणात सूर्यकुमार यादवाच्या कॅचचं वर्णन करताना, 2 वर्षांपूर्वी केलेल्या बंडाची आठवणही सांगितली. विश्वविजयी भारतीय संघाचं अभिनंदन करुन संघाला शुभेच्छा दिल्या. कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे यांचं महाराष्ट्र सरकारच्यावतीने मनापासून स्वागत करतो, असे शिंदे यांनी म्हटले. भारतीय संघात 4 मुंबईकर खेळाडू होते, याचा विशेष अभिमान आहे. तर, संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड हेही आपल्या महाराष्ट्राचे जावई आहेत, हेही अभिमानाची बाब असल्याचे ते यावेळी म्हणाले.
सुर्यासाठी अमिताभ यांचा डायलॉग
अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे, एकही मारा लेकीन सॉलिड मारा. सूर्यकुमारने एकच कॅच घेतला, पण सॉलिड घेतला. सूर्याचा तो कॅच आठवला की, डेव्हिड मिलर रात्री झोपेत दचकून उठत असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडूनही गौरवोद्गार
नेहमीच सभागृहात चौकार आणि षटकार मारणारे अजित पवार यांनी आजही सभागृहात फटकेबाजी केली. त्यांनी भाषणाच्या सुरुवातीला बोलताना, ‘थोडी नेहमीची परंपरा बाजूला ठेवून सुरुवातीला ज्यांनी विश्वचषक भारतात आणला त्यांचं नाव घेतो असं म्हणत पवार यांनी विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्मा यांच्या नावासह यशस्वी जैस्वाल, शिवम दुबे, सुर्यकुमार यादव यांची नावे घेत अभिनंदन केले. सुर्याने जो झेल घेतला, त्याचा पाय बाहेर जरी टेकला असता, तरी तुम्हाला-मला सर्वांना आजचा दिवस बघायला मिळाला नसता, त्यासाठी सुर्यकुमारचं खूप अभिनंदन… संपूर्ण भारतीयांचे डोळे तुझ्याकडे लागले होते, अप्रतिम झेल तु घेतला. रोहितने सांगितलंच तु झेल घेतला नसता, तर तुला बिघतलं असतं, पण रोहितने एकट्याने बघितलं नसतं, तर आम्ही सगळ्यांनीच बघितलं असतं, अजित पवारांच्या या वक्तव्याने सभागृहात एकच हास्यकल्लोळ झाला.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून रोहित शर्माची प्रशंसा
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा जेव्ह पत्रकार परिषद घेत असतो तेव्हा तो कमीत कमी बोलून आपल्या देहबोलीवरुन उत्तर देतो. त्याच्याकडे ती कला आहे, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. यावेळी वर्ल्डकप विजेत्या टीम इंडियाचे अभिनंदन देखील केले.