यशस्वी उद्योजक होण्यासाठी जोखीम आवश्यक
उद्योजक दीपक धडोती : आयएमईआरमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
बेळगाव : यशस्वी उद्योजक होण्यासाठी जोखीम घेणे आवश्यक आहे. खडतर प्रयत्न, त्याचबरोबर कामामध्ये सातत्य ठेवून लक्ष विचलित न करता केलेल्या प्रयत्नांना यश निश्चित मिळते. त्यासाठी आलेल्या प्रत्येक समस्येला समर्थपणे तोंड देणे आवश्यक आहे, असे मत सर्व्हो कंट्रोल्सचे कार्यकारी संचालक दीपक धडोती यांनी व्यक्त केले. भारत सरकारच्या प्रभावी व्याख्यान उपक्रमांतर्गत येथील आयएमईआर महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित ‘उद्योजकता’ विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यशस्वी उद्योजक होणे हे सर्वांचेच लक्ष्य असते. मात्र, यासाठी खडतर प्रयत्नांचीही गरज आहे. शिक्षण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता नोकरी देण्यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी सांगितले. आपल्या सर्व्हो कंट्रोल्स कंपनीच्या यशाचे गमक सांगताना ते म्हणाले, ही बेळगावसाठी अभिमानास्पद बाब आहे. चांद्रयान, मंगळयान, आदित्य यासारख्या अवकाश संशोधन मोहिमांमध्ये सर्व्हो कंट्रोल्सकडून महत्त्वाचे योगदान देण्यात आले आहे. वीस वर्षांपूर्वी लहानशा शेडमध्ये सुरू करण्यात आलेला व्यवसाय आज जगभरात नावारुपाला आला आहे.
यामागे खडतर परिश्रम आहेत. याबरोबरच अनेक थोर व्यक्तींच्या प्रोत्साहनातून हा उद्योग उभारण्यात मदत मिळाली आहे. माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रोत्साहनातूनच यशस्वी उद्योजक बनल्याचे त्यांनी सांगितले. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या कौशल्यांवर अधिक लक्ष केंद्रित करून त्या कौशल्यांचा समर्पकपणे उपयोग करून घेणे आवश्यक आहे. यासाठी आपल्यातील कौशल्ये जाणून घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. याच्या आधारावरच आपण अनेक विदेशी कंपन्यांच्या महत्त्वाच्या यंत्रसामग्रीसाठी सुटे भाग देत आहोत. सुखोई, ब्राह्मोस याबरोबरच इस्रायलच्या अत्याधुनिक आयर्नडोम सुरक्षा यंत्रणेला सुटे भाग पुरविण्यात येत आहेत. सर्व्हो कंट्रोल्सकडून वीस वर्षांच्या कालावधीत 75 प्रकल्पांवर काम करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, उद्योग सुरू करताना आलेल्या समस्या कथन करून आपल्याच कंपनीच्या व्यवस्थापकाने केलेला आर्थिक घोटाळा व त्यावर मात करत कंपनीने यशस्वी वाटचाल करून आज जगभरात नावारुपाला आलेल्या उद्योगाची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. प्रारंभी आयएमईआरचे प्रा. अरिफ शेख यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. अमित कुलकर्णी उपस्थित होते.
Home महत्वाची बातमी यशस्वी उद्योजक होण्यासाठी जोखीम आवश्यक
यशस्वी उद्योजक होण्यासाठी जोखीम आवश्यक
उद्योजक दीपक धडोती : आयएमईआरमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन बेळगाव : यशस्वी उद्योजक होण्यासाठी जोखीम घेणे आवश्यक आहे. खडतर प्रयत्न, त्याचबरोबर कामामध्ये सातत्य ठेवून लक्ष विचलित न करता केलेल्या प्रयत्नांना यश निश्चित मिळते. त्यासाठी आलेल्या प्रत्येक समस्येला समर्थपणे तोंड देणे आवश्यक आहे, असे मत सर्व्हो कंट्रोल्सचे कार्यकारी संचालक दीपक धडोती यांनी व्यक्त केले. भारत सरकारच्या प्रभावी व्याख्यान […]