कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्याची चाळण

कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्याची चाळण

मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल : चार वर्षांपासून हालअपेष्टा
बेळगाव : चार वर्षे उलटली तरी अद्याप कपिलेश्वर कॉलनीत रस्ता पूर्ण करण्यात आलेला नाही. दोनवर्षांपूर्वी ड्रेनेज वाहिन्या घालण्यासाठी खोदाई करण्यात आल्यापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना फटका बसत आहे. शाळेपर्यंत पोहोचण्यास चिखलातून वाट काढत यावे लागत असल्याने विद्यार्थी व पालकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे. भातकांडे शाळेपासून जुना धारवाड रोडपर्यंतच्या कपिलेश्वर कॉलनीतील रस्त्याचे मागील चार वर्षांपासून काम सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात सुरू असलेले काम चार वर्षांनंतरही सुरू असल्याने परिसरातील रहिवासी वैतागले आहेत. ड्रेनेज वाहिन्या घालण्यात आल्या खऱ्या. परंतु, या वाहिन्यांना वारंवार गळती लागत असल्याने वरचेवर खोदाई केली जात आहे.
खोदाई केल्यानंतर 10 ते 15 दिवस रस्त्यावर भराव, दगड तसेच ठेवले जातात. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्याची वारंवार खोदाई होत असल्याने गटारींमध्ये चिखल-माती भरली आहे. यामुळे पावसाचे पाणी थेट आजूबाजूंच्या घरांमध्ये शिरत आहे. मागील वर्षीच्या पावसात देखील दोन ते तीन वेळा घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यामुळे या रस्त्याचे काम केव्हा पूर्ण होणार, याची प्रतीक्षा नागरिकांना आहे. अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे मागणी करून देखील काम पूर्ण करण्यात आले नसल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामुळे ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
रस्त्याअभावी विद्यार्थ्यांचे हाल
कपिलेश्वर कॉलनीतून विद्यार्थी परिसरातील अनेक शाळांमध्ये ये-जा करतात. रस्त्यामध्ये मोठे खड्डे असल्यामुळे वर्दी रिक्षाचालकही एसपीएम रोडवरच विद्यार्थ्यांना सोडत आहेत. तेथून चिखलातून कशीबशी वाट काढत विद्यार्थी घरी पोहोचत आहेत. तसाच फटका भातकांडे शाळेतील विद्यार्थ्यांनाही बसत आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी रहिवासी करत आहेत.