जांबोटी-खानापूर महामार्गाच्या दुरुस्ती कामाला प्रारंभ

वाहनधारकांमधून समाधान : अनेक ठिकाणी पडले होते खड्डे : दारोळी-जांबोटी रस्ता दुरुस्तीची मागणी वार्ताहर /जांबोटी जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाच्या दुरुस्ती कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरुवात केल्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. जांबोटी-खानापूर या रस्त्याचा समावेश जत-जांबोटी राज्य महामार्ग अंतर्गत होतो. सुमारे दहा वर्षांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्यामुळे या रस्त्याचा बहुतांश भाग सुस्थितीत होता. मात्र या […]

जांबोटी-खानापूर महामार्गाच्या दुरुस्ती कामाला प्रारंभ

वाहनधारकांमधून समाधान : अनेक ठिकाणी पडले होते खड्डे : दारोळी-जांबोटी रस्ता दुरुस्तीची मागणी
वार्ताहर /जांबोटी
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाच्या दुरुस्ती कामाला सार्वजनिक बांधकाम खात्याने सुरुवात केल्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. जांबोटी-खानापूर या रस्त्याचा समावेश जत-जांबोटी राज्य महामार्ग अंतर्गत होतो. सुमारे दहा वर्षांपूर्वी या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आल्यामुळे या रस्त्याचा बहुतांश भाग सुस्थितीत होता. मात्र या रस्त्यावरून गोवा, हुबळी, धारवाड आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक सुरू असल्यामुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले होते. गेल्या दोन वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्याच्यावतीने मोदेकोप फाटा ते कान्सुली फाट्या दरम्यानच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे या रस्त्याची देखील चाळण झाल्यामुळे या ठिकाणाहून वाहने चालविताना वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत होती. तसेच या रस्त्यांपैकी मलप्रभा नदीनजीकच्या शंकरपेठ पुलाच्या दोन्ही बाजूचा रस्तादेखील अत्यंत खराब झाल्यामुळे रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी वाहनधारकांतून करण्यात येत होती. मात्र गेल्या अनेक दिवसापासून या रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याचे दुर्लक्ष करण्यात झाले होते. मागीलवेळी रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. त्यावेळी रस्त्यावर अनेक ठिकाणी लहान मोठ्या पूलवजा मोरीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र त्यावरील रस्त्याची दुरुस्ती मुरूम व दगड घालून योग्यप्रकारे करण्यात न आल्यामुळे त्या ठिकाणचा रस्ता देखील खचत असल्याने वाहनधारकांना वाहने चालवताना समस्यांचा सामना करावा लागत होता. यासाठी या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घ्यावे, अशी मागणी करण्यात येत होती.
भारत लाईव्ह न्यूज मीडिया’ वृत्ताची घेतली दखल
जांबोटी-खानापूर राज्य महामार्गाची दुर्दशा या मथळ्याखाली गेल्या काही दिवसापूर्वी ‘भारत लाईव्ह न्यूज मीडिया’मध्ये सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्याच्या दुरुस्ती कामाला प्रारंभ केल्यामुळे वाहनधारकांमधून समाधान व्यक्त होत आहे. सध्या दारोळी फाट्यापर्यंतच्या रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अजून दारोळी ते जांबोटीपर्यंतच्या रस्त्यावर देखील अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तरी सार्वजनिक बांधकाम खाते आणि संबंधित कंत्राटदाराने लक्ष घालून दारोळी फाटा ते जांबोटीपर्यंतच्या रस्त्याचीही तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.